लेखक किंवा कवी त्याच्या लेखनाच्या प्रारंभीच्या काळात कोण काय म्हणेल किंवा कोणास काय वाटेल, याची पर्वा न करता आणि कोणतेही मापदंड न लावता व्यक्त होत असतो. त्या काळातील लिखाण हे काही वेळेस अपरिपक्व वाटण्याची शक्यता असली, तरी ते एका ऊर्मीतून आले असल्याने ते अस्सल असते. लेखक, साहित्यिकांनी लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातील बहर जपला पाहिजे, असे मत प्रसिद्ध कवी आणि लेखक वैभव जोशी यांनी व्यक्त केले.
ग्रंथालीतर्फे चंद्रशेखर पोतनीस लिखित ‘आज थोडं जगून बघावं…’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवी आणि लेखक वैभव जोशी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील गो.ल. आपटे सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, चंद्रशेखर पोतनीस, कवयित्री प्रतिभा सराफ आणि ग्रंथालीच्या धनश्री धारप आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसिद्ध कवी आणि लेखक वैभव जोशी म्हणाले, ‘आज थोडं जगून बघावं…’ या पुस्तकात कवी चंद्रशेखर पोतनीस यांनी नितळपणे भावना व्यक्त केलेल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात एखादी व्यक्ती केव्हां, कुठे, काय देऊन जाते यांनी अंदाज लावणे कठीण आहे. लॉकडाऊनच्या काळात पोतनीस यांच्या आतल्या आवाजाने दिलेल्या हाकेला सृजनशील पद्धतीने प्रतिसाद दिला आहे. लेखकाचा सुरुवातीचा व्यक्त होण्याचा काळ हा सुगीचा काळ असतो. मला देखील जेव्हां साचलेपण येेते, त्यावेळेस मी माझ्या समकालीन कवींच्या कवितांचे, साहित्याचे वाचन करतो आणि मोकळा होतो. इतरांना लिहिण्याची प्रेरणा, स्फूर्ती देऊ शकेल, ही ताकद तुमच्या साहित्यात असली पाहिजे. तुमच्या साहित्यकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर आस्वादक उद्युक्त झाला पाहिजे. ‘आज थोडं जगून बघावं…’ यातील कवितांमध्ये कोणताही अभिनिवेश किंवा उपदेशाचे डोस नसून कवीच्या मनाचा अनुुनाद उमटला आहे. शहरी जीवन जगत असताना शहरी कल्लोळात आणि कोलाहलात आपण आपल्या सभोवतालच्या निसर्गाचे संगीतच ऐकत नाही. कोरोनाकाळात पोतनीस यांनी त्यांच्या शिरवळ येथील वडगाव येथे निसर्गातील सान्निध्यात राहून साहित्याची निर्मिती केली आहे, त्याला तेथील जिवंत झर्यािचा स्पर्श लाभला आहे. त्यांच्या या कवितांमध्ये मिष्कीलपणासोबतच अध्यात्माचादेखील विचार डोकावतो, हे नमूद करावेसे वाटते. यावेळी वैभव जोशी यांनी त्यांच्या स्वचरित कविता देखील सादर केल्या.
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, की आपण सगळे सध्या नुसते धावत सुटलो आहोत. किती आणि कशासाठी धावायचे याचा विवेक हरवला आहे. त्यामुळे जगणे वाहून जाते आहे आणि जगायचे राहूनच जाते आहे. जगण्याची प्रत आणि दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. तो उंचावण्यासाठी थोडे थांबून, विचार करून, स्वतःसाठी वेळ देत जगणे महत्त्वाचे आहे. आर्थिक संपन्नता येत असताना अर्थपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण जगणे गरजेचे आहे. कवितेचा अर्थ केवळ लिहिलेल्या दोन ओळींत शोधता येत नाही. तो दोन ओळींतील रिकाम्या जागेत आणि विरामचिन्हांतही शोधावा लागतो. उत्तम काव्यनिर्मितीसाठी प्रतिभेबरोबरच साधनाही लागते. पोतनीस यांची कविता हरवत चाललेल्या सत्त्वशील जगण्यावर मार्मिक भाष्य करणारी आहे.
यावेळी बोलताना चंद्रशेखर पोतनीस म्हणाले, की लॉकडाऊनच्या निमित्ताने गावी जाण्याचा आणि तिथे राहण्याचा आलेला योग हे या पुस्तकनिर्मितीमागील मुख्य कारण आहे. मी कुठल्याही अंगाने कवी नसताना आणि यापूर्वी कधीही कविता लिहिलेली नसताना लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मला कविता सुचली आणि मी ती शब्दात उतरवली. मी जवळच्यांना ती कविता पाठवली असता, माझ्या प्रेमापोटी त्या कवितेचे कौतुक झाले आणि हा कवितेचा ओघ असाच चालू राहिल्याने पुण्यात येईपर्यंत माझ्या या सत्तर कविता तयार झाल्या होत्या. अनेकांनी या कवितांचा संग्रह पुस्तक काढण्याचा आग्रह धरल्याने आज ते पुस्तक रूपाने आपल्या भेटीस आले आहे. या कवितांमधून मनुष्यस्वभावाचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर आध्यात्मिक, सामाजिक आणि प्रासंगिक अशी अंगेही दिसतात.
यावेळी प्रतिभा सराफ यांनी चंद्रशेखर पोतनीस यांच्या ‘आज थोडं जगून बघावं…’ या काव्यसंग्रहाचा रसास्वाद रसिकांसमोर उलगडला. ग्रंथालीच्या धनश्री धारप यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. संज्ञा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले आणि ‘आज थोडं जगून बघावं…’ या काव्यसंग्रहातील काही कवितांचे सादरीकरण केले.