चालू घडामोडी

गझल सादरीकरण आणि पुस्तक प्रकाशन

चंद्रशेखर सानेकर यांचे गझल सादरीकरण आणि पुस्तक प्रकाशन

उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या स्मृतीदिनान्निमित्त, चंद्रशेखर सानेकर लिखित गझलच्या उजेडात गझल व माझ्या दृष्टांताची दृश्ये

पुस्तक प्रकाशन आणि गझल सादरीकरण.

हस्ते : राजीव श्रीखंडे

निवेदन : अस्मिता पांडे

गझलकार आणि कवी चंद्रशेखर सानेकर यांनी कार्यक्रमाबद्दल व्यक्त केलेल्या भावना

चार शब्द कृतज्ञतेचे

~~~~~~~~~~

परवा माझ्या दोन पुस्तकांचं प्रकाशन झालं. ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर, धनंजय गांगल, हे विश्वस्त, अरुण जोशी,धनश्री धारप हे सहकारी आणि विश्व साहित्याचे प्रगाढ वाचक आणि भाष्यकार राजीव श्रीखंडे(सोबत पत्नी आणि लेक) अशी मंडळी उपस्थीत होती. पुस्तकांचं प्रकाशन राजीव श्रीखंडे या माझ्या तसेच ग्रंथालीच्याही मित्राच्या हस्ते व्हावं या माझ्या इच्छेला मान देत सुदेशने सगळी धावपळ करून तिला मूर्त रूप दिलं. दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन राजीव (आणि सोबत सौ.राजीव श्रीखंडे) यांच्या हस्ते झालं हा तर सहज जुळुन आलेला सुखद असा भाग्ययोगच.जणू लक्ष्मी-नारायण यांच्याच हस्ते हे प्रकाशन झालं.

गेली तीसेक वर्षे इंग्रजी,जर्मन,फ्रेंच, रशीयन तथा अन्य भाषांतल्या जागतिक वाङमयाचं सतत वाचन, अध्ययन आणि त्यावर सुंदर भाष्य करणारे राजीवजी यावेळी उत्कट बोलले. ‘ गझलच्या उजेडात गझल ‘ याविषयी बोलताना ते म्हणाले ‘ माझ्या इतक्या वर्षाच्या वाचनानुभवाच्या आधारे मी म्हणेन की हे पुस्तक वाचनीय झालंय. ‘ आपलं हे पुस्तक कंटाळवाणं ठरणार नाही या त्यांनी दिलेल्या ग्वाहीमुळे खूप हायसं वाटलं आहे.

धनंजय गांगलनी करकरीत, उत्कट शब्दात आपल्या भावना मांडल्या. मोजके,निवडक,ताशीव शब्दात लिहिलेलं आपलं निवेदन त्यांनी वाचलं. बोलून झाल्यावर खाली ते बसले. तेव्हा मी दाद दिली आणि ते म्हणाले, ‘ हो, हे पुस्तक डिबेटेबल झालंय ‘. हे एेकुन तेव्हा मला छान वाटलं. पण त्याचे अनेक अर्थ आणि ध्वनी एकेक करून मला आता एेकू येताहेत. डिबेटेबल या शब्दात ते अनेक अर्थ व ध्वनी दडलेले आहेत. या पुस्तकातल्या अनेक कथनांवर उलटसुलट चर्चा होऊ शकते,अनेक प्रश्न उद्भवू शकतात, अनेक भलेबुरे मुद्दे उद्भवू शकतात, यातील कथनांची चिरफाड होऊ शकते, खंडनमंडन होऊ शकतं, असे अनेक अर्थ निघतात जे गांगलांनी डिबेटेबल हा शब्द योजून सुचित केले आहेत. गांगलांच्या या शब्दांनी, आपला गझलविचार अजून आपल्याला परिष्कृत करत रहावं लागणार, हा बोध मी अजून दृढ करून घेतला.

सुदेशने हे पुस्तक प्रकाशित करून आजच्या गझलविचाराच्या प्रक्रियेला दिलेली ठळक चालना, राजीवजींनी दाखवलेला पुस्तकावरचा विश्वास आणि धनंजंयजींनी या पुस्तकाच्या निमित्ताने गझलेच्या नव्या विचारमंथनाची अधोरेखीत केलेली गरज ही माझी या प्रकाशनाच्या निमित्ताने झालेली महत्त्वाची कमाई आहे.

गझलेतलं ‘ शुभ्र काही ‘ बघण्यासाठी मला हीच कमाई उपयोगी ठरणार आहे. कृतज्ञ आहे मी तिन्ही मित्रांचा.

आजच्या आपत्तीच्या काळातही अशी आपुलकी, असे मित्र आणि त्यांचा माझ्यावरचा प्रगाढ विश्वास आणि प्रेम माझ्या वाट्याला आलं याबद्दलची कृतज्ञता म्हणून आत्मस्तूतीचा दोष पत्करत त्यांचे शब्द मी इथे मांडलेत. त्याविषयीचं माझं म्हण्णं इथे व्यक्त केलं आहे. सूज्ञ रसिक आणि मित्र हे समजून घेतील.

या सर्व सुंदर निर्मिती व प्रकाशनासाठी अरूण जोशी, धनश्री धारप यांच्याही मैत्रीचा सहभाग आहे. तसेच ग्रंथाली सगणक विभागाच्या योगीता मोरे, सुमेधा कुवळेकर,स्मिता कुलकर्णी आणि अर्चित यांच्या आपुलकी आणि कौशल्याची सोबत आहे.

आणि चित्रकार चंद्रकांत गणाचार्य यांची या दोन्ही पुस्तकांना लाभलेली अर्थवाही मुखपृष्ठे. या सर्वांचे मन:पूर्वक आभार.

रसिक जिज्ञासूंना या प्रकाशनाचा व्हिडिओ वृतांत ‘ग्रंथाली वॉच’ या युट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

ही पुस्तकं रसिकांना थेट ग्रंथालीकडून मागवता येतील.

संपर्क-०२२ २४२१६०५०, २४३०६६२४

बाकी माहिती लवकरच देतो.

धन्यवाद.

~ सानेकर