मुंबई : ग्रंथाली आयोजित साहित्याच्या पारावर या उपक्रमाचा विशेष भाग सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता ग्रंथाली-प्रतिभांगण, वांद्रे येथे आयोजित करण्यात आला होता. ग्रंथालीच्या दिवाळी अंक संच योजनेत समाविष्ट असलेल्या एबीपी माझा दिवाळी, ऋतुरंग, मौज, पद्मगंधा, शब्द रुची या दिवाळी अंकांचे संपादक आणि दोन तरुण निमंत्रित संपादक यांच्याशी गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. तसेच, ‘मौज’चा या वर्षीचा शंभरावा दिवाळी अंक असल्याने या शतकी वाटचालीसाठी व ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकातील निवडक साहित्याचे पंचाहत्तरावे पुस्तक प्रकाशित होत असल्याच्या निमित्ताने या दोन्ही दिवाळी अंकांच्या संपादकांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
मौजच्या संपादक मोनिका गजेंद्रगडकर, ऋतुरंगचे संपादक कवी अरुण शेवते यांचा सन्मान साहित्यिक प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते झाला त्यावेळी मौजचे श्रीकांत भागवत यांनाही सन्मानित करण्यात आले.
‘मौज’ आणि ‘ऋतुरंग’ यांच्या अभिजात आणि परंपरा समृद्ध करणार्या वाटचालीचा तांबे यांनी गौरवपूर्ण उल्लेख यानिमित्त बोलताना केला.
यावेळी ज्येष्ठ समीक्षक प्रा. विजय तापस यांनी ‘मौज’ दिवाळी अंकाच्या मराठी साहित्यातील योगदानाचा आढावा घेतला. तसेच सुप्रसिद्ध स्तंभलेखक अशोक बेंडखळे यांनी ‘ऋतुरंग’च्या दिवाळी अंकामधील दर्जेदार साहित्याविषयी विचार व्यक्त केले.
या दोन संपादकांसह एबीपीच्या ‘माझा दिवाळी’ या अंकाच्या सहसंपादक भारती सहस्रबुद्धे, शब्द रुचीचे संपादक अरुण जोशी, ‘प्रतिबिंब’ या दिवाळी अंकाच्या संपादक प्रज्ञा जांभेकर यांच्याशी डॉ. मृण्मयी भजक यांनी संवाद साधला.
मोनिका गजेंद्रगडकर यांनी मौजच्या शंभर वर्षांच्या परंपरेचा व त्यांच्या आधीच्या श्री.पु. भागवत, राम पटवर्धन, श्रीनिवास कुलकर्णी आदी सर्व संपादकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी निर्माण केलेले मौजचे स्थान सांगताना मौजच्या अंकात साहित्य प्रकाशित व्हावे म्हणून मान्यवर लेखकांपासून जुन्या-नव्या कवींपर्यंत साहित्यिक कसे आतुर असतात व त्यासाठी कसे प्रयत्न करतात हे सांगितले. अंक करताना दर्जा कायम राखण्यात तडजोड न केल्याने अनेकदा आलेले बरे-वाईट अनुभव त्यांनी मांडले.
एक विषय घेऊन त्यावर दिवाळी अंक करण्याचे व त्यासाठी लेखकांची निवड स्वतः करण्याचे धोरण असल्याचे अरुण शेवते यांनी सांगितले. एक विषय घेतला तरी प्रत्येकाचा अनुभव, त्याचा काळ, त्याचा भोवताल भिन्न असल्याने तोच तोपणा येत नाही व विषय अनेक अंगांनी व्यक्त होतो असे ते म्हणाले. नापास मुलांची गोष्ट, मद्य असे अनवट विषय घेऊन त्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर व लेखकांना लिहिते केल्यामुळे ‘ऋतुरंग’चा दिवाळी अंक लक्षवेधी व वाचकप्रिय आहे. यातील निवडक साहित्याचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी वेगवेगळ्या दहा प्रकाशनांनी सहकार्य केल्याचे शेवते म्हणाले. ग्रंथालीचे ‘शब्द रुची’ हे मासिक चाळीसहून अधिक वर्षे सातत्याने प्रकाशित होत असून त्याचे वर्षभरात वेगवेगळ्या विषयावरील विशेषांकही प्रकाशित होतात. यामुळे दिवाळी अंकात एक विषय न घेता, एखाद्या विषयाचा विभाग करून अन्य माहितीपूर्ण व रंजक साहित्य घेतलेले असते असे अरुण जोशी यांनी सांगितले. दोन-तीन पिढ्या वारसा जपलेल्या, ज्यांनी समाजाला विचार दिला, कलेतून आनंद दिला, जीवन समृद्ध केले अशा साहित्य, कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांवर लेख अंकात असल्याचे ते म्हणाले. एबीपी माझा दिवाळी या अंकाचे दुसरेच वर्ष असून या अंकामुळे अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वाहिनीला बातमीशिवाय असणार्या अनेक विषयांना मुद्रित स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा अनुभव व आनंद घेता येत असल्याचे अंकाच्या सहसंपादक भारती सहस्रबुद्धे म्हणाल्या. कोविडसारखी साथ, राजकीय घडामोडी अशा आव्हानांना तोंड देत सुरू झालेला अंक ग्रंथाली व युनिक फीचर्स यांच्या सहकार्याने प्रकाशित होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाशन व्यवसायात पदार्पण केल्यावर आर्थिक आव्हानांना तोंड देताना दिवाळी अंकाचा पर्याय निवडल्याचे ‘प्रतिबिंब’ दिवाळी अंकाच्या संपादक प्रज्ञा जांभेकर यांनी सांगितले. अंकातील मजकूर वैविध्यपूर्ण व दर्जेदार असावा याकडे विशेष लक्ष असल्यामुळे हा अंक वाचकांना आवडत असल्याचे त्या म्हणाल्या. दिवाळी अंक छपाईसंदर्भातले अनुभव इंडिया प्रिंटिंग वर्क्सचे आनंद लिमये यांनी कथन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुदेश हिंगलासपूरकर यांनी ग्रंथालीच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन महेश खरे यांनी केले.
या कार्यक्रमात पद्मगंधा दिवाळी अंकाचे अभिषेक जाखडे आणि वाघूर दिवाळी अंकाचे संपादक कवी नामदेव कोळी हे आभासी पद्धतीने सहभागी झाले.