विनय देशपांडे अनुवादित ‘त्साओचे नरभक्षक’ या पुस्तकाचे प्रकाशन . . . ग्रंथाली प्रतिभांगणच्या वांद्रे येथील वास्तूमध्ये शनिवार, ५ नोव्हेंबर २०२२ रोजी विनय देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या कॅप्टन जॉन हेन्री पॅटरसन लिखित ‘त्सोओचे नरभक्षक’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी सुप्रसिद्ध जाहिरातगुरू व लेखक- दिग्दर्शक-अभिनेते भरत दाभोळकर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर अनुवादक विनय देशपांडे व दोन्ही मान्यवरांशी ग्रंथालीच्या विश्वस्त डॉ. लतिका भानुशाली यांनी संवाद साधताना केवळ पुस्तकाच्या विषयावर चर्चा न होता पर्यावरणाचा ऱ्हास, मानव आणि वन्य जीवांचे साहचर्य कसे असावे या विषयांचा ऊहापोह केला. यावेळी तीनही वक्त्यांनी साहसकथा, पर्यावरण व वन्यजीव या संदर्भात आपापले अनुभव व विचार मांडले.
भरत दाभोळकर यांनी अनुवाद करताना तो शब्दशः करण्यापेक्षा मूळ भाषेतील भावार्थ, वातावरण याचा नव्या भाषेत वाचकाला अनुभव मिळणे हे मोठेच आव्हान असते, त्यामुळे पुस्तकाच्या अनुवादाचे काम अतिशय कठीण व कौशल्याचे असते असे सांगितले. प्राण्यांविषयी असणाऱ्या विशेष आपुलकीमुळे मी पुस्तकातील शिकारीचा भाग सोडून सर्व इतर मजकुराचा आनंद घेतला असे ते म्हणाले. डॉ. मीनाक्षी पाटील यांनी आपल्या लहानपणी गावाकडे निसर्गाच्या सान्निध्यात घेतलेले अनुभव व आफ्रिकेतील भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. गावाला गेले असताना रात्री झोपल्यावर बाजेखाली नागाच्या व मांजरीच्या झटापटींची चित्तथरारक आठवण त्यांनी रंगवून सांगितली. विनय देशपांडे यांच्या चित्रदर्शी लेखनकौशल्याचे त्यांनी कौतुक केले.
विनय देशपांडे यांनी त्यांच्या भटकंतीच्या–गिर्यारोहणाच्या छंदातून मिळालेल्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचा अनुवाद करायला घेतल्याचे सांगितले. मूळ पुस्तक सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचे असल्याने त्या पुस्तकाची भाषा शैलीदार व वाक्ये पल्लेदार आहेत. या मोठ्या वाक्यांचे ओघवत्या मराठीत भाषांतर करणे कठीण होते. तरीही ते चिकाटीने पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश खरे. समारोपाच्या वेळी लतिका भानुशाली यांनी मिठी नदीवरील एका औचित्यपूर्ण अशा परिणामकारक कवितेचे सादरीकरण केले.