कोलाज

मंगेश पाडगावकर – प्रेमकवितेचा तरल आविष्कार

मधुवंती सप्रे

अनेक प्रकारची कविता लिहूनही मूलतः प्रेमकविता लिहिणारे कवी मंगेश पाडगावकर. कवी म्हणून प्रचंड लोकप्रियता या कवीला लाभली. अगदी आजच्या सोशल मिडियाच्या काळातही ते सर्व वयाच्या लोकांमधे प्रिय होते. मंगेश पाडगावकर कवितांचे कार्यक्रम सतत करीत होते. त्यामुळे त्यांची कविता जनमानसात रुजली. विशेषतः बोलगाणी आणि गीतं यांच्या माध्यमातून.

पाडगावकरांनी कवितेत नवे प्रयोग केले. उपहास, उपरोध, राजकीय, सामाजिक जणिवेची कविता. बोलगाणी, वात्रटिका, गझल, बोलगझल, न गझल. मीरा, सूरदास आणि कबीर यांच्या कवितांचे अनुवाद केले. १९४३ला पहिली कविता आणि २०१५ला जाईपर्यंत त्यांनी कविता हा साहित्यप्रकार सतत उत्फुल्ल आणि टवटवीत ठेवला. म्हणजे, सतत बहात्तर वर्षं कवितेचं उत्तम पीक ते घेत राहिले. कवितेचे अभ्यासक ते रसिक या सर्वांना समतोलपणे पाडगावकर आनंद देत राहिले. ही पाडगावकरांची कविता तपश्चर्या अद्भुत आहे.

कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर हे त्यांचे कवितेचे आदर्श. विंदा, वसंत बापट आणि त्यावेळचे सुर्वे, रेगे इत्यादी कवी त्यांच्याबरोबरीचे. त्याचबरोबर अनेक चांगले कवी पाडगावकरांच्या कवितेच्या बहात्तर वर्षांच्या आयुष्यात उदयाला आले. पाडगावकर सर्वांबरोबर होते. म्हणजे विंदा आणि बापट यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काव्यवाचन केलं. पण तरीही सर्वांपेक्षा पाडगावकर कवी म्हणून लोकप्रिय ठरले. कुसुमाग्रज कवी आणि नाटककार, लेखक म्हणून ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. पाडगावकर त्यांना गुरू मानीत.

मंगेश पाडगावकरांना जेव्हा २००३ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला तेव्हा पाडगावकरांनी लिहिलं आहे, ”कुसुमाग्रजांच्या कवितेतून पोषण घेऊन माझी कविता वाढली. ‘कुसुमाग्रज, तुमच्या कवितेचा हात धरून माझी कविता चालायला शिकली.’ असं मी कुसुमाग्रजांना अर्पण केलेल्या ‘त्रिवेणी’ या माझ्या कवितासंग्रहाच्या अर्पण पत्रिकेत म्हटलं आहे आणि म्हणूनच कुसुमाग्रजांच्या नावाचा जनस्थान पुरस्कार मला मिळणं यासारखा दुसरा आनंद नाही. त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरतो आहे, असंच मला जाणवतं आहे.” परंतु त्यापूर्वीच कुसुमाग्रज गेलेले होते. (१० मार्च १९९९)

‘धारानृत्य’ हा पाडगावकरांचा पहिला कवितासंग्रह १९५० साली मौजने प्रकाशित केला. दुसरा ‘जिप्सी’ हा १९५३ साली आला. त्याच्या अकरापेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ‘जिप्सी’च्या प्रस्तावनेत समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी लिहिलं आहे की, ”धारानृत्य’मधील कवितांमागील आत्मनिष्ठा प्रबळ होती. ‘धारानृत्य’ कवितासंग्रहातली कविता ही कुसुमाग्रज आणि बोरकर यांच्या काव्यरीतीचे, ती प्रत्यक्ष अनुकरण करीत नसली तरी त्या रीतीने तिचे नेत्र दिपून गेले होते.” म्हणजेच पहिल्या कवितासंग्रहातल्या कवितांवर कुसुमाग्रज आणि बोरकर यांची छाप होती.

परंतु ‘जिप्सी’ या कवितासंग्रहापासून पाडगावकरांच्या काव्यप्रतिभेने स्वतंत्रपणे उत्तुंग झेप घेतली. म्हणजे १९५३पासून २०१५पर्यंत अखंडपणे पाडगावकरांची प्रतिभा मानवी मनाच्या खोल गाभ्यापर्यंत पोचून निसर्गाच्या गूढ संवेदनांचा स्पर्श अनुभवून फुलत राहिली.

केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी, माधव ज्यूलियन, भा. रा. तांबे, मर्ढेकर अशा अनेक थोर कवींचा एखाद दुसराच काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ते कवीही अल्पायुषी ठरले. एका अर्थाने आधुनिक कवितेची परंपरा आपल्या प्रतिभेने उज्वल करणारे पाडगावकर या शतकातले थोर कवी ठरतात. दुसऱ्या अर्थाने त्यांनी सर्व सामान्यांना कवितेचं वेड लावलं, ते आपल्या गीतांनी आणि कार्यक्रम सादर करण्याच्या शैलीने. तिसरी गोष्ट पाडगावकरांचे २६ कवितासंग्रह आणि १० बाल कवितासंग्रह. इतकी विपुल कविता कोणीही लिहिली नाही. ग. दि. माडगूळकर हे गीतकारांचे मेरुमणी पण त्यांचे ‘जोगिया’ आणि ‘पूरिया’ हे दोनच काव्यसंग्रह, ते मागे पडले. आणि त्यांची चित्रपटगीतं, भावगीतं, गीतरामायण, गीतगोपाल यांना अफाट लोकप्रियता लाभली.

परंतु मंगेश पाडगावकरांनी एकाही चित्रपटासाठी कधी गीत लिहिलं नाही. तरी त्यांची गीतं आणि कविता दोन्ही रसिकांच्या प्रेमाला पात्र ठरली. हा काळाचा महिमा म्हणावा लागेल. ग.दि.मां.पासून विंदा, वसंत बापट, रेगे, सुर्वे, आरती प्रभू, शंकर वैद्य, अनिल, ना. घ. देशपांडे असे अनेक पाडगावकरांना समकालीन असलेले कवी उत्तम कविता लिहीत होते. आरती प्रभू, वसंत बापट, विंदा, अनिल, ना. घ. देशपांडे, शंकर वैद्य यांची गीतंही स्वरबद्ध झाली, गाजली आणि अर्थातच पाडगावकर आदी कवींची गीतं सर्व सामान्यांपर्यंत पोचवण्याचं महत्त्वाचं काम आकाशवाणीने केलं. खुद्द पाडगावकर आकाशवाणीवर नोकरीत होतेच. तेव्हा श्रीनिवास खळे आणि यशवंत देव, पु.ल. त्यांच्याबरोबर होते. आकाशवाणीचा ‘भावसरगम’ हा दर महिन्याचा नव्या गीतांचा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता. आणि खळे, देव यांच्यासारखे प्रतिभावान संगीतकार आकाशवाणीवर नव्या चाली तयार करीत होते. दशरथ पुजारी, गोविंद पोवळे, विठ्ठल शिंदे, दत्ता डावजेकर, प्रभाकर जोग इत्यादी संगीतकारही आकाशवाणीवर हजेरी लावत असत. त्यांचीही गीतं गाजली. आकाशवाणीने (तेव्हा दूरदर्शन कुठे दृष्टिक्षेपातही नव्हतं) या गीतांच्या संगीतकारांना कवी व गायक-गायिकांना त्यांची कला सर्वदूर पोचवण्याची उत्तम संधी दिली.

पाडगावकरांनी आपल्या वेगवेगळ्या कवितासंग्रहात परत अनेक प्रयोग केले गेले आहेत. उदासबोध, ह्यात विडंबनात्मक काव्य तर ‘मोरु’मधे विनोदी कविता, ‘विदूषक’मधे उपरोध, उपहास, सामाजिक जाणिवेची कविता, राजकीय आणि भयानक दारिद्र्यातलं प्रेम, आंतरिक चैतन्य, प्रेम विषयक तत्त्वज्ञान सांगणारी कविता. ‘वात्रटिका’ हा पुन्हा विनोदाचाच प्रकार, ‘त्रिवेणी’मधे संध्याकाळचे गझल, या कवितासंग्रहात ८५ गझला लिहिल्या आहेत. ‘बोलगाणी’ हा त्यांचा कवितासंग्रह नर्मविनोदामुळे आणि पाडगावकरांनी कार्यक्रमातून वाचन केल्याने खूप लोकप्रिय झाला. ‘नवा दिवस’ हा कुमार गटातील मुलांसाठी, तर त्यापेक्षा छोट्या मुलांसाठी दहा कवितासंग्रह त्यांनी लिहिले.

पाडगावकरांची अस्सल कविता ज्यात निसर्ग आणि प्रेम यांचा रंगोत्सव आहे असे अकरा कवितासंग्रह उरतात. त्यातल्याच काही प्रेमकवितांचा विचार या लेखात करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मंगेश पाडगावकरांचे एकूण तेवीस कवितासंग्रह आहेत आणि तीन अनुवादित (मीरा, कबीर, सूरदास) मिळून सव्वीस होतात. या तेवीस संग्रहात ‘तुझे गीत गाण्यासाठी’ आणि ‘सूर आनंदघन’ हे गीतसंग्रह आहेत. शिवाय ‘शर्मिष्ठा’ या संग्रहात चार नाट्यकाव्य आहेत. हे संग्रह तेवीस संग्रहात समाविष्ट आहेत. एकूण गीतांसह कविता संख्या २०००पर्यंत जाते. त्यात अनुवाद व दहा बाल कवितासंग्रह यांचा इथे विचार नाही. ती कविता संख्याही लक्षात घेतलेली नाही. तरीही एकूण काव्यसंपदा आणि अद्भुत काव्यशक्ती पाडगावकरांना लाभली हे अफाटच आहे. या शतकात इतकं कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा दुसरा कवी नाही. शिवाय पाडगावकरांनी गद्य लेखनही केलं आहे. अनुवादित, संपादित, चरित्र, समीक्षात्मक, लघुनिबंध, नाटक अशी पुस्तकांची संख्या अठ्ठावीस इतकी आहे. शिवाय आकाशवाणीसाठी लिहिलेल्या चार संगीतिका. नुसत्या तेवीस कवितासंग्रहातल्या कवितांची सुमारे २००० इतकी आहे. अन्य गीतं, संगितीका पुन्हा वेगळ्याच.

१९५० साली पहिला ‘धारानृत्य’ हा कवितासंग्रह तर ‘अखेरची वही’ २०१३ साली आलेला अखेरचा संग्रह. म्हणजे ६३ वर्षांचा हा कालखंड पाडगावकरांच्या लेखनाचा. परंतु डिसेंबर २०१५ला ते जाईपर्यंत कविता लिहीत होतेच. दरवर्षी लिज्जत पापडाची जाहिरात म्हणून पाडगावकरांनी कविता लिहिली ती पावसावरची असे. थट्टा करताना त्यांना पापडगावकर म्हटलं जाई. परंतु एका खाद्य वस्तूसाठी इतकी अप्रतिम कविता लिहिली गेली. याचा माझ्यासारख्या कविताप्रेमींना नेहमी आनंद होत असे. पावसाळा सुरू झाल्यावर कधी वृत्तपत्रात त्यांची कविता येते इकडे लक्ष असे.

सगळ्यात गाजलेल्या कवितासंग्रह म्हणजे ‘जिप्सी’, याच्या जवळजवळ १०-१५ आवृत्त्या निघाल्या.

मंगेश पाडगावकर यांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या काव्य प्रतिभेसारखंच उत्फुल्ल, उत्कट आणि प्रसन्न होतं बोलताना विनोद करण्याची त्यांची पद्धत समोरच्या व्यक्तीला मोकळेपणा जाणवून देई. त्यांना जाड भिंगाचा चष्मा असल्याने त्यांचे डोळे आपला वेध घेत आहेत, हे समोरच्या माणसाला पटकन कळत नसे. माझ्यासारख्या कवयित्रीला ते दरवेळी फोनवर सांगत, ‘मधुवंती कविता लिहिणं कधी बंद करायचं नाही. लिहीत राहायचं.’ आणि मग एखादं विनोदी वाक्य. याच पद्धतीने ते भेटणाऱ्या कवींना बरोबरीच्या नात्याने वागवत. जवळजवळ २००३ ते २०१५, अशी १२-१३ वर्षं त्यांनी मला दिवाळी अंकासाठी नवीन कविता पाठवली. एकदा पोस्टाने कविता पाठवली की दोन तीन दिवसांनी त्यांचा फोन येई. ”कविता मिळाली का? आवडली का?” असं विचारत. ‘मी इतका मोठा कवी’ वगैरेचा बोलण्यात मागमूस नाही. कवितेवर प्रेम करणारा सच्चा कवी असं मला नेहमी पाडगावकरांबद्दल वाटत आलं आहे. त्यांच्या कविता वाचताना तर ते आसपास आहेत आणि त्यांच्या त्या विशिष्ट आवाजात ते कविता वाचत आहेत, असं जाणवत राहतं. ‘कविता दशकाची’ आणि ‘बोरकरांची कविता’ ही पुन्हा त्यांची  कवितेबद्दलचीच पुस्तकं.

मंगेश पाडगावकरांची गीतं म्हणजे उत्कट अशा प्रेमकविता आहेत. प्रथम त्यांच्या अकरा संग्रहातल्या प्रेमकविता धारानृत्य, छोरी, जिप्सी, अखेरची वही, उत्सव, गिरकी, कविता माणसाच्या माणसासाठी, बोलगाणी, भटके पक्षी, राधा, आनंद ऋतू , मुखवटे.

‘सलाम’ या काव्यसंग्रहाला १९८० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यातली ‘सलाम’ ही कविता १९७५च्या कऱ्हाड इथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाडगावकरांनी सादर केली. ती खूप गाजली. (त्यावेळी संमेलनाध्यक्ष होत्या, दुर्गा भागवत) ‘सलाम’ या काव्यसंग्रहात सामाजिक, राजकीय स्थितीवरच्या कविता. त्यात सामान्य माणसाचं दुःख आहेच.

उत्सव, छोरी, धारानृत्य, जिप्सी, भटके पक्षी, राधा इत्यादी वर उल्लेख केलेल्या सर्व काव्यसंग्रहात सगळ्यात जास्त प्रेमकविता आहेत. ‘जिप्सी’मधे जवळजवळ वीस प्रेमकविता आहेत तर बाकीच्या संग्रहात चार/पाच दिसून येतात. उत्सवमधली ‘वर्षा’ ही कविता. बालकवीं इतकाच पाडगावकरांच्या मनात निसर्ग तुडुंब भरलेला आहे. पण बालकवींनी प्रेयसीसाठी एकही प्रेमकविता लिहिलेली नाही. तर पाडगावकरांनी निसर्गाच्या सुंदरतेत आपलं प्रेम तिच्यावर उधळून दिलं.

उदा.

मऊ ओलसर गवताला
ठाऊक आहे सारे
ठाऊक आहे तेव्हाचे पागलपण
रक्तातील लाख कळ्यांचे वादळ
बुडण्याइतके….. खूप खूप

त्यातलीच ‘संध्याकाळ’ ही कविता

संध्याकाळी
आकाश
तुझ्यासारखेच दूर असते.. दूर नसते
असते सांगत काहीतरी डोळ्यांनी
जे कळते… आणि कळतही नाही…
जे नेहमी ठेवते
निळ्या भटक्या तंद्रीत
ज्याला एक अपार्थिव सुंगध असतो
तुझ्या सहवासाचा.

या दोन्ही कविता म्हणजे पाऊस आणि आकाश ही निसर्गाची चिरतरुण रूपं त्यांच्या प्रेमाचं रूप घेऊनच प्रकटतात.

‘मिटून घेतले’ या कवितेत प्रेमी युगुल रात्री भेटतात. ती रात्र ही दंव भरली पण रात्रीला ते दंव कळत नाही. मग,

मिटुनी घेतले माझ्यात तुला
सर्वस्वाचा जिथे पहारा
तुझ्यात मी ओथंबुन बुडलो
गाढ जळातून पहाटतारा

पुन्हा ‘रात्र’ कवितेत

रात्र :
सर्व घेणारी
रात्र :
सर्व देणारी

दुसरी ‘सूर’ ही कविता

अज्ञाताच्या पैल दूर
होती जन्माची ओळख
पावसात न्हात न्हात
होता घुमत काळोख
सूर दाटले गळ्यात

मंगेश पाडगावकरांनी निसर्गाच्या साहचर्याने प्रेमाची अनेक रूपं आपल्या कवितेतून मांडली. निसर्गातील रंग, गंध, छाया, प्रकाश, निसर्गाची सर्व ऋतूंमधली विलोभनीय रूपं आणि त्यातल्या संवेदना पाडगावकरांना वेढून टाकतात. निसर्गाच्या सूक्ष्मअतिसूक्ष्म छटांमधील सौंदर्य पाडगावकराचं मन टिपून घेत असतं. त्या सौंदर्याचं चिंतन त्यातला आशय समजून घेत त्यांना बेहोषी जाणवते. त्यांची भाववृत्ती निसर्गाच्या सौंदर्यानुभवाने मनातल्या तरल प्रेमाला साद घालते. मग ती भेटते आणि निसर्गातली त्या त्या वेळची हालचाल तिला आणि त्यांना मोहित करते खोल खोल डूबी घेण्यासाठी.

पाडगावकरांनीच लिहिलं आहे, ‘मला आत्मनिष्ठा शब्दाचा अर्थ जाणवत गेला आणि कविता बदलत गेली. सूक्ष्म तरल संवेदना रंग-गंधाशी एकरूप होत गेल्या. निसर्गाने मला खऱ्या कवितेची प्रेरणा दिली. निसर्ग खऱ्याखुऱ्या अनुभूतीचा भाग झाला. माझ्या अनुभवाच्या स्पंदनाचा सहज असा सुसंवाद निसर्गाशी साधला जातो. निसर्गचित्र न रेखाटता अभिव्यक्तीचं तंत्र ठरत असतं. माझा अनुभव निसर्गप्रतिमांशी एकवट झालेला असतो.

उदा.

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरींमधुनी
शीळ घालतो वारा

यात संथ निळे पाणी आणि शुक्राचा तारा नुसत्या सूचक प्रतिमा असतात. मनातल्या गूढ संथ निःशब्दतेत उमलणारा सृजनाचा क्षण मला व्यक्त करावयाचा असतो.’

‘शर्मिष्ठा’ हे चार नाट्यकाव्याचे पुस्तक यात ‘शर्मिष्ठा’, ‘बुद्ध’, ‘कवी’, ‘प्रभंजन’ अशी चार नाट्यकाव्यं आहेत. हे १९६० सालचं पुस्तक पत्नी यशोदा यांना अर्पण केलं आहे.

पाडगावकरांचे नाट्यकाव्याचं ‘शर्मिष्ठा’ हे पुस्तक तर १९५६ राधा भिल्लीण, १९५७ जनाबाई, १९५८ वाट पंढरीची, १९६० ख्रिस्तजन्म ह्या आकाशवाणीसाठी लिहिलेल्या संगीतिका. या तर कुठे उपलब्ध नाहीत.

‘राधा’ हे २००० सालचं कवितेचं पुस्तकही यशोदा यांना अर्पण केलं आहे. पाडगावकरांनी अर्पण पत्रिकेत लिहिलं आहे, ‘यशोदा, या कविता तुझ्यासाठी’ त्यानंतरची पुस्तकं म्हणजे आनंदऋतू (२००४) यात ७१ कविता, सूर आनंदघन (२००५) यात ६५ गीतं आहेत. तुझे गीत गाण्यासाठी १०३ गीतं आहेत. मुखवटे (२००६) यात ७९ कविता, गिरकी (२००८) यात ८८ कविता, अखेरची वही (२०१३) यात ८० कविता आहेत.

परंतु पाडगावकरांची काव्यप्रतिभा किती चौफेर विहरत होती, याचा अंदाज काव्यसंग्रहाच्या, गीतांच्या आणि संगीतिकेच्या यादी वाचनाने लक्षात येतो. यातल्या प्रत्येक कवितेचा, गीताचा अभ्यास करणं म्हणजे तो पीएचडीचा अभ्यास ठरेल.

या लेखात पाडगावकरांच्या काही प्रेमकवितांवर लिहीत आहे. कारण त्यांच्या प्रेमकवितांची संख्याही खूप आहे. ही त्यांची काव्यसर्जनशीलता आधी लिहिल्याप्रमाणे निसर्गाचं बोट धरूनच दौडत असते. तो निसर्ग त्यांच्या प्रेमाचा फक्त साक्षीदारच नव्हे तर त्याच्याकडून कवीला जी विलक्षण अनुभूती प्रत्ययाला येते; त्यातून कविता जन्म घेते. कवीच्या अनुभूतीचं प्रतिभेचं कार्य म्हणजे विश्वाच्या निरनिराळ्या घटकांतून भावनानिष्ठ समतानता निर्माण करणे. त्यातून कवीला निसर्गाच्या भावनेचा सूर ऐकू येतो. कवीनेच लिहिल्याप्रमाणे ‘निसर्ग ही माझी कवितेची पहिली प्रेरणा आहे.’ पाडगावकरांच्या प्रेमकवितेत निसर्ग ओसंडून वाहत असतो. त्यांच्या अनुभव प्रतिमांना, शब्दांना अंकुर फुटू लागतात.

‘आनंदऋतू’ या कवितासंग्रहातल्या त्यांच्या ‘भाषा’ या कवितेत ते लिहितात,

झाडांना खोल खोल कळतं काही
पण ते सांगू शकत नाहीत
तेव्हा झाडाला फुलं येतात
फुलं असतात भाषेचा जन्म
किंवा फुलं म्हणजे जन्माची भाषा

पाडगावकरांच्या कवितेत निसर्गातले काही शब्द पुनःपुन्हा येतात. झाड, फूल, पाऊस, मोर, पाखरू, आभाळ, पक्षी, वारे, तारे आणि ‘गाणं’. गाणं हा तर पाडगावकरांच्या काव्य मनोवृत्तीचा, त्यांच्या सृजनाचा मर्मबंध आहे. ‘कविता माणसांच्या माणसासाठी’ यात त्यांची कविता आहे, ‘गाणं माणसाचं माणसासाठी’, ‘मुखवटे’मधे ‘गाणाऱ्या गळ्याचा पाऊस’, ‘नवा दिवस’मधे तर ‘गाण्याचे झाड’, आनंदाचे गाणे, झुळझुळ गाणे, बालकृष्णाचे गाणे, पाऊस गाणे, गाणं लागा म्हणू, गाण्याचा पत्ता लिहून घ्या शिवाय त्यांच्या गीतांमधे गाणं आणि पाऊस हातात हात घालून येतात. आनंदऋतूमधे ‘पाऊसझाडे’ या कवितेत ते लिहितात –

पाऊस नावाचे
एक झाड असते
सरीच्या फांद्याचे
थेंबाच्या पानांचे
कधी तो मुसळधार वृक्ष असतो
त्याची मुळे
आभाळाच्या भुईत न दिसणारी
ढगांच्या मातीखाली खोल

तर ‘गिरकी’मधे झाडांच्या कविता. झाड, आनंदाचं झाड, झाडं भिऊ लागली आहेत, झाडं आणि पोपट, बहर, झाड घरासमोरचं.

तर ‘गिरकी’मधलं गाणं, ही कविता म्हणजे प्रेमकविता गाण्याचा उत्कृष्ट व उत्कट नमुना आहे.

तुझ्यासोबत चांदण्यातला
बिलगणारा वारा…. गाणं
आणि माझे श्वास तुला ऐकु येणं…. गाणं
तू केसात माळलेला
अबोलीचा वळेसर… गाणं
कुठलीही वाट माझी
तुझ्या घरापाशी येणं… गाणं
मी तुला विचारलं
आठवतं का?… गाणं
तू काहीच न बोलता
माझ्याकडे पाहिलंस … गाणं
कटकटीची गिचमिड सगळी
हात गुंफुन ओलांडणं… गाणं
आपण सोबत असण्याची
स्वरांनी वाट पाहणं… गाणं

तर ‘जिप्सी’मधल्या ‘तू असतीस तर’ या कवितेत ते लिहितात,

तू असतीस तर झाले असते ।
गडे उन्हाचे गोड चांदणे ।
मोहरले असते मौनातुन ।
एक दिवाणे नवथर गाणे ।’

तर ‘राधा’मधे पुन्हा गाणं येतं. कवितेचं शीषर्क आहे ‘गाणं सांगू येतं कुठून?’

गाणं असतं वाऱ्याचं,
पहाटेच्या ताऱ्याचं.
गाणं शब्दात मावत नाही,
हावऱ्या हातात गावत नाही.
गाणं पक्षी वाचत जातं,
स्वतःतच नाचत जातं.
गाणं सांगू येतं कुठून?
डहाळीतून ओंकार फुटून.
गाणं प्राणात रुजून येतं,
हिरवंगार भिजून येतं.
सगळं सगळं गाण्याचं,
आभाळ जसं पाण्याचं.

‘अजून’ या कवितेत,

तू लाजून पाहिलेलं
पाणी अजून तुझ्या नादात गात असतं
पाऊस तुझ्या सलगीचा
माझं असणं ओथंबून न्हात असतं!

‘तू असशी’ या कवितेत,

तू असशी गाण्यातुन माझ्या,
तरि गाण्याच्या पलीकडे;
पलिकडल्या झाडाचे पडती
असे अलिकडे फूलसडे.
शब्दांमधे असून सारे,
गाढ स्तब्धता पलीकडे;
जसा तुझ्या मी जवळी नसुनी
असतो अगदी तुझ्याकडे.

पाडगावकरांनी प्रेमाचं तत्त्वज्ञान सांगितलेली कविता ‘विदूषक’ या कवितासंग्रहात आहे. कवितेचं शीर्षक आहे, ‘जेव्हा आपण प्रेम करतो’

जेव्हा आपण प्रेम करतो
तेव्हा आपल्या शर्टाला खिसा नसतो
तो तिचा असतो
ती त्याची असते
कुरुप गवयी रंगून गाताना
जसा सुंदर दिसतो
तसे आपण सुंदर दिसतो
जेव्हा आपण प्रेम करतो
तेव्हा आपण आपण नसतो
आपण असतो कोणी अनोखे जादुगार
कंडम बरगड्यात
गंध ऊतू जाणारी फुलबाग फुलवणारे

अशी पाडगावकरांनी आणखी तीन कडवी लिहिली आहेत. सामान्य माणसांच्या प्रणय भावनेत कसा असामान्यत्वाचा प्रत्यय येतो. याचं हे प्रत्ययकारी चित्रण आहे. माणसाने आयुष्यात सांकेतिक का होईना पण प्रेम करावं. त्यामुळे अत्यंत निकृष्ट जीवनातही प्रेमाने गंध ऊतू जाणारी फुलबाग फुलते.

आंतरिक चैतन्य हेच खरं जीवनाला आधार देतं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला समर्थ करतं आणि त्याच्या मुळाशी असतं माणसाला लाभलेलं प्रेमाचं वरदान. भयानक दारिद्र्यात सुद्धा माणसं प्रेमामुळे तग धरून जगू शकतात.

पाडगावकरांना निसर्गातून जी आत्यंतिक अनुभूती मिळते ती त्यांच्या कवी मनाला भुलवते. वेढून टाकते. गाणं गायला उद्युक्त करते. आणि हा निसर्ग त्यांना उत्कट आशयाची सखोल स्पंदनं शब्दातून व्यक्त करायला लावतो. नाचरा, गूढ, गाणं गाणारा, पावसात भिजणारा निसर्ग कवीच्या मनात तृप्त, अतृप्त, विरही प्रेमाचं बीज पेरीत असतो. कवीच्या नकळत निसर्ग त्याच्या तनामनात सामावून जातो.

पाडगावकर सतत कवितेच्या विचारातच वावरत असावेत. इतकं की कवितेचं अभिनव सौंदर्य त्यांची सहजवृत्ती आहे हे लक्षात येतं.

निसर्गच मनात तुडुंब भरलेला, त्याच्या चिंतनाने जी भाववृत्ती निर्माण होते ती सौंदर्य घेऊनच येते.

तुडुंब तुडुंब मेघ भरला
अनावर अनावर झरला

अशी त्यांची लेखणी अनावर होत होत अप्रतिम कविता लिहिते. समृद्ध जीवन जगण्याच्या स्त्री-पुरुषांच्या प्रेमाबद्दल त्यांची सौंदयपूर्ण प्रेमकविता आहेच. परंतु सर्वसामान्य माणूस हलाखीत जगत असला तरी प्रेमामुळे त्यांचं आयुष्य काही काळापुरतं का होईना समृद्ध होतं. ही त्यांची प्रेमाबद्दलची वैचारिकता आपल्याला प्रगल्भ करते. प्रेम हे कालातीत आणि वर्गरहित आहे. ॲरिस्टॉटलने लिहिलं आहे, प्रत्येक मोठा कवी हा आयुष्यभर निरनिराळ्या साहित्यरचनेतून एकाच प्रश्नाचं उत्तर देत असतो. Why should man suffer? माणसाच्या वाट्याला दुःख का येतं?

परंतु माणसाच्या आयुष्यातलं प्रेम हे माणसाला कोणत्याही विपरीत परिस्थितीत काही काळापुरतं दुःख, क्लेश, संकट विसरायला लावतं. हे पाडगावकरांनी आपल्या शेकडो कवितांमधून सांगितलं आहे. हे पाडगावकर या कवीचं वैशिष्ट्य आहे. खरंच पाडगावकरांनी जे वाचकाला रसिकाला दिलं आहे ते फार सुंदर आहे. त्यांच्या कवितेत एक नैसर्गिक लालित्य प्रत्ययाला येतं. त्यांना निसर्गाच्या हालचालीतून भव्यदिव्य सौंदर्याचा साक्षात्कार होतो. त्यांची कविता, गीतं ही निसर्गातलं प्रत्येक गूज प्रत्येक रहस्य समजून घेत, निसर्गाच्या संगीतात आपला सूर मिसळण्याची उर्मी जागृत करीत, निळाईने भरलेल्या अथांग अवकाशात, त्यांचं संज्ञाविश्व पावसाने आणि त्याच्या सुंदरतेने भारलेले आहे हे जाणवतं.

सुरवातीला पाडगावकरांच्या प्रेमकवितांचा विचार मांडताना मी त्यांची प्रेमगीतं लक्षात घेणार नव्हते. परंतु सहज म्हणून त्यांची गीतं वाचताना त्यातल्या पाच गीतांनी माझ्या मनाचा अंतरंगाचा फार पूर्वीपासून ठाव घेतलेला आहे. ती गीतं म्हणजे जणू माझीच आर्त भावना आहे. अशा नेणीवेतून मी ती जपलेली आहेत. ती आहे –

१) शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले

२) जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले ।

   वाटेत तुझ्या मी फूल ठेवूनी गेले ।

३) कधी बहर कधी शिशिर

   परंतु दोन्ही एक बहाणे

४) अशी पाखरे येती

५) असा बेभान हा वारा … नदीला पूर आलेला

पैकी

‘असा बेभान हा वारा कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ’

हे गीत-कविता वाचताना, लतादीदींच्या स्वरात ते गाणं ऐकताना भा. रा. तांबे यांच्या ‘कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी’ ही कविता आठवते. आणि दोन कवींमधलं प्रतिभा साधर्म्य नवल सांगून जातं. कारण वस्तुजातामधलं सौंदर्य आणि आर्तता प्रतिभावंतांना जेव्हा अस्वस्थ करते, तेव्हा त्याचे पडसाद शब्दामधून व्यक्त होतात. असं अनेक अभिजात कवींच्या बाबतीत घडतं. कारण शेवटी ‘प्रेम’ ही अलौकिक अशी देणगी निसर्गानेच माणसाला दिली आहे.

या गीताचा अजून एक संदर्भ मला मिळाला. तो पाडगावकरांची पत्नी यशोदा यांच्या पुस्तकात (‘कुणीतरी कुणास्तव’).

त्यांनी लिहिलंय – ”त्याच्या कवितेत गाण्यात कुठे सूचक जरी माझा उल्लेख आला तर तेव्हा मला आनंद वाटायचा. पण लगेच निसर्गातला दृष्टांत पुढे आला की मी त्याला म्हणायची, ‘लगेच निसर्गाकडे का जातोस? फक्त माझ्यावर पूर्ण कविता लिहिना!’ तो म्हणायचा, ‘मला तसं करता येणार नाही. हीच माझी स्टाईल आहे!’ मला खूप वाईट वाटायचं. गाण्याच्या बाबतीतही तसंच झालं,

‘असा बेभान हा वारा…’
‘जेव्हा तुझ्या बटांना…’
‘लाख चुका असतील केल्या…’

ही गाणी कशी तयार झाली. हे फक्त मलाच ठाऊक आहे. अशावेळी आनंदाचे, तृप्तीचे बरेच प्रसंग येत असत.”

यशोदा या पाडगावकरांच्या प्रेयसी आणि पत्नी त्यामुळे त्यांनी या गीतांबद्दल जे लिहिलं आहे की ‘ही गीतं कशी तयार झाली हे फक्त मलाच ठाऊक आहे.’ यात खूप काही भावनांची, आर्त प्रेमाची, शुद्ध प्रणयाची आणि निसर्गाच्या सान्निध्याची सरमिसळ आहे. ती शब्दात व्यक्त होताना ही गाणी गीतं म्हणून आली.

पाडगावकरांच्या ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती । दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती’ ही चार कडव्यांची कविता-गीत. पहिलं कडवं ‘चंद्रकोवळा…’ पासून सूरू होतं ते ‘काळोखाच्या राती’ला संपतं. इथे चंद्र हा प्रेमाचा निदर्शक तर शेवटचं कडवं ‘कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी, या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजून ही गाती.’ यामधे अगदी शुद्ध विरहाची वेदना आहे. परंतु दुसरं कडवं आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगून जातं.

फुलून येता फूल बोलले
मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परी निरंतर
गंधित झाली माती… अशी पाखरे

अत्यंत चटका लावणारं सत्य ते नाजूक फूल सांगून जातं. ‘मी मरणावर हृदय तोलले’ पण माती गंधित करून जाणार. इथे हा एका परीने निसर्गातल्या प्रेमाचा साक्षात्कार कवीला जाणवतो.

खरंतर मातीचा गंधच त्या फुलात दरवळतो. पण फूल म्हणतं, ‘मी मरणावर हृदय तोललेलं आहे. मी सकाळी उमलतो आणि संध्याकाळी नसतो. फक्त गंध देऊन जातो’. ही सत्य घटना रोज घडणारी पण पाडगावकर किती अचूक आणि भावपूर्ण शब्दांनी ती मांडतात.

पुन्हा तिसरं कडवं हे गदिमांच्या ‘खेड्या मधले घर कौलारू’ या गीताची आठवण करून देणारं आहे. त्या ओळी अशा –

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समई मधूनी अजून जळती वाती

ग.दि.मा. पूर्वीच लिहून गेले,

माज घरातील उजेड मिण मिण
वृद्ध काकणे करीती किण किण
किण किण ती हळू ये कुरवाळू
दूरदेशीचे प्रौढ लेकरू

दोन कवींची दोन कडवी आणि त्यातली वृद्ध मातापित्याची प्रेम-वात्सल्य यांनी परिपूर्ण अशी आठवण आपल्यालाही हुरहुर लावते.

पाडगावकरांचं हे गीत किंवा काव्य म्हणजे प्रेम, उदात्तता, विरह, तत्त्वज्ञान याचं सुंदर उदाहरण आहे.

जे तुझ्याच साठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फूल ठेवूनी गेले

पूर्ण गाणं हे प्रेयसीचं मनोगत आहे. कारण तिची ही प्रीती तिच्या व्यतिरिक्त कुणाला ठाऊकच नाही. अबोल असं हे प्रेम.

मी दुर अलक्षित तुजसाठी तळमळले
त्या फुलात माझे हृदय ठेवूनी गेले

तिचं प्रेम म्हणजेच ते फूल. फूल हे निसर्गाचं अपत्य म्हणून ती म्हणते, ‘फुलासारखी अबोल माझी प्रीत.’ पुन्हा ते फूल फक्त त्याच्यासाठीच उमललं होतं. वा! प्रेयसीची ही प्रेमाची व्याख्या आपल्याला चकित करते. फुलासारखं तिचं कोमल मन दुखावलं गेलं. विरहाने तडफडलं त्यामुळे आपल्यालाही तो आर्त भाव विचलित करतो.

शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला मी पाहियले अन् घडू नये ते घडले

बस्स! फक्त या दोन ओळीतच प्रेमाचं गूज सांगितलं आहे. कारण कुठेही जगाच्या पाठीवर दोन व्यक्तींमधे (स्त्री-पुरुष) हे घडू शकतं. तिथे धर्म, भाषा, चालीरीती, भौगोलिक सीमा कशाकशाचा अडसर नसतो. वरील दोन ओळी म्हणजे अस्सल प्रेमाचा शीलालेख आहे. दोघं भेटल्यावर सगळंच नवंनवं वाटायला लागतं. तिकडे आकाशात एकच चंद्र नसतो तर लक्ष लक्ष चंद्र असतात. आणि ते तुझ्या माझ्या गात्रांमधे विरघळूनही जातात. इतकी प्रेमाची धुंदी, इतकं प्रेमाचं पौर्णिमेच्या रात्रीने दिलेलं रसायन रंध्रारंध्रात भिनून जातं. आणि तुझ्या मिठीत विश्वाचं रहस्य उलगडतं.

यापेक्षा प्रेमाचा वेगळा अनुभव कसा वर्णन करता येणार? पाडगावकरांनी हे गीत लिहिताना चित्रपटाची बंदिस्त, पटकथा असावी तसं सगळं भावदृश्य शब्दांनी चित्रित केलं. त्यामुळे प्रत्येकालाच हे गीत आपलं वाटतं. हा प्रेमाचा अनुभव सार्वत्रिकच आहे.

‘कधी बहर कधी शिशिर’ यात पुन्हा जीवनाचं गाणं आहे. नव्हे ते जीवनसंगीत आहे. आणि हे जीवनसंगीत एक आर्त विराणी आहे. वेलींना बहर होता, गाणारा लाजरा पक्षी होता, आपली भेट ही घट्ट मिठी होती, आपण फुलांना बिलगून गाणीही गायली. दोघांचे सूरही जुळले. आपण पुन्हा गाणंही गायलं. मग? आता हे सगळं कुठे गेलं? आता कातरवेळेला आठवण येत राहते. ती हुरहुर जीवघेणी असते.

म्हणजे इतकं होऊनही दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या, कधी न भेटण्यासाठी. डोळ्यातले अश्रू माझ्या ओठावरचं गाणं पुसून टाकतात. पण तुझ्या आठवणी कशा पुसणार? असा प्रश्न ते या गीत-कवितेतून मांडतात.

सगळी कहाणी सांगून झाली, पण नेमकं काय घडलं? आर्त विराणी का झाली प्रेमाची? याचं उत्तर आपण शोधायचं आणि ते सामाजिक व्यवस्थेत दडलेलं आहे.

पाडगावकरांच्या समग्र कवितेचा वेध घेणं इथे शक्य नाही तरीही ज्या कवीने आधी लिहिल्याप्रमाणे १९५३ ते २०१५ पर्यंत म्हणजे जवळजवळ ६०/६५ वर्ष आपल्या काव्याने रसिक, वाचक, समीक्षक यांना आनंद दिला. त्यांचं काव्यस्मरण करण्याची स्फूर्ती त्यांच्याच कवितेने दिली. त्यांच्या कवितेचं कोणतंही पुस्तक उघडावं आणि आनंदात बुडून जावं किंवा त्यांनी जे कवितेत प्रयोग केले. ते उपरोध-उपहासाचं राजकीय, सामाजिक विडंबनाचं काव्य वाचून वाचकाने विचार करायला लागावं ही पाडगावकरांची कवितेची ताकद आहे.

फक्त प्रेमकविता लिहूनही पाडगावकरांना प्रसिद्धी मिळालीच असती, परंतु ‘जे न देखे रवी, ते देखे कवी!’ या उक्तीचा आणखी अर्थ पाडगावकरांनी उलगडून दाखवला. समाजातला ढोंगीपणा, राजकारणातली बजबजपुरी, माणसामाणसांमधले हेवे-दावे, दूरत्व, माणसामधल्या अपप्रवृत्ती याचाही समाचार उपहास, उपरोध, विडंबन यातून पाडगावकरांनी घेतला. ज्या समाजात आपण राहतो; तिथे भवताली काय चाललं आहे? त्यामुळे मनात दाटून आलेली चीड, संताप, त्यांनी आपल्या कवितेतून मांडली.

इतकंच काय, त्यांनी कर्मकांड करणाऱ्या समाजाला निसर्गातलं सौंदर्य उलगडून दाखवून, कशाला तीर्थयात्रा करतोस? ‘तुझे आहे तुजपाशी’ हे सांगताना पाडगावकर लिहितात,

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी ।
झाड फुलांनी आले बहरून
तू न पाहिले डोळे उघडून
वर्षाकाळी पाऊसधारा
तुला न दिसला त्यात इशारा

कधी हातात नांगर धरून मातीतून मोती पिकवले नाहीस आणि अभाग्या भगवं नेसून फिरतोस? देव इथेच तर आहे. कुठे?

देव बोलतो बाळ मुखातून
देव डोलतो उंच पिकातून

सुंदरता इथेच भरून राहिलेली आहे. इथेच तीर्थक्षेत्र आहे. अंतरातच देव असतो. हे रोजचं जगण्याचं तत्त्वज्ञान अगदी साधंसुधं, सहज कळणारं पाडगावकर सांगून जातात आणि त्या शब्द सामर्थ्यात त्यातला आशय, अर्थनिर्णयन याचा एक वेगळाच अनिर्वचनीय आनंद मिळतो.

सत्य हेच काव्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. या निसर्गातलं सत्य उकलून दाखवणं, मानवी जीवनाचे पदर उलगडून दाखवणं आणि निसर्गाचं सौंदर्य, निसर्गाचं गाणं गाणारं अद्भुत जग वाचकांना शब्दातून हिंडून दाखवणं म्हणून तर कवी हा भाष्यकार असतो. आणि हा विलक्षण प्रत्यय मंगेश पाडगावकर आपल्या काव्य संभारातून आपल्याला देतात. या थोर कवीचं हे थोरपण मला जाणवलं, आतून ऊमलून आलं ते असं.

(कविवर्य मंगेश पाडगावकर – जन्म १०।३।१९२९,  मृत्यू ३०।१२।२०१५)