ग्रंथाली

विश्‍वस्त संस्था

नोंदणी क्रमांक ई- १३८२५ (मुंबई)

पुस्तके आणि इतर सांस्कृतिक उपक्रम यांविषयी आस्था असणार्‍या आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ग्रंथ पोचावेत या भावनेने अस्वस्थ असलेल्या लोकांच्या धडपडीचे नाव आहे – ‘ग्रंथाली’ वाचक चळवळ.

सेहेचाळीस वर्षांपूर्वी एका वेगळ्या स्पंदनाने उठलेला हा आवाज महाराष्ट्रभर तर पोचला आहेच, व महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे ग्रंथवेडा वाचक आहे तिथे तिथे ग्रंथाली पोचली आहे. पुस्तक प्रकाशनव्यवहाराचा शोध, एवढ्या साध्या उद्दिष्टाने सुरू झालेली ही आज संस्कृतीच्या सर्वांगांना स्पर्श करत ‘शोध व संवाद’ हा दृष्टिकोन ठेवून ग्रंथप्रसार करत आहे.

समाजातल्या सर्व थरांत पोचायचे तर समाजातील कुठलाही विषय, कुठलाही स्तर व कुठलेही कालीक भान हे दुर्लक्षित नसते. हे जाणून गेल्या सेहेचाळीस वर्षांत चळवळीने विविध पुस्तके प्रकाशित केली :

वैद्यकसत्ता, क्लोरोफॉर्म यांसारखी वैद्यकशास्त्रावरील;

बलुतं, उपरा, आभरान, कार्यकर्ता, कोल्हाट्याचं पोर यांसारखी तळाच्या वेदना व्यक्त करणारी;

आमचा बाप आन् आम्ही, आंबेडकर आणि विनोद यांसारखी दलित चळवळीतील नवी स्पंदनं प्रकट करणारी;

गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका, राजकपूर व त्याचे चित्रपट ही चित्रपटक्षेत्रातील;

बाइंडरचे दिवस, पडघम, महानिर्वाण, कारान, ही नाट्यक्षेत्रातील प्रयोगांची नोंद घेणारी;

वाटेवरच्या कविता सारखे काव्यप्रांतातील नवीन आशय पकडणारी;

रिंगण, संकल्प, बंद दरवाजा, स्वतःला शोधताना, संवाद, पांगिरा, आंदोलन, पारध अशी लेखनाच्या मांडणीत, धाटणीत नवीन प्रयोग करणारी;

स्त्री-पुरुष, मी तरुणी, सुकलेले अश्रू, मुलगी झाली हो ही स्त्री-मुक्तीचा जाहीरनामा मांडणारी;

ज्ञाताच्या कुंपणावरून, समाज आणि धर्म, मी हिंदू झालो, होमी भाभा, कोसंबी यांसारखी ज्ञानविज्ञानाची कास धरणारी;

अशी अनेक पुस्तके.

साहजिकच त्यातील बहुतेक सर्व पुस्तकं मराठी साहित्यविश्‍वात भर घालणारी ठरली. बर्‍याच पुस्तकांनी राज्य सरकारच्या पुरस्कारापासून साहित्य अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत; एवढेच नव्हे तर फोर्ड फाउंडेशनच्या लेखनवृत्तीपर्यंत साहित्य पुरस्कार मिळवले.

केवळ बहुस्पर्शी दृष्टिकोन नाही तर वाचकांची बांधिलकी स्वीकारली. पुस्तके विकत घेऊन वाचनाची सवय लागण्यासाठी ती माफक किमतीत मिळणे आवश्यक होते. चळवळीने द्विस्तरीय किंमत ठेवून वाचकसदस्य होणार्‍यांना घसघशीत सवलतीत पुस्तके दिली. पुस्तकांचा प्रसार व्हायचा असेल तर आवाहन व्यक्तिगत वाचकाला केले पाहिजे. त्याने मनावर घेतले तरच पुस्तकांचा खप अमर्याद वाढू शकेल आणि कमी वाचक म्हणून जादा किंमत व म्हणून पुन्हा कमी वाचक हे दुष्टचक्र भेदणे शक्य होईल, या विचाराने चळवळीने व्यक्तिगत ग्राहकाला अधिक झुकते माप दिले. व्यक्तीपेक्षा संस्था अधिक सक्षम या सूत्रानुसार व्यक्तिगत ग्राहकापेक्षा ग्रंथालये ही ग्रंथाली चळवळीला नेहमीच सबळ वाटली आहेत. शिवाय ग्रंथाली  जे काम करते तेच काम एका वेगळ्या प्रकारे ग्रंथालये शंभराहून अधिक वर्षे करत आहेत. त्यामुळेच ग्रंथाली चळवळीला राज्य ग्रंथालय संघाचे कायम सहकार्य लाभले आहे. परंतु या द्विस्तरीय किंमतीचे जे आकर्षण व्यक्तिगत ग्राहकासाठी ठेवले आहे, त्याचा लाभ ग्रंथालयाला घेता येत नाही. त्याला पुस्तक-विक्रेत्यामार्फत मिळू शकते तेवढीच सूट ग्रंथाली चळवळीच्या प्रकाशनांवरही उपलब्ध असते.

माफक किमतीबरोबरच ग्रंथप्रसारासाठी ग्रंथाली कल्पक तंत्र वापरले. सार्‍या महाराष्ट्रभर रान उठवणारी 18 जिल्ह्यांतील 1982 ची ग्रंथप्रसारयात्रा, 1983 चा ग्रंथएल्गार, जून 84 ची विजय तेंडुलकरांची संवादयात्रा, फेब्रुवारी 85 मधील स्त्री-मुक्तीयात्रेतील सहभाग, डिसेंबर 1986 मधील 50 ठिकाणी प्रदर्शनांचे ग्रंथमोहोळ आणि डिसेंबर 1987 मधील शिवाजी पार्कवरील बालझुंबड, १९९० वाचन परिषद, इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने १९९१ नेहरू सेंटर साठी ‘चलो नेहरू सेंटर भारत कि खोज मे’ हा उपक्रम मुंबईतील सर्व शाळांसाठी राबवला. १९९४ -९५ , (पु.ल. देशपांडे यांच्या पाच्याहात्तरी निमित्त)  विपुल ग्रंथयात्रा, १९९९ पुणेविद्यापीठ सुवर्ण मोहोत्स्वानिमित्त ग्रंथप्रसारयात्रा  आणि / कार्यक्रम, २००० : युनिसेफ  साठी शिक्षण प्रकल्पा अंतर्गत ग्रंथप्रदर्शन व कार्यक्रम चंद्रपूर,भंडारा,अमरावती, यवतमाळ, सोलापूर,   २३ डिसेंबर २०११ : महाराष्ट्रात १०० ठिकाणी ग्रंथप्रदर्शन सेन्ट्रल बँक शताब्दी निमित्त, २०११  को.म.सा.प. साहित्य संमेलन दिनकर गांगल अध्यक्ष या निमित्त कर्मभूमी ते जन्मभूमी ग्रंथप्रसार यात्रा, २०१२-२०१३ शंभर ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि छायाचित्रप्रदर्शन, यशवंत चव्हाण जन्मशताब्दी निमित्त २०१३ डॉ नरेंद्र जाधव संवादयात्रा, २०१४ थिंक महाराष्ट्र डॉट कॉम बहुमाध्यम यात्रा सहभाग सोलापुर.

केवळ ग्रंथयात्रा, ग्रंथप्रदर्शनेच नाहीत तर गावोगाव वाङ्मयीन चर्चेचे व सांस्कृतिक स्वरूपाचे कार्यक्रम आणि वाचकमेळावे ग्रंथाली चळवळीने वेळोवेळी आयोजित केले . ४५ अखिलभारतीय संमेलन साहित्यसंमेलनामध्ये पुस्तक स्टोल सहभाग. दीक्षाभूमी नागपूर व चैत्यभूमी दादर ४० वर्षे स्टोल घेऊन सहभाग.      

दरवर्षी 25 डिसेंबरला होणारा वाचकदिनाचा संबंध दिवसाचा कार्यक्रम म्हणजे तर छोटे साहित्य संमेलनच.

हे सारे पार पाडत असताना शिक्षणप्रसारातून जो नवीन वाचकवर्ग तयार झाला आहे त्याच्या सांस्कृतिक जाणिवांना नवांकुराप्रमाणे फुलवण्याचे कार्य ग्रंथाली चळवळीने एक सांस्कृतिक जबाबदारी म्हणून पार पाडले आहे.

ग्रंथाली वाचक चळवळीचे काम या काळात बरेचसे उत्स्फूर्तपणे झाले. त्यामध्ये वेळोवेळी लेखक-कलावंतांचा सहभाग होता. ‘ग्रंथाली’ने आजवर काय केले याची नोंद करण्याचा हा एक प्रयत्न आहे. सांस्कृतिक कार्य आणि व्यवहार याची यामध्ये एक सुरेख सांगड घातली गेली अशीच भावना ती वाचून होईल.

‘ग्रंथाली’चा 75-76 साली प्रारंभ झाला तो, रास्त किमतीत विविध विषयांवरील चांगली पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून. त्या कामात बर्‍यापैकी यश आपण मिळवले. प्रथम शंभर प्रकाशनांपैकी ऐंशीहून अधिक पुस्तके त्या त्या लेखकाची पहिली निर्मिती आहे. पुढेही ही निर्मितीप्रक्रिया जवळपास अशीच चालू राहिली. पुस्तके खेड्यापाड्यांत नेऊन अधिक प्रसारित करण्यासाठी ग्रंथालीने किती मोठमोठे, अक्षरशः कल्पनेपलीकडच्या गुंतागुंतीचे उपक्रम केले त्याची नोंद आपल्यासमोर आहे. आपल्यापैकी बरेच त्यामध्ये वाटेकरी आहात.

या ओघात समाज-संस्कृतीचे जे दर्शन झाले, होत आहे, ते स्तंभित करणारे आहे! आपल्यासारखी संवेदनाक्षम माणसे त्यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. त्यामधूनच पुस्तकप्रसाराच्या पुढे जाऊन संस्कृतीकारणाची संकल्पना ग्रंथालीने लोकांसमोर मांडली. यामागील सूत्र साधे आहे. समाजजागृतीबरोबर आशा-आकांक्षा, ऊर्मी वाढत गेल्या. त्याबरोबर प्रक्षोभ, विसंवाद, क्वचित विद्वेषही. एके काळी केवळ मध्यमवर्गापुरते मर्यादित असलेले सांस्कृतिक आविष्काराचे क्षेत्र चहू अंगांनी मोकळे झाले, क्वचित भरकटलेदेखील. हा जो स्वतंत्र-स्वतंत्र, वेगवेगळा विकासप्रवाह आहे त्यामधील एकजीव शोधण्याचा, जमल्यास सांधण्याचा प्रयत्न संस्कृतीकारणाच्या संकल्पनेत आहे.

‘ग्रंथाली’चे पहिले पुस्तक कराड साहित्य संमेलनात प्रसिद्ध झाले. तथापि ही कल्पना रुजली त्याआधीच्या इचलकरंजीच्या, पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखालील संमेलनात. ग्रंथव्यवहारविषयक नित्याची चर्चा चालू होती. अध्यक्ष होते कै. रा.ज. देशमुख. काही वेळ पु.ल.ही या परिसंवादास येऊन गेले. श्रोते असतील पंचवीस-तीस. त्यांच्यापैकी दोघे होते निपाणीचे. ते म्हणालेकी, गेले वर्षभर (त्या आधीच्या वर्ष-दीड वर्ष) दोन पुस्तकांविषयी रेडिओवर ऐकतोय, वर्तमानपत्रात वाचतोय, तथापि ही पुस्तके आननी कशी आहेत तेदेखील पाहण्याची संधी मिळाली नाही. पुस्तके होती मुंबई दिनांक आणि विश्रब्ध शारदा.

येथे ठिणगी पडली. जी पुस्तके पुण्या-मुंबईकडे प्रकाशित होतात ती बाहेर जाण्याची व्यवस्थाच नाही! (पुढे ग्रंथप्रसारयात्रा काढली तेव्हा मुद्दाम निपाणीला पुस्तके घेऊन गेलो) मुंबईत परतल्यावर बाँके बुक क्लब, मौज, पॉप्युलर, मॅजेस्टिक यांच्याशी बोलणे झाले. पुस्तके दूरवर गेली पाहिजेत, नेली पाहिजेत हे सर्वांनाच पटत होते. परंतु करणार कोण? त्यातून ‘ग्रंथाली’ची कल्पना निघाली. एक दबावगट म्हणून काम करावे असे ठरत होते. मात्र पुस्तके मोठ्या संख्येने घेतल्याशिवाय स्वस्तात देण्याकडे प्रकाशकांचा कल नव्हता. प्रयोग करून पाहण्याइतकी हौसही त्यांना नव्हती. त्यातून ‘ग्रंथाली’ने स्वतः पुस्तके प्रकाशित करण्याचे ठरले.

मग दहा-बारा जणांची बैठक झाली. त्यांनी आणखी सत्तर जणांची बैठक घेतली. मग बैठकाच बैठका होत राहिल्या. प्रकाशनव्यवहारात पाणी किती खोल आहे हे डुबी मारूनच पाहण्याचे ठरले. ध्यानात असे आले की त्यावेळच्या पंचवीस रुपयांत चार पुस्तके देता येतील! तीन पुस्तके कोणती हे ठरवले, आणि चौथे दुर्गा भागवत यांचे ‘डूब’ हे पुस्तक भेटदेण्याचे जाहीर केले. तेच कराड संमेलनात प्रसिद्ध झाले.

एकदा स्वताच पुस्तके प्रकाशित करायची ठरल्यावर ‘ग्रंथाली’ने तेथेही आपली चोखंदळ दृष्टी व्यक्त केली. पहिल्या तीन पुस्तकांत एक होती दीनानाथ मनोहर यांची कादंबरी ‘रोबो’, दुसरे होते उद॒॒ध्वस्त क्षितिज स्त्रियांवरील अत्याचाराच्या सत्य कहाण्या, संपादन व कल्पना अशोक जैन यांची. तिसरे होते राजकपूर आणि त्याचे चित्रपट, लेखक वसंत साठे. पहिल्या पंचवीस रुपयांत डुबसह चार पुस्तके दिल्यावर समाजात ‘ग्रंथाली’बद्दल विश्‍वास वाढला. मराठीत वेगळ्या विषयांवरची पुस्तके लोक अधिक आवडीने वाचतात हेही यातून सिद्ध झाले. त्यानंतरचे पुस्तक तर दैनंदिन राजकारणावरचे होते. ‘सत्तेचे मोहरे’ – लेखक जगन फडणीस, त्यावेळी तरुण उदयोन्मुख, पत्रकार. पुणे संमेलनात हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि तेथेच द्विस्तरीय किंमत रुजली.

त्यामागचा विचार साधा होता. पुस्तकांना व्यक्तिगत ग्राहक वाढवायचा तर त्यास प्रलोभन द्यायला हवे. अशी गुंतवणूक करू तेव्हा पुढच्या, त्याच्या पुढच्या पिढीत वाचनाचे औत्सुक्य निर्माण होईल.

‘सत्तेचे मोहरे’नंतर समाजस्पर्शी पुस्तकांची मालिकाच आली. ‘सिंहासन’, ‘बलुतं’, ‘उपरा’, ‘क्लोरोफॉर्म’… यातले प्रत्येक पुस्तक लिहिले जात असताना ‘ग्रंथाली’चे  संपादकमंडळ सतत लेखनप्रक्रियेत सहभागी होते. दया पवार ‘बलुतं’ ही कादंबरी लिहिणार होते. ‘ग्रंथाली’ने आग्रह धरला की हे आत्मकथन हवे. त्यामुळेच पुढे ‘बलुतं’ हा दलित साहित्याचा जाहीरनामा ठरला. हीच कामगिरी पुढे स्त्रीमुक्ती चळवळीसंबंधात छाया दातार यांच्या ‘स्त्री-पुरुष’ने केली. हे लेखन ‘ग्रंथाली’च्या सांगण्यावरून, सांगण्याप्रमाणे घडले. ‘ग्रंथाली’चे संवेदनशील कार्यकर्ते समाजमन टिपून ते साहित्यात अवतरेल असे पाहत होते आणि त्यामुळे लोकांना ‘ग्रंथाली’ची ओढ लागत होती. असे कितीतरी संपादकीय प्रयत्न!

ग्रंथप्रसारमोहिमा, त्यातून समाजाला भिडणं, त्यातून झालेल्या आकलनाचं प्रतिबिंब प्रसिद्ध होणार्‍या पुस्तकांत. असं जवळजवळ दशकभर चालू होतं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘ग्रंथाली’ला लौकिक मिळाला तो या क्रियेमधून.

आज सेहेचाळीस वर्षांनंतर ‘ग्रंथाली’ एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. नवीन उपक्रम तर अनेक आहेत. आजवरच्या मोहिमांत मिळवलेले यश स्थायी करण्याची, अधिक तळच्या समाजात जाऊन वाचनवृत्ती, ज्ञानजिज्ञासा वाढवण्याची मनीषा ‘ग्रंथाली’ बाळगून आहे.

‘ग्रंथाली’ वाचनाचा प्रसार करते तो एका व्यापक उद्दिष्टाने. समाजात ज्ञानलालसा वाढती राहावी, समाजात समजूत व सद्भाव वाढता राहावा, समाजावर सांस्कृतिक संस्थांचा प्रभाव असणे आवश्यक आहे. ‘ग्रंथाली’च्या संस्कृतीकारणाच्या मोहिमेत हे सारे अभिप्रेत आहे.