दिवाळी पहाट २०२२
ग्रंथाली व अॅड फिझची अठरावी दिवाळी पहाट संपन्न ! दिवाळी पहाट २०२२
ग्रंथाली आणि अॅड फिझ आयोजित दिवाळी पहाट या उपक्रमात बुधवार, १९ ऑक्टोबर २०२२ रोजी वीर सावरकर स्मारक स्मारक सभागृह, दादर येथे बहारदार गीतांचा कार्यक्रम आणि तीन सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘गगन सदन तेजोमय’ या शीर्षकाच्या या कार्यक्रमात अमराठी गायकांनी गायलेली अजरामर मराठी गाणी या सूत्रावरील एकाहून एक लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. महंमद रफी, हेमंतकुमार, तलत महमूद, मन्नाडे, किशोर कुमार, गीता दत्त, सुधा मल्होत्रा, वाणी जयराम अशा जुन्या जमान्यातील गायक गायिकांप्रमाणेच हरिहरन, शंकर महादेवन, सोनू निगम, कुणाल गांजावाला, श्रेया घोषाल अशा नव्या पिढीतील लोकप्रिय कलाकारांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ऋषीकेश कामेरकर, केतकी भावे-जोशी, डॉ. जय अजगांवकर, श्रीरंग भावे, कृतिका बोरकर या तरुण तरबेज गायक गायिकांनी गायलेल्या या अप्रतिम गीतांना कमलेश भडकमकर यांच्या संगीत संयोजनामध्ये लोकप्रिय वादकांनी रंगतदार साथ दिली. शब्दरुचीचे संपादक अरुण जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे रसाळ व माहितीपूर्ण निवेदन-सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथालीच्यावतीने सुदेश हिंगलासपूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
अठरा वर्षांपासून सुरू असलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमात या कार्यक्रमाबरोबरच समाजात निरपेक्ष बुद्धीने निरलस सेवा करणाऱ्या तीन कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या कामाला मानवंदना देण्यात आली. खेड्यातील सरकारी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व सुविधा मिळवून देणारे सांगली जिल्ह्यातील जत येथील दत्तात्रय वारे सर, खेड्यात उत्तम रीतीने जलसंधारणाचे काम यशस्वी करून दाखवणारे सांगोला वाटांबरे येथील मधुकर पवार, भटक्या मुलाच्या शिक्षणापासून ते महिलांच्या विविध प्रश्नांसाठी काम करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथील सुहासिनी माने यांच्या कार्याविषयीच्या लघुचित्रफिती मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आल्या व त्यानंतर त्यांनी मनोगतेही व्यक्त केली. या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन ॲड फिझच्या महेंद्र पवार यांनी केले.
ग्रंथाली दिवाळी अंक संच’ योजनेत नोंदणी करणाऱ्या व प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या सभासदांसाठी हा कार्यक्रम ध्वनीचित्रमुद्रित करण्यात आला असून दिवाळीच्या पहाटेपासून तो त्यांना आपापल्या घरीही पाहता येण्याची सोय ग्रंथालीद्वारा करण्यात आली आहे. तसेच क्यू आर कोड स्कॅन करून दर्जेदार अशा नव्या कथांची ऑडिओबुक्सही ऐकण्याची आगळी दिवाळीभेट ग्रंथालीने मराठी रसिकांनी दिली आहे.