शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता, ग्रंथाली प्रतिभांगण, वांद्रे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी, गीतकार सदानंद डबीर यांच्या ‘सांज’ या काव्यगज़ल संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झाले. यावेळी डबीर यांच्या निवडक गीत-गज़लांचे गायन माधव भागवत, मिलिंद-मनीषा जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक पत्की, लोकप्रिय गायक-संगीतकार मिलिंद जोशी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार्या डॉ. समिरा गुजर-जोशी तसेच पुस्तकाची अक्षरजुळणी करणारे नरेंद्र कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुदेश हिंगलासपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘सांज’ काव्यगज़ल संग्रहाचे प्रकाशन झाल्यावर मिलिंद जोशी यांनी छोट्याशा अनौपचारिक भाषणामध्ये
डबीर यांच्याविषयी आदर व्यक्त केला. यशवंत देव यांच्यामुळे ओळख झालेल्या डबीर सरांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे कविता कशी लिहावी, तिला त्रयस्थपणे कसे तपासावे हे सहज झालेल्या त्यांच्या गप्पांमधून कळले असे मिलिंद जोशी यांनी सांगितले. डबीर यांच्या चार कवितासंग्रहांची मुखपृष्ठे मिलिंद जोशी यांनी केली आहेत. संगीतकार अशोक पत्की यांनी डबीर यांच्याशी असलेल्या सुमारे चाळीस वर्षांच्या स्नेहाचा व एकत्र केलेल्या कामांच्या आठवणी सांगितल्या. डबीर यांचे शब्द अतिशय साधे व चाल लावण्यास सोपे असतात असे त्यांनी सांगितले. मुख्य पात्रांना गाता येत नसल्याने नाटकातील गाणे सुरू झाले की रंगमंचावर ‘ब्लॅकआऊट’ केलेल्या एका संगीत नाटकाचा किस्सा सांगून पत्कींनी उपस्थितांना खळखळून हसवले. डबीर यांनी चालीवर अधिक गाणी लिहावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सदानंद डबीर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. ग्रंथालीशी असलेला जुन्या संबंधाच्या आठवणी जागवल्या.
डबीर यांच्या निवडक गीत-गज़लांची छोटीशी मैफल रंगली. यामध्ये माधव भागवत, विवेक काजरेकर, मिलिंद जोशी, मनीषा जोशी यांनी सुरेल सहभाग दिला. कार्यक्रमाला उपस्थित अरुंधती केतकर यांनी संगीतबद्ध केलेल्या व दीपाली राजे यांनी गायलेल्या सदानंद डबीर यांच्या गीताची ध्वनिचित्रफीत उपस्थितांनी पाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन महेश खरे यांनी केले.