शुक्रवार २१ ऑक्टोबर २०२२रोजी वाघूर या दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ ग्रंथाली प्रतिभांगण येथे सायंकाळी ६. ३०वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते व सह्याद्री देवराई या वनीकरण विषयक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेचे संकल्पक असलेले सयाजी शिंदे उपस्थित होते. ज्येष्ठ कवी व ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथालीतर्फे मान्यवरांचा पुस्तक आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सुदेश हिंगलासपूरकर यांनी ग्रंथालीच्यावतीने मनोगत व्यक्त केले.
सयाजी शिंदे यांच्या हस्ते वाघूरच्या ‘झाड विशेषांक’ असलेल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. वाघूरचे संपादक असलेले कवी नामदेव कोळी यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये या दिवाळी अंकाची पार्श्वभूमी आणि झाड विशेषांकाबद्दल माहिती सांगितली. अरुण शेवते यांच्या पाठिंबा व उपस्थितीबद्दल, ग्रंथाली व सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच सयाजी शिंदे यांनी त्यांच्या व्यग्र दिनक्रमातून या समारंभासाठी आवर्जून वेळ दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
अरुण शेवते यांनी आपल्या मनोगतामध्ये वाघूर या दिवाळी अंकातील मजकुराच्या दर्जा, कसदारपणा व वैविध्याबद्दल कौतुक केले. स्वतः केलेली झाड या विषयावरील एक कविताही त्यांनी सादर केली. प्रमुख पाहुणे असलेल्या सयाजी शिंदे यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये समाजात वृक्षसंवर्धनाविषयी असलेल्या दुर्लक्षाविषयी परखड विचार मांडले. साहित्य कला या गोष्टी तत्कालीन असतात पण झाडं मात्र दीर्घकाळपर्यंत माणसालाच नव्हे तर सर्व निसर्गाला भरभरून सर्व काही देत असतात असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पर्यावरणविषयक विचारवंत शरद काळे उपस्थित होते. त्यांनीही आपल्या मनोगतामध्ये माणसाला दर क्षणाला घ्याव्या लागणाऱ्या ऑक्सिजनची किंमत किती प्रचंड असते आणि झाडे कशा प्रकारे हा ऑक्सिजन आपल्याला फुकट देत असतात हे वास्तव सोप्या पण ठाम शब्दात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप महेश खरे यांनी केले.