मेधा आलकरी
एप्रिल महिन्याची सुरूवात ‘जागतिक मूर्खपणा’ साजरा करणाऱ्या दिवसाने होत असली; तरी सृष्टी मात्र या महिन्यात पूर्णांगाने बहरून येत असते. युरोपात गारठा सरून त्याची जागा नरम उन्हाने घेतलेली असते. अंगावरील जाड, एकसूरी रंगाचं, उबदार ओझं बाजूला सारून; हलके, सुती, रंगीत फुलाफुलांचे कपडे घालून ललना उल्हसित मनाने सायकलीवरून रपेट करताना दिसतात. वसंतातील अशा तजेलदार महिन्यात स्पेनमधील सेव्हिया गावी ‘एप्रिल फेअर’ मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ईस्टर नंतर पंधरवड्याने येणारा सप्ताह हा एप्रिल फेअरचा नियोजित काळ आहे. त्यामुळे कधीकधी ही एप्रिल महिन्याच्या नावाची जत्रा चक्क मे महिन्यात येते. आम्ही गेलो त्यावर्षी ती अशीच मे महिन्यात आली होती.
स्पेनमधील या जत्रेचं आधुनिक रुपडं आपल्या गावरान जत्रेपेक्षा खूप वेगळं असलं; तरी त्याचा आत्मा तोच आहे. १८४७ साली, १८ एप्रिल या दिवशी ही जत्रा खरं तर गुरांचा बाजार म्हणून सुरु झाली. त्यावेळी बाजारास जाणाऱ्या आपल्या ‘धन्या’बरोबर जत्रेतील मजा बघायला आणि किडुक मिडूक बायकी खरेदी करायला, जिप्सी जमातीच्या बायका आपले पायघोळ झगे घालून जात असत. जशी वर्षं सरत गेली तसं या जत्रेचं स्तोम अधिकच माजत गेलं, तोंडवळा बदलत गेला, इतकं की त्यातून गुरं बाद झाली आणि उरला फक्त उत्सवाचा जोश!
जिप्सी बायकांच्या पायघोळ गबाळ्या झग्याला आता गुढघ्याखाली टाचांपर्यंत, एकावर एक चढणारी दाट, नागमोडी चुण्याचुण्यांची झालर लागली. तो अधिकाधिक तंग, गडद आणि फॅशनेबल होत गेला.( ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’मधील सेनोरिटाचा ड्रेस आठवा.) पुरुषांच्या पोषाखालाही ऐट आली. कमरेपर्यंत येणारे बिनबाह्यांचे कोट, शिकारीला घालतो तशा तंग विजारी, विजारीला धरून ठेवणारे सस्पेंडर्स (राजेंद्रनाथ फेम !) गोल पसरट हॅट, खिशात रुमाल आणि टाचा असलेले गमबूट! स्त्री-पुरुषांचे हे खास परिधान जणू या आधुनिक जत्रेचा गणवेश बनले. १८९३ साली अवघ्या तीन तंबूंपासून सुरु झालेल्या या छोट्याशा बाजाराला आता एका छोटेखानी शहराचं रूप आलंय. दीड चौ. किमी क्षेत्रफळ असलेलं हे जत्रेचं मैदान, बारा उभ्या आडव्या रस्त्यांवर उभारलेल्या हजारेक तंबूंनी भरून जातं. जत्रेमध्ये आपल्या मालकीचा तंबू असणं हे प्रतिष्ठेचं आणि ऐश्वर्याचं लक्षण! या तंबूंमध्ये आपले कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, सहकारी निमंत्रित असतातच; पण काही राजकारणी धेंडं आणि प्रसिद्धीच्या झोतातील सिनेतारका आल्या तर चारचौघात मालकाचा भाव वधारतो. तंबूमध्ये खानपानाची आणि मदिरापानाची लयलूट असते; परंतु या सगळ्याचा प्राण, ‘सेवियाना’नृत्य करण्यासाठी सगळे जण आतुर असतात.
देश विदेशातून हे फेअर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी उसळत असली तरी फेअर हे स्थानिक लोकांचं ‘अफेअर’ आहे असं म्हणावं लागेल. फोटो काढणाऱ्या आणि कौतुकाने न्याहाळणाऱ्या विदेशी लोकांकडे ढुंकूनही न पाहता ही मंडळी स्वतःमध्ये दंग होऊन नृत्य करत असतात. सेविया हे खरंच आनंदी, चैतन्यशील माणसांचं गाव आहे. जत्रेच्या मैदानाचं भव्य प्रवेशद्वार विविध ढंगाने सजवणं हे दरवर्षी एक नवीन आव्हान असतं. पन्नास मीटर उंचीची कमान असलेलं हे प्रवेशद्वार बावीस हजार छोट्या छोट्या दिव्यांनी शोभिवंत केलेलं असतं. रात्री बाराच्या ठोक्याला महापौरांच्या हस्ते फेअराचं ( स्थानिक उच्चार फेअरा) उदघाटन वाजत, गाजत, मोठ्या हर्षोल्हासात होतं, तेव्हा हे सारे दिवे क्षणार्धात उजळून निघतात आणि त्यापाठोपाठ मैदानातील इतर दिवेही प्रज्वलित होतात. गडद अंधारात प्रकाशाची जणू एक लाट पसरत जाते. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने टाळ्यांच्या कडकडाटात आठ दिवसांच्या या महोत्सवाची नांदी होते आणि शेवटच्या दिवशी मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीने त्याची सांगता होते.
जत्रेच्या दिवसांमध्ये स्थानिकांनी फेअरा ग्राउंडवर यायचं ते पारंपरिक फ्लेमिंको नृत्यांगनेचा पायघोळ नागमोडी, गच्च झालरींचा झगा परिधान करूनच. डोक्यावर अगदी शिरोस्थानी एक मोठ्ठं फूल माळायचं, केसात कोरीव काम केलेला लाकडी कंगवा खोचायचा, मोठे वर्तुळाकार डूल घालायचे, आणि हाती नाजूक जपानी पंखा! या सरंजामाबरोबरच पाठीवर त्रिकोणी घडी येईल असा, झिरमिळ्या असलेला स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळून या सेव्हियन ललना आणि त्यांच्या सारखीच वेशभूषा केलेल्या त्यांच्या गोड मुली दुपारी साधारण एकच्या सुमारास जत्रेच्या मैदानावर गोळा होतात. तिथे असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाडीत सगळा परिवार बसतो आणि जत्रेत मिरवतो. सरतेशेवटी त्यांना आमंत्रित केलेल्या तंबूसमोर ही वरात बग्गीतून उतरते. काही अमीर उमराव ही वरात पार आपल्या घरापासून सुरु करतात; तर काही स्वप्नील तरुण, तुकतुकीत कांतीच्या आणि पिळदार स्नायूंच्या घोड्यावर आपल्या प्रेयसीला बसवून, एखाद्या राजकुमारासारखी, भर रस्त्यावरून घोडदौड करत ऐटीत फेअराला येणं पसंत करतात.
आम्ही मात्र आमच्या दोन पायांवर रपेट करत ही सारी ‘जत्रासराई’ पाहत होतो. प्रवेशद्वारापाशीच काही वयस्कर महिला आपल्या ठेवणीतल्या झग्यांमध्ये, एकमेकांसमोर उभं राहून एक हात वर करून आणि दुसरा कमरेमागे घेऊन, चुटक्या वाजवत अथवा लाकडी टपरी वाजवत नृत्य करताना दिसल्या. संगीतावर थिरकणारे हे सेवियाना नृत्याचे दोनच मिनिटांचे तुकडे. त्याचा सामूहिक शेवट ‘ओले’ या आरोळीने होत असे. घोळक्या घोळक्याने येणारे नवीन परिवार या समूहात सामील होत. परत नव्या जोडीदारीणी बरोबर नृत्य होई. टाळ्या वाजवून एकमेकींचा उत्साह वाढवला जाई. तंबूकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालतानाही टाळ्यांचा ठेका आणि नृत्याचा ठुमका चालूच असे. फेअरामधील खाजगी तंबूंमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण आवश्यक असलं तरी जनसामान्यांसाठी आणि आमच्यासारख्या परदेशी पर्यटकांसाठी म्युन्सिपालिटीतर्फे सात पब्लिक तंबू आहेत. निमंत्रणाशिवाय प्रवेश करून, आतील स्टॉलवरून खाद्यपदार्थ विकत घेऊन, सेवियाना नृत्याचा आस्वाद कुणीही घेऊ शकतं.
हे सारे तंबू आतून खूप सुंदर सजवलेले असतात. जाळीदार शुभ्र पडदे, कलात्मक नक्षीदार टेबलक्लॉथ आणि फुलांची मनमोहक आरास! आम्हाला एखाद दोन तंबूत डोकावून पाहण्याची संधी मिळाली. महालासारखा सजवलेला हा तंबू खचितच कुणा धनिकाचा असावा. कोरीव खांब, कमानी आणि आलिशान झुंबरं! दक्षिण स्पेन बराच काळ मूरिश अधिपत्याखाली येत असल्यामुळे आलिशान मुसलमानी सजावटीची छाप येथे पाहावयास मिळते.
बग्गीची रपेट आणि तंबूंची शोभा स्वच्छ सूर्यप्रकाशात पाहून फेअराचं खरं स्वरूप पाहण्यासाठी आम्ही रात्री दहाच्या सुमारास पुन्हा त्या मैदानात आलो. छोट्या छोट्या दिव्यांनी सुशोभित पोर्टाडा (प्रवेशद्वार) फारच सुरेख आणि आकर्षक दिसत होतं. सकाळची घोडागाडी परेड म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेचा आणि खणखणत्या वैभवाचा विला होता मात्र रात्री सगळं चित्र पालटलं होतं. गर्दी लोटत होती. माणसांचे लोंढेच्या लोंढे त्या गर्दीत सामावून जात होते. त्यात सामान्य माणसं होती; तसेच राजघराण्यातील वलयांकित व्यक्ती होत्या. कवी-लेखक, चित्रकारांसारखे मान्यवर समाजधुरंदर होते आणि प्रसिद्धीच्या झोतातील सिनेतारकाही होत्या. तंबूत गप्पांचा फड जमला होता. हास्याची कारंजी उडत होती. प्रत्येकाच्या हातात मदिरापात्र होतं. काही नवख्यांना ती पचवता न आल्यानं भोवळ येणं, ओकाऱ्या होणं वगैरे प्रकारही नजरेस पडत होते. ER ७७ या नंबरच्या तंबूत तर वाईनची एक कृत्रिम विहीरच तयार केली होती. दारू बादलीने ओढून लोकांना पाजली जात होती. या दारूबरोबर ‘तपा’ खाणं चालू होतं. तपा म्हणजे खाण्याचे छोटे छोटे प्रकार. ही स्पेनची खासियत. एकच पदार्थ भरपूर खाण्यापेक्षा वेगवेगळ्या चवींचे छोटे छोटे शंभर प्रकार. स्पेनमध्ये असे ‘तपास बार’ असतात. गम्मत म्हणजे दारू समवेत असे ८-१० प्रकारचे तपा देणाऱ्या बारची लोक रात्रभर वारी करतात. मला आपली इंदोरची खाऊगल्ली आठवली. मी मनातल्या मनात एका ठेल्यावर सामोसा, दुसऱ्यावर कचोरी, पलीकडे शेव घातलेले गरम पोहे आणि शेवटच्या ठेल्यावर पाकात पोहोणारे मालपुए व गुलाबजामून खाऊन आले. या ‘तपा’ची अट एकच, घास चिमणीएवढे हवेत. ‘खाऊ’गल्ली नाही ‘चिऊ’गल्ली!
तंबूमध्ये आणि बाहेरही एका ओळीत स्त्री-पुरुष समोरासमोर उभं राहून नाचत होते. रोमँटिक असला तरी या नाचात स्त्री पुरुष एकमेकांना स्पर्श करत नाहीत. दोन मिनिटं धुंद नाचून झाल्यावर आणि ‘ओले’च्या पुकारानंतर एकदाच फक्त पुरुष स्त्रीच्या कमरेत हात घालून हा नाच संपवतो. फ्लेमिंगो पक्षाचं प्रियाराधन हा सेवियाना नृत्याचा गाभा ! म्हणूनच या नृत्यातील शृंगार अजून कायम आहे. एका तिशीतल्या जोडप्याचा नाच मी बराच वेळ एकाग्रतेने पाहत होते. स्त्रीच्या हालचालीत, चेहऱ्यावरील हावभावात कमालीची मोहकता होती. पांढऱ्या शुभ्र झग्यावर लाल ठिपके, लाल झालर, त्याच रंगसंगतीचे फूल, डूल, बूट सगळं कसं नीटस देखणं. नवराही कौतुकाने ओथंबलेल्या नजरेने तिच्याकडे पहात तिला नृत्यात साथ देत होता. त्यांच्या दोन गोड छोकऱ्या आईशेजारी बसल्या होत्या. जणू तिच्या प्रतिकृती! बराच वेळ नाचल्यावर ती स्त्री थकून, समोरच्या खुर्चीवर पाय पसरून, अंग सैलावून बसली. नवऱ्याने हळूच तिच्या पायातले बूट काढून हलका दाब देऊन तिची पावलं चेपून दिली. त्याच्याकडे पाहून ती छानसं हसली आणि संगीत सुरु होताच पुढच्या तुकड्यावर नाचायला सज्ज झाली. मला त्यांचं हे एकमेकांवरील प्रेम, शृंगार, नाचण्यातला आनंद, चेहेऱ्यावरची ख़ुशी सारं सारं काही खूप भावलं. एकंदर आबालवृद्धांचं आत्ममग्न होऊन नृत्यात रममाण होणं, त्याद्वारे आपल्या भावना प्रकट करणं मला फार विलोभनीय वाटलं. मनाचा एक दुवा सतत मायदेशाशी जोडलेला असल्यामुळे ‘एप्रिल फेअर’ ची आंशिक तुलना आपल्या नवरात्रीतल्या गरब्याशी करून मी मोकळी झाले. तंबूच्या ऐवजी शामियाना, पारंपरिक वेशभूषा, तेच बेभान होऊन थिरकणं, तशीच तन्मयता, तोच जोश आणि तीच आत्ममग्नता !
मेधा आलकरी
इमेल – travelkarimedha@gmail.com
मोबाईल – ९८२००९५७९५
युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/channel/UCBt-dofKUO26YwRGAfMyePw