पुस्तक प्रकाशन 2022

ग्रंथाली-प्रतिभांगणचा नवीन उपक्रम ‘कॉर्पोरेट गप्पा’ शुभारंभ विठ्ठल कामत यांच्याशी मनमोकळ्या गप्पांनी

ग्रंथाली-प्रतिभांगण आणि उद्योगविश्‍व यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 या दिवशी ‘प्रतिभांगण’, येथे सायंकाळी 6 वाजता ‘कॉर्पोरेट गप्पा’ नवा उपक्रमाच्या शुभारंभाचा कार्यक्रम निमंत्रितांसाठी आयोजित केला होता. यावेळी, ऑर्किड या पहिल्या पर्यावरणस्नेही पंचतारांकित हॉटेलचे संस्थापक, कामत हॉटेल्स ग्रूपचे अध्यक्ष ‘इडली ऑर्किड आणि मी’, ‘यश अपयश आणि मी’, ‘उद्योजक होणारच मी’ या पुस्तकांचे लेखक सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, विठ्ठल कामत यांची मुलाखत झाली. ‘उद्योगविश्‍व’च्या ज्ञानेश चांदेकर यांनी या कार्यक्रमात विठ्ठल कामत यांना खेळकर शैलीत नेमके प्रश्‍न विचारले.

यावेळी विठ्ठल कामत यांनी आपला जीवनप्रवास, भेटलेल्या विविध व्यक्ती व त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या गोष्टी याविषयी अतिशय मोकळेपणाने व मिस्कील शैलीत उत्तरे दिली. मराठी समाजात अनेक विषयांवर लेखन होते पण उद्योजकता व उद्योजक या विषयावर विशेष लेखन-चर्चा होताना दिसत नाही

यामुळेच या विषयाचा उपक्रम सुरू केल्याचे चांदेकर यांनी सांगितल्यावर विठ्ठल कामत यांनी मराठी माणूस बोलतानाच ‘याने उद्योग सुरू केला’ असे म्हणायच्या ऐवजी ‘हा उद्योगात पडला’ असं म्हणतो हे निरिक्षण मांडले व ही मराठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. भारतामध्ये अठ्ठावन हजार किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते बांधले गेले आहेत त्यामुळे सध्या सर्व जगामध्ये भारतात उद्योजकता वाढण्यासाठी योग्य संधी आहे. भारतातील आठ ते ऐशी वयातील प्रत्येक माणूस उद्योजक होऊ शकतो असे ते म्हणाले.

तुझ्यात दीडशे रुपयेही कमावायची क्षमता नाही असे त्यांच्या वडिलांनी आव्हान दिल्यामुळे जिद्दीला पेटून कामत यांनी महिना दीड हजार रुपये पगार असेल अशी नोकरी मिळवून दाखवली. पण आईच्या आग्रहावरून त्या नोकरीवर रुजू न होता वडिलांच्या हॉटेलव्यवसायातच उमेदवारी करायला सुरुवात केली. मग परदेशात जाऊन तेथेही कामाचा अनुभव घेतला आणि परत येऊन व्यवसायात ठाम पाऊल टाकले.

ऑर्किड हे पंचतारांकित हॉटेल सुरू करताना त्याला ‘पर्यावरणस्नेही’ ही खास ओळख देऊन त्याचा ठसा उमटवला. ग्राहकांशी नम्रपणे, आपुलकीने वागणे हे आमचे धोरण ग्राहकांना पसंत पडते व त्याचा व्यवसायवृद्धीसाठी फायदा होतो असे प्रतिपादन त्यांनी केले.

सेवेचा दर्जा कायम चांगला राखण्यासाठी आम्ही गुप्तपणे पाहणी करून अहवाल देणार्‍या ‘अनोळखी पाहुण्यांची’ व्यवस्था केली आहे असे विठ्ठल कामत यांनी सांगितले. या पाहुण्यांनी नकारात्मक अभिप्राय दिल्यास संबंधित हॉटेलच्या प्रमुखाला दोनदा इशारा दिला जातो व सुधारणा न झाल्यास ते हॉटेल बंद केले जाते असे ते म्हणाले.

व्यवसायाची वृद्धी करताना फ्रॅन्चायझी या पद्धतीचा हल्ली खूप जणांकडून वापर केला जातो, पण त्यामध्ये मूळ संस्थेच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, या विषयी तुम्ही काय सांगाल असा प्रश्‍न चांदेकर यांनी विचारला. त्यावर, भारतामध्ये फ्रॅन्चायझी, ब्रॅडिंग याचे कडक कायदे नाहीत व त्यामुळे या प्रकारात काही धोके उद्भवू शकतात पण त्यावरही योग्य काळजी घेत व्यवसाय करणे शक्य असते असे विठ्ठल कामत यांनी सांगितले.

सुमारे दोन तास रंगलेल्या या मैफलीत विठ्ठल कामत यांनी वेळोवेळी कविता, किस्से, शेर म्हटले. इतकेच नाही तर प्रेक्षकांच्या फर्माइशीवर दोन गाणीसुद्धा म्हटली.

या गप्पांमध्ये त्यांनी उद्योग व व्यवस्थापनातील पुढील काही सूत्रेही सांगितली. – जो जगाचे पैसे व वेळ वाचवतो तोच खरा उद्योजक असतो. * कमीत कमी जागेत जास्त व्यवसाय करणे हे खर्‍या उद्योजकाचे लक्षण आहे. * चांगले दर्जेदार उत्पादन – चांगले पॅकेजिंग – चांगले नाव या तीन गोष्टी असतील तर कुणीही उद्योजक होऊ शकतो. * उद्योगाच्या प्रस्थापित होण्यात नावाप्रमाणेच पंचलाइनही महत्त्वाची असते. * तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात केले तर तुम्हाला त्यासाठी केलेल्या कष्टांचा थकवा येणार नाही. * उद्योग सुरू करताना तुम्हाला कुठे जायचे आहे ते तुमच्यासमोर स्पष्ट हवे आणि त्या क्षेत्रात पाऊल टाकणारे तुम्ही पहिले असले पाहिजे. * उद्योग सुरू करताना प्रथम तुमचा ग्राहक कोण आहे हे समजून घेतले पाहिजे.

गप्पांदरम्यान त्यांनी आपल्या झाडे लावणे, कासवांचे संरक्षण तसेच पुरातन वस्तूंचा संग्रह अशा विविध छंदांविषयी माहिती सांगितली. भीमसेन जोशी, मंगेश पाडगांवकर, आचार्य पार्वतीकुमार अशा दिग्गज व्यक्तीच्या आठवणी व किस्सेही सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी काही प्रेक्षकांच्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप महेश खरे यांनी केला.