ग्रंथप्रसार यात्रा (डिसेंबर 1982) : अठरा दिवसांत एक व तीन दिवसांची पस्तीस ठिकाणी प्रदर्शने. शंभर कार्यकर्त्यांचा व दीडशे लेखक-कलावंतांचा सहभाग. एकूण पुस्तक-विक्री चार लाख रुपयांची.

ग्रंथएल्गार (डिसेंबर 1983) : एकाच दिवशी मुंबईच्या अठरा सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन पुस्तकप्रसार. शंभर कार्यकर्त्यांचा सहभाग. एकूण विक्री अठरा हजार रुपयांची.

संवादयात्रा तेंडुलकरांची (जून 1984) : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांचा आठ दिवसांचा दौरा. ठिकठिकाणी तेंडुलकरांच्या सभा व बैठका. सोबत पुस्तकप्रदर्शने. एकूण व्रिकी तेवीस हजारांची.

ग्रंथमोहोळ (डिसेंबर 1986) : एकाच वेळी महाराष्ट्रात पन्नास ठिकाणी तीन दिवसांची पुस्तकप्रदर्शने व सांस्कृतिक कार्यक्रम. पाचशे कार्यकर्त्यांचा सहभाग. आठ एस.टी. बसेसची योजना. एकूण विक्री साडेसहा लाखांची.

बालझुंबड (डिसेंबर 1987) : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पाच दिवसांचे बालपुस्तकांचे प्रदर्शन. सोबत अनेकविध सांस्कृतिक, करमणुकीचे, वैज्ञानिक कुतूहलाचे, संगणक-प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा वगैरे. एकूण विक्री अडीच लाखांची. त्यानंतर हे उपक्रम ठिकठिकाणी होत राहिले.

वाचन परिषद (1990) : इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकाराने तीन दिवसांचा ग्रंथोत्सव. बालवाचक व प्रौढवाचकांसाठी वाचनप्रसाराचे, मनोविनोदनाचे सत्तावीस कार्यक्रम. सव्वाशे कार्यकर्त्यांचा सहभाग. पुस्तकविक्री चार लाखांची. –  कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

बालवाचक चळवळ : मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी याकरता मुलांनी दर महिन्याला दहा रुपयांचे एक पुस्तक खरेदी करून चालवलेला उपक्रम. सध्या वेगवेगळ्या शाळांमध्ये सतराशे बालसभासद. बारा शिक्षकांचा नियमित, क्रियाशील सहभाग. मुलांसाठी चळवळीमार्फत विविध उपक्रम.

ग्रंथविदेश (1993) : उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या द्विवार्षिक अधिवेशनामध्ये ‘ग्रंथाली’ने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले आणि नंतर वेगवेगळ्या ठिकाणी मराठी वस्त्यांत पुस्तकविक्रीचे प्रयोग केले. यामुळे ‘ग्रंथाली’चा झेंडा अमेरिकेत रोवला गेला. ह्युस्टन येथे 1995 मध्ये झालेल्या अमेरिकन मराठी बांधवांच्या मेळाव्यास पुन्हा ‘ग्रंथाली’चे तीन प्रतिनिधी गेले आणि हा बंध अधिक दृढ झाला. आता अमेरिकेतील आणि जगभरातील हजारो मराठी बांधवांपर्यंत ‘शब्दरुची’ नियमित जातो.

‘वि’पुल ग्रंथयात्रा (1994-95) : पु.ल. देशपांडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांच्या साहित्याची 25 ठिकाणी प्रदर्शने.

याशिवाय….

  • दहा दिवसांच्या स्त्रीमुक्ती यात्रेबरोबर पुस्तक प्रदर्शन दौरा (जानेवारी 1994);
  • सुमारे दीडशे छोटी-मोठी प्रदर्शने;
  • स्थानिक पातळीवरील सुमारे 50 ग्रंथयात्रा (दिंडी); पैकी वांद्रे व नांदेड येथे र. कृ. जोशीकृत हॅपनिंग्ज.
  • दरवर्षी 25 डिसेंबरला मुंबईमध्ये वाचकदिन (दिवसभराचे छोटे साहित्य-संस्कृती संमेलनच!)
  • नॅशनल बुक ट्रस्ट आणि मुंबई महापालिका यांच्या सहकार्याने ‘गलीच्छ वस्ती सुधारणा’ योजनेखाली बालपुस्तक प्रदर्शने.
  • व्यक्तिगत ग्राहकाला पुस्तक-खरेदीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने द्विस्तरीय किंमतीचा अभिनव प्रयोग. यानुसार पंधरा हजार वाचक सभासदांची नोंदणी.
  • तीस ग्रंथप्रसार केंद्रे : ‘ग्रंथाली’तर्फे 1980 नंतरच्या काळात महाराष्ट्रभर व बाहेर बडोदा-दिल्ली येथे तीस ग्रंथप्रसार केंद्रे चालवण्यात आली. कल्पना अशी होती की त्या त्या गावचे ते सांस्कृतिक अड्डे व्हावेत. परंतु सर्वसाधारणपणे ते व्यक्तिकेंद्रीव प्रयत्न राहिले. केंद्रे चालवणार्‍यांपैकी काही मंडळी व्यवसायात उतरली. काही केंद्रे अजून व्यवस्थित चालतात.
  • ‘कोरो’च्या सहकार्याने झोपडवस्तीतील सावित्री वाचनालयाचा उपक्रम.