साहित्यरंग

लेखांक दुसरा

किरण भिडे

आज मातृदिनाच्या दिवशी ‘साहित्य व्यवहार’ लेख मालिकेतील दुसरा लेख लिहायला बसलो आणि माझ्या लक्षात आलं की ‘ती’ एकमेव जागा आहे अख्ख्या जगात, आई आणि मुलांचं नातं, जिथे काहीही व्यवहार नसतो. पूर्ण निरपेक्ष कारभार. बाकी सगळीकडे ‘जग हे दिल्या घेतल्याचे’. आपण मागच्या लेखात बघितल्याप्रमाणे ‘व्यवहार’ हा नेहेमी दोन पार्ट्यांमध्ये होतो. व्यवहारात दोन्ही बाजूंना काहीतरी ‘मिळाल्याचं’ समाधान असेल ( इंग्रजीत ज्याला आपण विन-विन सिचुएशन म्हणतो  ) तर हा व्यवहार सुरु राहतो. साहित्यात या दोन पार्ट्या कोण असतील हे तुम्ही सहज समजू शकता. बरोबर, साहित्य तयार करणारा, जन्माला घालणारा म्हणजे लेखक आणि ज्याच्या आस्वादाशिवाय ही निर्मिती अपूर्ण आहे तो वाचक. साहित्याचा मुख्य व्यवहार हा या दोघातच होतो. बाकी सर्व घटक यांना पूरक. त्यातही लेखक आणि वाचक यात अंड आधी की कोंबडी? असा वाद मुळीच नाही. निःसंशय लेखकाची व्यक्त होण्याची प्रेरणा, उर्मी आधी. म्हणून आपल्या ‘साहित्य व्यवहाराची’ सुरुवात पण आपण ‘लेखकाने’ करूया…
आपण असं म्हणूया कुठल्याही कलावंताची व्यक्त होण्याची प्रेरणाच आदिम आहे. त्याचे आविष्कार निरनिराळ्या स्वरुपात झाले. कोणी संगीत निर्माण केले, कोणी चित्रकला, कोणी शिल्पकला. जेव्हा कधी माणसाला अक्षर’ओळख झाली असेल त्यानंतर हे व्यक्त होणं शब्दांच्या माध्यमातून सुरु झालं असेल. त्यातही गंमत अशी की संगीत, चित्रकला, शिल्पकला यांचा आस्वाद घ्यायला माणसाला कान किंवा डोळे असणं पुरेसं होतं. पण लिखित गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी ती ‘वाचता’ येणे आवश्यक होते. म्हणजे ‘समजणं’ अजून लांब होतं. त्याआधी ‘हे’ काय आहे ते कळणं पण सामान्यांसाठी दुरापास्त होतं. म्हणजे अक्षरओळख नसलेला मोठा समुदाय मुळातच या लेखक नावाच्या निर्मात्यापासून तुटलेला होता. त्यामुळे जेव्हा पूर्वी लेखक त्या त्या काळाच्या भाषेत लिहित होता तेव्हा त्याचं लेखन हे स्वान्तसुखाय असण्याचीच शक्यता जास्त आहे. म्हणजे ते कोणी वाचावं, त्यावर आपलं मत द्यावं आणि त्या मतांच्या देवाण घेवाणीमुळे लेखकालाही काहीतरी मिळावं हा सगळा व्यवहार तेव्हा लेखकाच्या मनातही नसेल. शिलालेखन, मग भूर्जपत्र, मग कागदाचा शोध, शिळाप्रेस आणि मग अलीकडे लागलेला प्रिंटींग चा शोध या सगळ्या प्रवासात लेखकही बदलत किंवा आपण त्याला evolve होत गेला असं म्हणूया. यातील गटेनबर्ग चा प्रिंटींग चा शोध हा पंधराव्या शतकातील आहे. म्हणजे अगदी जगातील पहिले लिखाण मेसोपोटेमिया ( सध्याचा इराक ) मध्ये सापडते. कालखंड होता ख्रिस्तपूर्व ३४००. म्हणजे ती ३४०० आणि पुढची १५०० अशी जवळपास पाच हजार वर्ष प्रिंटींग पर्यंत लागली. त्याच्या पुढचा पाचशे वर्षातला टाईपरायटर , कॉम्प्युटर चा प्रवास आपण जाणतोच. एवढ्या साडेपाच हजार वर्षात माणूस किती बदलला? लेखक म्हणजे कोण? माणूसच ना? म्हटल्यावर लेखकही बदलला, evolve झाला. सुरुवातीचे लेखन धार्मिक ( देव देवतांच्या गोष्टी, त्यांची स्तुती वगैरे ) मग बरेचसे दस्तऐवजीकरण मग मनोरंजनपर गोष्टी वगैरे बदलत गेले. आमच्या लहानपणी आम्ही का लिहायचो हे आठवलं तर बरेचसे लिखाण हे शालेय परीक्षात व्हायचे. अभ्यासाचे आकलन लेखनातून परीक्षकापर्यंत पोचवणे ही आमच्या काळातील कला होती. शिक्षण पद्धतीने लिखाणाला महत्व दिले होते. आता हळूहळू अभ्यासाचे आकलन समजून घ्यायच्या इतर पद्धती विकसित झाल्या. मुलांचे पुरवण्या मागून पुरवण्या घेऊन लिहायचे थांबले. आमच्या आधीची पिढी पत्र लिहायची खूप. कित्येक मोठ्या माणसांचा पत्र व्यवहार प्रसिद्ध झालेला आहे. आमच्या पिढीत आमचं पत्र लिहिणं कमी कमी होत गेलं, पत्र हळूहळू इमेल झाली आणि आताशा तर इमेल सुद्धा भूतकाळ वाटावा अशी परिस्थिती आहे.
म्हणजे तसं बघायचं तर लिखाण कमी होत गेलेलं दिसतं. पण ते फक्त पेन रिफील ने केलेलं लिखाण बरं का… फेसबुक वर अब्जावधी लोक आहेत. त्यांचे ढोबळमानाने दर्शक, वाचक आणि लेखक असे वर्गीकरण होते. त्यातील बरेचसे दर्शक असतात. ते व्हिडीओ बघतात आणि लेखही बघतातच. ‘आपल्या’ माणसाचा लेख असेल तर लगेच त्याला लाईक टाकून खुश करतात. त्यांनी लाईक टाकला याचा अर्थ त्यांनी तो लेख वाचलाय आणि त्यातील आशयाशी ते सहमत आहेत असा अजिबात होत नाही. आणि हे लेखकही मनोमन जाणून असतात. पण तरीही ते लाईक त्यांना रिझवतात. अमुक लाईक आले म्हणून पुढे लिहायला प्रोत्साहित होतात आणि आले नाहीत तर रुसतात देखील 🙂 असे दर्शक सोडले तर बरेचसे मग वाचक असतात आणि या सगळ्यांना फेसबुक वर यायला प्रवृत्त करणारे लेखकही लाखोंच्या संख्येने असतात. फेसबुक शिवाय ब्लॉगिंग साईट्स असतात. त्यावरही अनेक लेखक आहेत जे नियमित लिखाण करतात. हे झाले online लेखक. यशिवाय फक्त महाराष्ट्रात मराठीतून निघणारी दोन तीनशे नियतकालिके, तेवढेच दिवाळी अंक, दैनिक आणि त्यांच्या पुरवण्या या सगळ्यात साहित्य लागतेच आणि त्याचा नियमित पुरवठाही होत असतो. म्हणजे अंदाज आला केSSवढे लेखक आहेत ते. गमतीने आता असं म्हटलं जातं की सध्या लेखक जास्त आणि वाचक कमी अशी परिस्थिती आहे. यावरूनच माझा सिद्धांत लेखक आधी, वाचक नंतर हा सिद्ध होतो.
अर्थात या सगळ्या लेखनाला साहित्य म्हणावं का न म्हणावं हा कळीचा मुद्दा आहेच. आताच्या ‘सुमारांच्या सद्दीत’ दहा ओळी लिहिणाऱ्यांना देखील आजूबाजूचे लेखक म्हणून भाव देतात. पूर्वीचा महाकाव्य लिहिणारा लेखक नंतर नंतर कादंबरी, कथा लघुकथा लिहिता लिहिता आता अलक (अति लघु कथा) लिहू लागला. साहित्यातले हे वाद आपण बाजूला ठेवू. माझ्या मते एखाद्याचं लिखाण वाचकांच्या हृदयाला भिडत असेल तर तो लेखक. असो…
नवीन युगाच्या लेखकाला आज काय काय आव्हानं आणि संधी उपलब्ध आहेत ते बघूया…
यात लेखक म्हणजे ज्याला वाचकांपर्यंत पोचण्यात रस आहे तेच आपण धरूया. आणि लेखन म्हणजे साहित्यपर लेखन एवढाच परीघ समजून घेऊया. जे लेखनाकडे स्वान्तसुखाय , एक पर्गेशन म्हणून बघतात त्यांचा इथे विचार करण्यात अर्थ नाही. कारण आपला विषयच साहित्य ‘व्यवहार’ आहे. त्यामुळे जे लेखक वाचकापर्यंत पोहोचू इच्छितात, त्यातून काही आर्थिक प्राप्ती करू इच्छितात त्याच्यासाठी आता बरेच पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
ब्लॉग्स- त्यातील ब्लॉग लेखन तर सर्वांना ठाऊकच आहे. सुरुवातीला त्याकडे आकर्षित होणारे बरेच लेखक होते. वाचकाला आवडतील असे विषय, लिखाणातले सातत्य असेल तर वाचक बऱ्यापैकी ब्लॉगवर येतात. पण मराठी लेखकांना लवकरच अशा फ्री ब्लॉग्गिंग मधून खूप प्राप्ती नाही हे कळलंय. कारण यात पैसे कमावण्याचे मॉडेल असे असते की तुम्ही लिहिलेले वाचायला किती लोक येतात आणि त्यात सातत्य किती? यावर तुमच्या ब्लॉगवर गुगल जाहिराती चालवत. त्या जाहिरातीतून लेखकाला त्याचा वाटा मिळतो. हे इंग्रजी लेखक आणि लिखाणाबाबत ठीक आहे कारण त्याचा मुळात वाचकवर्ग मोठा आहे. पण मराठीचं तसं होत नाही. मुळात वाचक संख्या कमी, त्यातून आपल्या ब्लॉगवर नियमित येणारे मर्यादित. त्यामुळे त्यातून होणारे जाहिरातीचे उत्पन्न खूप मिळत नाही. पेड ब्लॉग हा त्यावर एक पर्याय आहे. म्हणजे वाचकांनी पैसे भरून ब्लॉग वाचायचा. आम्ही बहुविध डॉट कॉम वर हा उद्योग करून बघितला. पण यात अडचण अशी आहे की तुमचे लिखाण आणि विषय एकदमच exclusive हवा तर वाचक पदरमोड करतो. शिवाय असे ब्लॉग कायम स्वरूपी लिहित असाल तर वाचक हळूहळू त्यावर जमा होतो. त्यामुळे अनवट विषय आणि वाट पाहण्याची तयारी असेल तर नव्या लेखकांसाठी हा चांगला पर्याय आहे. ब्लॉग लिखाणासाठी अनेक साईट्स उपलब्ध आहेत. पुढील लिंक त्यातील काहींची माहिती देते. https://websitesetup.org/best-blog-sites/

लेख- इंग्रजीत आणि आता मराठीत देखील लेखकांना online लेख लिहून पैसे कमवता येतील अशी व्यासपिठ तयार झाली आहेत. उदा. इंग्रजीत मिडीयम आणि मराठीत लेखक online. वेगवेगळ्या विषयांवर पण नियमित लेख लिहिणाऱ्या लेखकांना हा चांगला पर्याय आहे. अर्थात अशा व्यासपीठांवर असणारी पेमेंट wall ( म्हणजे या व्यासपीठांवर लेख वाचण्यासाठी वाचकाला पैसे भरून सभासदत्व घ्यावे लागते, मगच ते लेख वाचू शकतात ) ही वाचक आणि लेखकांच्या मध्ये असते. त्यामुळे ज्या  लेखकांना अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचायचे आहे, त्यातून काही आर्थिक प्राप्ती होते का ते अलहिदा, त्यांच्यासाठी ही माध्यमे योग्य ठरत नाहीत. मात्र आर्थिक प्राप्ती हाच ज्यांचा हेतू आहे अशा लेखकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याशिवायही online विश्वात लिहून पैसे कमावण्याचे अनेक पर्याय आहेत. publish articles online and get paid असं टाईप करून गुगल केलं तर असंख्य पर्याय दिसतात.
इ-पुस्तक- स्वतःचे पुस्तक तयार करून स्वतः प्रकाशित करण्याचे आता असंख्य पर्याय online उपलब्ध आहेत हे तर आपल्याला माहिती आहेच. self पब्लिशिंग असे आपण त्याला म्हणतो. प्रिंट माध्यमाच्या काळात मात्र लेखकाला प्रकाशकाची गरज होती. लेखक स्वतःचे पुस्तक प्रत्येक दुकानात उपलब्ध करण्यासाठी फिरू शकत नव्हता. विक्री झाली का? झाल्यानंतर पैसे गोळा करणे हेही त्याला शक्य नव्हते. शिवाय पुस्तक लोकांना माहिती होण्यासाठी जे प्रचारतंत्र लागते त्याचाही त्याच्याकडे अभाव असायचा. या सगळ्या गरजा प्रकाशकांनी भागवल्या. पुढे पुढे मग लेखकाला कुशल संपादनाची जोड देणे, चांगली मुखपृष्ठ, मांडणी, अक्षराचा font या माध्यमातून लेखनाला अधिक उठाव आणणे यातून प्रकाशकांचेही वेगळेपण ठरायचे. अर्थात अशा प्रकाशकांना डिमांड असल्यामुळे मग त्यांच्याकडे पुस्तकांची वेटिंग लिस्ट तयार व्हायची, अगदी पुढच्या 3-4 वर्षांपर्यंत ती मोठी असायची. शिवाय काही लेखकांना संपादनाचा जाच वाटायचा. काही प्रकाशकांचे आर्थिक हिशोब पारदर्शक नसल्याच्या चर्चा सुद्धा होत्या. लेखकाला प्रकाशकांनी किती पुस्तकं विकली, आपल्याला कितीचे पैसे मिळाले हे काहीच स्पष्ट नसायचे किंवा असं म्हणूया त्यासाठीच्या योग्य सिस्टिम्स त्याकाळी तयार झाल्या नव्हत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता लेखकांना पर्यायांचे स्वातंत्र्य आहे. प्रिंट पुस्तक काढायचे की नाही? काढायचे तर मग त्याच प्रकाशकाला online चेही हक्क द्यायचे का? की आपणच स्वतः online पुस्तक पब्लिश करायचे? वगैरे गोष्टींवर लेखक आता स्वतंत्रपणे विचार करू शकतो. प्रिंट प्रकाशकांकडून मिळणाऱ्या उपरोक्त सगळ्या सुविधा (जशा की संपादन, मुखपृष्ठ, मांडणी वगैरे ) हे online पब्लिशर सुद्धा देतात. self publishing असं गुगलवर शोधलं तर असे चिकार platforms मिळतील. मग कोणता पर्याय घ्यायचा? मला वाटतं लेखकाने पुस्तक तयार होण्याच्या पलीकडे त्याचे online वितरण देखील ध्यानात घ्यायला हवे. परवाच नेटवर काही शोधत असताना मला https://publishdrive.com/ हा platform दिसला. यावर लेखक आपले account तयार करून मग आपले पुस्तक एकाच वेळी जवळपास ४०० हून अधिक online stores (जसे की amazon, google, apple books वगैरे ) आणि साधारण अडीच लाख पब्लिक लायब्ररीज मधून प्रकाशित करू शकतो. आहे ना जबरदस्त? एवढेच नाही तर हे platforms  पुस्तक वितरणाचे, विक्री पश्चात हिशोबाचे पण काम करतात. म्हणजे वर उल्लेख केलेल्या ४००+ online stores मध्ये पुस्तकाची विक्री झाली तर त्यांच्याकडून पैसे मिळवून ते लेखकाच्या खात्यात जमा करतात, अर्थात स्वतःचे कमिशन कापून. त्यामुळे लेखकांची खूपच मोठी सोय झालेली आहे. आणि आपल्याला वाटेल publishdrive एवढी भारी सेवा देत आहे तर त्यांची मक्तेदारी वगैरे असेल पण गंमत म्हणजे  publishdrive सारखे अन्य अनेक platforms एकमेकांशी स्पर्धा करीत या online विश्वात तगून आहेत. अशा retailer & aggregator ची यादी गुगल केल्यास मिळू शकते.
बघायला गेल्यास लेखन आणि त्यातही साहित्य प्रकारचे लेखन यात आता अमर्याद संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी लेखकाने  थोडे बहिर्मुख ( extrovert ) व्हायला हवे. मान्य आहे की लेखक म्हटला की तो अंतर्मुख असणेच आवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्या ‘अंतरीचे धावे’ बाहेर कसे येणार? पण बाहेरचे जग बदलत आहे, वाचक आणि त्याच्या गरजा बदलत आहेत, लोकांचे आकलन बदलत आहे. हे बदल लेखकाने टिपले पाहिजेत. लेखकाने आता लिहिताना देखील डिजिटल माध्यमाचा विचार करून वाचकाला संदर्भश्रीमंत करण्यासाठी निरनिराळ्या links, इमेजेस, video हे जिथे शक्य आणि योग्य आहे तिथे आपल्या लेखनात आणले पाहिजेत. लेखकाचे स्वतः बनवलेले video आणि काढलेले फोटो असतील तर ते आवश्यक तिथे वापरता येतील. लेखकाने वाचकाच्या दृष्टीने आपल्या लिखाणाकडे बघायला हवं. शेवटी या ‘साहित्य व्यवहारात’ लेखक-वाचक अशा दोन्ही बाजूंचे समाधानच तर महत्वाचे, होय ना?