शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी उषा धर्माधिकारी यांच्या ‘कर्णबधिरांच्या विश्वात’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लोकमान्य टिळक रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपला कुटुंबिय कर्णबधिर असलेल्या काही व्यक्तींनी आपली मनोगते व अनुभव व्यक्त केले. मुलगी आणि जावई कर्णबधिर असलेल्या भक्ती वाळवे, पती कर्णबधिर असलेल्या अंजू केजरीवाल यांची मनोगते व मुलगा-सून कर्णबधिर असलेल्या आशा कुलकर्णी यांची अनघा शिंग्रूट यांनी घेतलेली मुलाखत अतिशय हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी होती. कर्णबधिरांच्या उच्चशिक्षण व नोकऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या टीच या संस्थेचे अमन शर्मा आणि केवळ कर्णबधिर कर्मचारी असलेली ‘इशारा’ ही उपाहारगृहांची मालिका चालवणारे प्रशांत इस्सर यांच्या मनोगतांमधून या समस्येवर उत्तर म्हणून सुरू असलेले दोन आशादायक प्रयत्न उपस्थितांना समजले.
यानंतर पुस्तकाचे ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत दिनकर गांगल यांच्या हस्ते प्रकाशन झाले. कर्णबधिरांच्या समस्यांना आता आशादायक उत्तरे मिळत आहेत हे या पुस्तकातून व मनोगतातून समजत आहे. समाजात असे चांगले काम करणारी अनेक माणसे आहेत. परंतु माध्यमांमध्ये या चांगल्या कामाचे प्रतिबिंब दिसत नाही. यामुळेच अशा चांगल्या लोकांनी एकत्र येण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर उषा धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतामध्ये अनेकांच्या सहकार्यामुळे हे काम सुरू असल्याचे सांगितले. ग्रंथालीच्यावतीने महेश खरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व शिवदास घोडके, चित्रकार नीलेश जाधव, प्रवीण शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.