फोटो – मंदार भारदे, मुकेश माचकर, लेखिका सारिका कुलकर्णी, पुरुषोत्तम बेर्डे, भूषण कुलकर्णी, सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. लतिका भानुशाली, डॉ. मृण्मयी भजक, धनश्री धारप, अश्विनी भोईर
सारिका कुलकर्णी लिखित ‘चित्तर–बित्तर’ या पुस्तकाचे प्रकाशन
ग्रंथाली प्रकाशित सारिका कुलकर्णी लिखित ‘चित्तर-बित्तर’ या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध लेखक, सिने-नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये झाले. याप्रसंगी ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर व मॅब एव्हिएशनचे कार्यकरी संचालक आणि लेखक मंदार भारदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘एरवी नाटक, सिनेमा यात व्यग्र असलेल्या मला चित्तर-बित्तर या पुस्तकामुळे आपणही लेखक आहोत आणि व्यक्तिचित्रणात्मक लेखन आपणही केले आहे, याची पुन्हा एकदा आठवण झाली.’ असे म्हणत पुरुषोत्तम बेर्डे यांनी पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. ग्रंथालीचा लोगो माझे गुरू शांताराम पवार यांनी तयार केला होता अशी आठवण पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितली.
चित्तर-बित्तर या पुस्तकाला ज्यांनी ब्लर्ब लिहिला आहे ते लेखक मंदार भारदे यावेळी बोलताना म्हणाले, ”सारिका कुलकर्णी यांचे लेखन नर्मविनोदी शैलीतील आहे. हे पुस्तक वाचल्यावर जाणवले की आपल्या आजूबाजूला इतके काही अभद्र वातावरण असताना ही लेखिका त्यातील भद्र गोष्टी वेचते आणि आपल्या लेखनात मांडते. ही दृष्टी व शैली फार कमी जणांकडे असते.”
या पुस्तकाला लेखक मुकेश माचकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकातील लेख ते संपादित करत असलेल्या ‘मार्मिक’ साप्ताहिकामधून प्रकाशित झाले होते. यासंदर्भात बोलताना माचकर म्हणाले, “सारिका कुलकर्णी यांनी मला व्यक्तिचित्रणात्मक लेख लिहिणार असे सांगितले तेव्हा माझी प्रतिक्रिया ‘काय?’ अशी होती. कारण आपल्याकडे पुलंनी केलेले अफलातून व्यक्तिचित्रण आजही लोकांच्या मनात आहे आणि तो मापदंड अशाप्रकारचे लेखन वाचताना वाचकांच्या मनात असतो. परंतु, सारिका कुलकर्णी यांनी आपल्या सहज शैलीत चित्तर-बित्तरमधील लेख लिहिले आहेत. त्यावर कोणाचा पगडा नाही वा अनुकरण नाही. त्यामुळे हे लेख वाचनीय झालेत.”
ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविकातून ग्रंथालीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुस्तकाबद्दल ते म्हणाले, “चित्तर-बितर पुस्तकातील पात्रे आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसे आहेत आणि ती सारिका कुलकर्णी यांनी कोणताही अभिनिवेश न आणता साध्यासरळ नर्मविनोदी शैलीत चितारली आहेत. या पुस्तकातील लेख नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरतील.”
लेखिका सारिका कुलकर्णी यांचे पती भूषण कुलकर्णी यांनी सारिका यांच्या लेखनामागील प्रक्रिया अतिशय हलक्याफुलक्या शैलीत हास्यविनोद करत मांडली. तर लेखिका सारिका कुलकर्णी आपल्या मनोगतात म्हणाल्या, “‘बे दुणे पाच’ हे माझ्या आंनदाचे बाय प्रोडक्ट होते तर ‘चित्तर-बित्तर’ हे माझ्या आनंदाचे निधान आहे. मी लेखनातून मिळणाऱ्या आनंदासाठी लिहीत असते.” अॅडव्होकेट जयेश वाणी यानी चित्तर-बित्तरमधील एका लेखाचे अभिवाचन केले. पुस्तक प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.
– अश्विनी भोईर
