मुलाखत

मोहन टांकसाळे यांची मुलाखत

सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

मोहन टांकसाळे यांची मुलाखत

सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोहन टांकसाळे यांच्या बँकिंगचे ‘अमर्याद विश्व’ हे मराठी पुस्तक व त्याच्या हिंदी अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वर्षपूर्तीनिमित्त टांकसाळे सरांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन वांद्रे येथील ग्रंथालीच्या प्रतिभांगण या वास्तूत शनिवार, ९ मे २०२६ रोजी करण्यात आले होते. नाटककार, लेखक राजीव जोशी आणि बँकर शरदकुमार यांनी मोहन टांकसाळे यांची मुलाखत घेतली. टांकसाळे यांचा बँकिंगच्या क्षेत्रातील पाच दशकांचा अनुभव मुलाखतीत उलगडत गेला.

टांकसाळेसर मुलाखतीत म्हणाले, की Banking is mother of economy . हे लक्षात ठेवून बँकरनी काम केले पाहिजे. बँकिंग म्हणजे केवळ जमाखर्चाचा ताळेबंद नव्हे. लोकांची दुःखं, समस्या समजून घेऊन काम केले तर balance sheet  आपोआपच वाढत जाते. टांकसाळेसरांनी आपल्या बालपणीच्या काही आठवणी सांगत, ते या क्षेत्रात कसे आले हा प्रवासही मुलाखतीतून सांगितला. डिजिटल बँकिंग, फिन्टेक बँकिंग, सर्वसमावेशक बँकिंग अशा विविध पैलूंविषयी मुलाखतीतून सरांनी माहिती दिली. बँकिंगच्या क्षेत्रातील पाच दशकांच्या प्रवासाकडे आपण कसे बघता या प्रश्नाला उत्तर देताना टांकसाळे सर म्हणाले की माझा पाच दशकांचा प्रवास हा सतत शिकण्याचा आणि बदल स्वीकारण्याचा प्रवास आहे. संस्थात्मक विकासाबरोबरच मी मानवी नातेसंबंध जपले याचे मला समाधान आहे. ते पुढे असेही म्हणाले की क्लर्क म्हणून मी बँकेत कामाला लागलो तेव्हा मनात निश्चय केला होता की ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला बराच मोठा प्रवास करायचा आहे नि तो मी माझ्या निश्चयाप्रमाणे पूर्ण केला.

मोहन टांकसाळे यांची प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण मुलाखत आपल्याला लवकरच ग्रंथाली प्रतिभांगण या यू ट्यूब चॅनेलवर पाहता येईल. कार्यक्रमाला अर्थतज्ञ नरेंद्र जाधव सपत्नीक आवर्जून उपस्थित होते. मंदार म्हात्रे यांनी बँकिंगचे अमर्याद विश्व या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली. कार्यक्रमातील मान्यवरांचे आणि सुनील चव्हाण व सतीशकुमार भुकटे यांचे स्वागत ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि संपादक अरुण जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन धनश्री धारप यांनी केले तर अश्विनी भोईर यांनी सूत्रसंचालन केले.

  • अश्विनी भोईर