इतर

प्रसिद्ध कथा-कादंबरीकार वसंत नरहर फेणे यांची जन्मशताब्दी साजरी

मुंबई – ग्रंथाली आणि फेणे कुटुंबीय यांनी संयुक्तरीत्या लेखक वसंत नरहर फेणे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त ‘वसंत नरहर फेणे – व्यक्तित्व आणि साहित्य’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन १ मे २०२६ रोजी, पुल देशपांडे मिनी थिएटर, रवींद्र नाट्यमंदिर येथे केले होते. याप्रसंगी मराठी साहित्याचे अभ्यासक व समीक्षक प्र.ना. परांजपे संपादित, वसंत नरहर फेणे लिखित, एका लेखाचा समावेश करून, त्यांच्या निवडक कथांच्या ‘ध्वजा’ या संग्रहाच्या नवीन आवृतीचे, आणि अरुण जोशी यांनी संपादन केलेल्या त्यांच्या जीवन–साहित्यावर निर्मित पुस्तिकेचे प्रकाशन झाले. ते प्र.ना. परांजपे, ज्येष्ठ पत्रकार-संपादक कुमार केतकर, प्रा. सुरेखा सबनीस, चित्रकार रविमुकुल, सुदेश हिंगलासपूरकर आणि फेणे कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी ‘मृत्युचिये द्वारी’ या लेखातील, ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी ‘सेन्ट्रल बस स्टेशन’ या कादंबरीतील, स्नेहा फेणे यांनी ‘रागिणी’ कथेतील आणि श्वेता फेणे यांनी ‘कारवारची माती’ या कादंबरीतील निवडक अंशाचे अभिवाचन केले. या कार्यक्रमाच्या सूत्रधार डॉ. निर्मोही फडके यांनी फेणे यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण विवेचन करत कार्यक्रम पुढे नेला. त्याआधी फेणे यांचा जीवनपट उलगडणारी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. तिचे संहिता–दिगदर्शन राजीव जोशी यांनी केले आहे.

प्रकाशन कार्यक्रमात ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, फेणे यांच्या कुटुंबाशी ‘सेंट्रल बस स्टेशन’ या कादंबरीच्या निमित्ताने आलेला संपर्क आज ४५ वर्षे आहे, श्रीहर्ष फेणे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमात ग्रंथलीला सहभागी होता आले याबद्दल आनंद होत आहे. फेणे यांच्या निवडक कथा-लेखांचे ऑडिओ बूक या प्रसंगी प्रकाशित करत आहोत व हे साहित्य ग्रंथाली वॉच आणि ग्रंथाली प्रतिभांगण या यूट्यूब चॅनेलवर विनामूल्य उपलब्ध करत आहोत असे सांगितले. प्रदीप वेलणकर, प्रमोद पवार, राजन पाटकर, श्रीनिवास नार्वेकर आणि डॉ. मृण्मयी भजक यांनी या साहित्याचे वचन केले आहे.

मुख्य वक्त्यांनी फेणे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साहित्याचा मागोवा घेतला. वसंत नरहर फेणे यांच्याशी मित्रत्वाचे नाते असलेले प्र.ना. परांजपे म्हणाले, ”फेणे त्यांचं साहित्य मला मित्रत्वाच्या नात्यानं वाचायला देत असत. परंतु त्यांनी कधीही पुस्तक ग्रंथालीनं छापावं असा आग्रह धरला नाही. ‘सेंट्रल बस स्टेशन’प्रमाणे मीच ’कारवारी माती’ हे पुस्तक आपण ग्रंथालीकडे द्यावं असं त्यांना सुचवलं आणि त्याप्रमाणे ते त्यांनी ग्रंथालीकडे दिलं.’ कारवारी माती या कादंबरीत कुठेही कारवार या ठिकाणाचा उल्लेख नाही, मात्र त्यातील भावविश्व कारवारच्या मातीतील आहे, म्हणून या कादंबरीचं शीर्षक ‘कारवारी माती’ असं ठेवण्यात आलं असं सांगताना परांजपे यांनी भाषणात एक खंतही व्यक्त केली, की फेणे लिहीत होते तो काळ ‘सत्यकथे’चा होता. त्या काळात सत्यकथेत लेखन छापून आलं की त्या साहित्याला व लेखकाला प्रसिद्धी नि थोडक्यात मान्यता मिळत असे. फेणे यांनी कधी आपलं लेखन सत्यकथेत छापून यावं यासाठी पाठपुरावा केला नाही, ते केवळ लिहीत राहिले. त्यामुळे त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही.”

कुमार केतकर भाषणात म्हणाले, समाजाच्या नेणिवेचा स्वर फेणे यांच्या साहित्यातून प्रकट होताना दिसतो, ज्यामुळे त्यांचे साहित्य एका उंचीवर जाते. प्राध्यपिका सुरेखा सबनीस यांनी फेणे यांच्या कादंबऱ्यांवर दृष्टिक्षेप टाकला. त्या पुढे म्हणाल्या, की खरे तर फेणे यांच्या कादंबरीलेखनावर बोलायचे तर एक चर्चासत्रच घ्यावे लागेल, इतके कंगोरे त्यांच्या लेखनाला आहेत. त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले, की फेणे यांचं साहित्य उपेक्षित राहिले यात वाचकांची चूक नाही. आम्ही प्राध्यापक व समीक्षकांनी या लेखकाची योग्य दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचायला वेळ लागला. चित्रकार रविमुकुल फेणे यांच्या ‘ध्वजा‘ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील आठवणीला उजाळा दिला. तसेच, ह.मो. मराठे यांनी दिवाळी अंकात घेतलेली, चित्ररेखाटनासाठी पाठवलेली फेणे यांची कथा वाचून आपण कसे प्रभावित झालो, ही आठवण सांगितली.

कार्यक्रमात वसंत फेणे यांचे पुतणे शशिकांत फेणे, त्यांचे धाकटे चिरंजीव कौस्तुभ आणि डॉ. देवदत्त सिनकर, सीमा सिनकर यांनी मनोगते व्यक्त केली. वसंत नरहर फेणे यांचे सुपुत्र श्रीहर्ष फेणे यांनी आत्मीयतेने सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन डॉ. लतिका भानुशाली यांनी केले.

– अश्विनी भोईर