पुस्तक प्रकाशन 2022

ए बी पी माझा दिवाळी अंकाचे प्रकाशन जीवनविद्या परिवाराचे प्रल्हाद पै यांच्या हस्ते

गुरुवार, २० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४.३० वाजता ग्रंथाली प्रतिभांगण येथे ए बी पी माझा या अग्रगण्य वृत्तवाहिनीच्या दुसऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ए बी पी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि जीवनविद्या मिशन या आध्यात्मिक सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रल्हाद पै उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालीच्या वतीने महेश खरे यांनी केले. त्यानंतर राजीव खांडेकर, प्रल्हाद पै, ‘ए बी पी माझा’च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, माझा दिवाळी अंकाच्या सहाय्यक संपादक भारती सहस्रबुद्धे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या प्रज्ञा पोवळे यांचे पुस्तक व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

राजीव खांडेकर यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये ‘ए बी पी माझा’सारख्या लोकप्रिय वाहिनीला हा दिवाळी अंक का काढावासा वाटला हे सांगितले. आम्ही वृत्तवाहिनीच्या कामाची ८०% बातम्या आणि २०% सकारात्मक-सर्जनशील कार्यक्रम अशी विभागणी केली आहे. मी स्वतः ‘प्रिंट’ माध्यमातून आलो असल्याने दिवाळी अंक ही संकल्पना मला हाताळावी असे वाटले. दिवाळी अंक हा २०% कामाचा भाग म्हणून आम्ही करत आहोत व त्यात आम्हाला आनंद मिळत आहे असे खांडेकर म्हणाले. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या तथाकथित आध्यात्मिक बुवा – बाबांच्या तुलनेमध्ये माणसाला सकारात्मकता व क्रियाशीलता अंगी बाणवायला सांगणारे वामनराव पै आणि जीवनविद्या मिशन यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्याशी असलेल्या घनिष्ट संबंधामुळेच दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी श्री. प्रल्हाद पै यांना आमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले.

प्रल्हाद पै यांनी आपल्या मनोगतामध्ये ए बी पी माझा दिवाळी अंकाला शुभेच्छा दिल्या. अध्यात्मामध्ये प्रत्येक क्षणामध्ये जगणे, त्या क्षणाचा आनंद घेणे व तो इतरांना वाटणे हे महत्त्वाचे असते. जीवनविद्या मिशनच्या प्रार्थनेमध्ये हाच विचार मांडला आहे असे त्यांनी सांगितले. चांगलं वाचणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच माझा दिवाळी अंक जास्तीत जास्त जणांनी वाचावा असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा पोवळे यांनी केले.

Back to list