पुस्तक प्रकाशन

डॉ. प्रकाश खांडगे लिखित ‘लोकरंगनायक’ पुस्तकाचे प्रकाशन

ग्रंथाली प्रकाशित, प्रा.डॉ. प्रकाश खांडगे लिखित ‘लोकरंगनायक’ या पुस्तकाचे प्रकाशन महारष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आणि माजी विधानपरिषद सदस्य मा. उल्हासदादा पवार यांच्या हस्ते मंगळवार, १२ मे २०२६ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिराच्या पु.ल. कलाअकादमी येथे झाले. याप्रसंगी प्रसिद्ध नाटककार पद्मश्री वामन केंद्रे, लेखक–नाटककार अभिराम भडकमकर, लावणीसम्राज्ञी राजश्री काळे-नगरकर, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते.

प्रकाशन समारंभात बोलताना, ‘महाराष्ट्रात जेवढ्या लोककला आहेत, तेवढ्या लोककला अन्य कोणत्या राज्यात असतील असे वाटत नाही. ही महाराष्ट्राची श्रीमंती आहे.’ असे अॅड. आशिष शेलार म्हणाले. डॉ. प्रकाश खांडगे हा ध्येयवेडा, ध्यास असलेला माणूस आहे. हिंदुस्थान लिव्हरमध्ये चांगली नोकरी असताना, ती बाजूला सारून केवळ नि केवळ लोककलेसाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य समर्पित केले, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी डॉ .खांडगे यांच्या कार्याचा गौरव केला.

माजी विधानपरिषद सदस्य उल्हासदादादा पवार यांनी भाषणातून लोककलेच्या क्षेत्रातील अनेक आठवणी सांगत लोक कलावंतांच्या प्रतिभेचा पट मांडला. डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले, की ‘लोकरंगनायक’ हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील उपेक्षित लोकदीक्षितांच्या कार्याचा परिचय आहे. या पुस्तकाच्या वाचनातून मनोरंजन व प्रबोधन दोन्ही गोष्टी साध्य होतात. ग्रंथाली ही केवळ पुस्तक प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था नाही आहे. सामजिक बांधिलकी जपणारी संस्था असा ग्रंथालीचा लौकिक होता व आजही आहे. अशी एक संस्था आपले पुस्तक प्रकाशित करत आहे, याबदल लेखक प्रकाश खांडगे यांनी आनंद व्यक्त केला.

पद्मश्री वामन केंद्रे भाषणात म्हणाले, महाराष्ट्राच्या लोककलेला कणा देण्याचे काम प्रकाश खांडगे यांनी केले आहे. नाटककार व लेखक अभिराम भडकमकर यांनी ‘लोकरंगनायक; पुस्तकाविषयी सवित्सर मांडणी केली. ते म्हणाले की लोककलेचा संपूर्ण इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेता येतो. पुस्तकात तेरा लोकनायकांची केवळ माहिती नाही, तर त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून लोककलेचा इतिहास उलगडत जातो.

लावणीसम्राज्ञी राजश्रीताई काळे-नगरकर म्हणाल्या की डॉ.प्रकाश खांडगे म्हणजे लोककलेचे चालतेबोलते विद्यापीठ आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, शाहीर यशवंत जाधव आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्रगीत व पोवाडा सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.