पुस्तक प्रकाशन 2022

रिक्त – विरक्त

छाया कोरेगांवकर लिखित

रिक्त – विरक्त
या पुस्तकाचे प्रकाशन

प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार (अध्यक्ष)

राजन खान (लेखक)

प्रतिमा जोशी (पत्रकार)

प्रा. श्यामला गरुड
प्रा. प्रकाश नाईक

मंगळवार, १४ जून २०२२, सायंकाळी ५ वा.
स्थळ : दादर- माटुंगा कल्चरल सेंटर, दादर (प.)
मुंबई – ४०००१६

प्रकाशन वृतांत
रिक्त-विरक्त’कादंबरीचे प्रकाशन
‘ग्रंथाली प्रकाशन’नं प्रकाशित केलेल्या सुप्रसिद्ध कवयित्री छाया कोरेगांवकर यांच्या ‘रिक्त-विरक्त’ या कादंबरीचा प्रकाशन समारंभ प्रख्यात कवयित्री प्रज्ञा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, 14 जून 2022 रोजी मुंबईच्या दादर-माटुंगा कल्चरल सेंटर इथे संपन्न झाला. सुप्रसिद्ध लेखक राजन खान, मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापिका आणि लेखिका डॉ. श्यामल गरुड तसेच विद्रोही कवी प्रकाश नाईक हे मान्यवर वक्ते म्हणून उपस्थित होते.
राजन खान यांनी या कादंबरीच्या स्त्रीवादी पैलूंवर प्रकाश टाकला. प्रत्येक पुरुषाला आपल्या चुकांचा शोध घ्यायला लावणारी ही कादंबरी असल्याचे नमूद करून, त्यांनी या कादंबरीमध्ये वेबसीरिज किंवा चित्रपट बनवण्यासारखे सशक्त कथाबीज असल्याचे सांगितले. प्रकाश नाईक यांनी विस्तृतपणे यातील शक्तिस्थळांची ओळख करून दिली. स्त्री आणि पुरुष यांच्यातील लैंगिक संबंधांच्या पलीकडे जाऊन निखळ प्रेमाचा स्वीकार, हे कादंबरीचं सूत्र त्यांनी अधोरेखित केलं. डॉ. श्यामल गरुड यांनी या कादंबरीतून व्यक्त होणार्‍या सामाजिक आशयावर भर देत, भारतातील पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमुळे स्त्रियांच्या वाट्याला येणार्‍या दुःखाची मांडणी केली. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी अध्यक्षीय भाषणातून यातील अनेक पेच-गुंतागुंत-व्यक्तिरेखा उलगडून दाखवल्या. स्त्रीला स्वतःच्या लैंगिक जाणिवा व्यक्त करण्याची इथली समाजव्यवस्था परवानगी देत नाही. स्त्रियांच्या लेखनावरही बंधनं घातली जातात हे वास्तव मांडून, छाया कोरेगांवकर यांची कादंबरी रसरशीत जीवनाचं कसं दर्शन देते यावर उत्कट भाष्य केलं. मराठी कादंबरीच्या प्रवासातील ही एक सशक्त कादंबरी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
लेखिका छाया कोरेगांवकर यांनी आपल्या मनोगतातून, यात आलेल्या व्यक्तिरेखा काल्पनिक नसून त्या आपल्याला जीवनाच्या प्रवासात भेटल्या असल्याचं नमूद केलं. यातील अनेकांनी आपल्याला त्रास दिला, पण आपण त्यांना माफ केलंय. त्यांच्यामुळे आपण ही साहित्यकृती लिहू शकलो त्यामुळे त्यांचे मी आभारच मानते, असं प्रांजळपणे कबूल केलं.
प्रा. वृषाली विनायक यांच्या सुंदर-नेटक्या सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाचे देखणेपण वाढले. ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर हेही मंचावर उपस्थित होते.
– प्रा. आशालता कांबळे

Back to list