पुस्तक प्रकाशन 2022

‘कॅडेट नंबर ३४५०

‘जगण्याला बळ देते ती सर्वश्रेष्ठ कलाकृती’

– अविनाश धर्माधिकारी

वैश्विकतेची मूळ  संकल्पना आपण जगाला दिली आहे. आता त्या वैश्विकतेच्या पातळीवर आपण सिद्ध होण्याची वेळ आली आहे. जगण्याच्या संघर्षमय वाटचालीत साहित्य आपला आधार होत असते. जी साहित्यकृती जगण्याला बळ देते ती सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली पाहिजे, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

मर्चंट नेव्हीमध्ये साकारलेला कॅडेट ते कॅप्टन हा कर्तृत्वसंपन्न कार्यकाळ आणि या कालखंडात जहाजावर आणि जहाज नांगरल्यावर विविध देशांत आलेल्या थरारक अनुभवांची रोमहर्षक कहाणी असलेल्या कॅप्टन सचिन गोगटे लिखित आणि ग्रंथाली  प्रकाशित ‘कॅडेट नंबर ३४५०’ या पुस्तकाचे प्रकाशन आज धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर , पूर्णा धर्माधिकारी, अरुण जोशी, अलका गोगटे, मीना गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले, की तरुण घडवताना आता केवळ स्थानिक पातळीवर सजग असणारा तरुण घडवून चालणार नसून वैश्विक पातळीवर काय घडामोडी घडत आहेत, त्याची जाण बाळगणारा तरुण घडवावा लागणार आहे. हे विश्व एक जग झाले आहे हे जाणिवांच्या पातळीवर मान्य करून तरुणांवर काम करावे लागणार आहे. व्यसनांचे प्रचंड आकर्षण सभोवताली असून त्या व्यसनांच्या आहारी न जाता आपले करिअर आपण कसे उत्तम घडवू याकडे तरुणांनी  लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

लेखक कॅप्टन सचिन गोगटे आपल्या मनोगत म्हणाले, की मर्चंट नेव्हीमधील आयुष्य प्रचंड आव्हानांनी भरलेले असते. मर्चंट नेव्हीबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. व्यसनाधीनतेच्या बाबतीत त्यातील काही समज काही अंशी खरे  आहेत, परंतु त्यास अपवाददेखील आहेत. मर्चंट नेव्हीमधील नोकरीच्या निमित्ताने समुद्रावरील अफाट जग मला अनुभवता आले. निसर्गापुढे मनुष्यप्राणी खूप छोटा जीव आहे, याची मला वेळोवेळी प्रचीती आली.

ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर  यांनी ग्रंथालीच्या उपक्रमांबाबत माहिती देत पुस्तक प्रकाशनामागची भूमिका विशद केली.

मंजिरी कर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अर्चना लेले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

छायाचित्र ओळ :- ‘कॅडेट नंबर ३४५०’ या पुस्तकाच्या प्रकाशन समयी अरुण जोशी, सुदेश हिंगलासपूरकर, मीना गोगटे, लेखक कॅप्टन सचिन गोगटे, अविनाश धर्माधिकारी आणि पूर्णा धर्माधिकारी.