कोलाज

नवीन वर्षाच्या निमित्ताने

डॉ. मोहन द्रविड

स्वतंत्र भारताने २२ मार्च हा भारतीय सौरवर्षाचा प्रथमदिन ठरवून इतिहासाशी बांधिलकी दाखवली यात शंकाच नाही. २१ मार्च रोजी दिवस आणि रात्र सारख्या लांबीचे असतात (लॅटिन भाषेत Equinox). आपलं पंचांग या दिवसाला संपातदिन म्हणून संबोधतं. चार हजार वर्षांपूर्वी बॅबिलोनियन लोकांनी या दिवसाला ऋतुचक्राचा पाया धरला आणि दोन लागोपाठच्या संपातदिनांमधील कालावधी मोजून सौरवर्षाचे ३६५+ दिवस पक्के केले. या अवधीच्या वर्षाला आपण Tropical year म्हणतो.

पारशी लोकांचा, तसंच पुरातन इराणी लोकांचा, नवरोज याच दिवशी (१९ ते २१ मार्च) येतो. आपण भारतीय चांद्रसूर्य मिश्र वर्ष पाळत असल्यानं आपलं शालिवाहन शक संपातदिनी किंवा त्याच्या पुढच्या प्रतिपदेला चालू होतं. हाच आपला गुढीपाडवा. ज्यू धर्मीयांचा पासोव्हर सण संपातदिनाच्या पुढच्या पौर्णिमेला येतो, तर ईस्टर हा सण या पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी येतो. त्या आधीचा गुरुवार हा ख्रिश्चनांचा पासोव्हर. या दिवशी येशू शेवटचं जेवण जेवला. अशा तऱ्हेनं वसंतऋतूतील संपातदिन बहुतेक सर्व धर्मांच्या सणांमध्ये गुंफला गेला आहे.

बॅबिलोनियन नक्षत्रांची यादी (600 BC)­

बॅबिलोनियन लोकांनी सूर्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण खगोलाचंही निरीक्षण केलं आणि बघितलेल्या ताऱ्यांची जंत्री (Catatog) केली. त्याची नोंद त्यांनी विटांच्या पाट्यांवर (Clay tablets) करून ठेवली. या पाट्यांचे अवशेष संग्रहालयात अजूनही जपून ठेवले आहेत. नक्षत्रांची माहिती त्यांनी MUL.APIN या तीन पाट्यांवर कोरून ठेवली होती. (यातल्या दोनच सध्या अस्तित्वात आहेत.) त्या नोंदी पाहून हे लक्षात येतं की बॅबिलोनियन लोकांना सूर्याचा आकाशातील मार्ग आणि त्यावर येणारी आज परिचित असलेली बारा अधिक सहा अशी अठरा नक्षत्रं माहीत होती. त्यांनी दिलेली नक्षत्रांची नावं (Aries-मेष असं आपापल्या भाषेत भाषांतर करून) आपण अजूनही वापरतो.

खगोलशास्त्राचा यानंतर सखोल अभ्यास केला हिपार्कस (ख्रिस्तपूर्व १९०-१२०) या ग्रीक शास्त्रज्ञानं. हिपार्कस हा एक अद्वितीय संशोधक होऊन गेला. काही शास्त्रज्ञ त्याला इतिहासातील सर्वश्रेष्ठ खगोलशास्त्रज्ञ असा मान देतात. ट्रिग्नॉमेट्री या गणिताच्या शाखेचा त्यानं पाया घातला. संयोजक (Combinatorics) या गणिताच्या शाखेत केलेल्या त्याच्या संशोधनाचा अर्थ गणितज्ज्ञांना समजेपर्यंत १८७० साल उजाडलं. आकाशातल्या तारांगणात कधीही फरक पडत नाही या तेव्हाच्या प्रचलित कल्पनेबद्दल त्याला शंका होती. सुदैवानं, त्याच्या हयातीतच एक नवीन तारा (Nova) जन्माला आला. मुख्य म्हणजे तो सर्वप्रथम त्याच्याच लक्षात आला.

चंद्राचं पृथ्वीपासूनचं तंतोतंत अंतर (पृथ्वीच्या त्रिज्येच्या साठ पट) काढणारा तो पहिला खगोलशास्त्रज्ञ. तेही एका नाही तर तीन वेगळ्या पद्धतींनी. त्यातली एक पद्धत तर फारच मनोरंजक आहे. त्याच्या शहरात खग्रास सूर्यग्रहण पडणार होतं त्यावेळची गोष्ट आहे. शेजारच्या गावी जाऊन तिथून दिसलेल्या सूर्यबिंब अडवणाऱ्या चंद्राच्या वर्तुळाकार कडेवरून आणि दोन शहरातील अंतरावरून त्याने ट्रिगनॉमेट्रीच्या सहाय्याने चंद्राचा व्यास आणि त्यावरून चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर काढलं.

हिपार्कसनं स्वत: सौरवर्ष आणि सूर्याच्या प्रवासांतील नक्षत्रं यांचा नव्यानं अभ्यास करायचं ठरवलं. “मी ताऱ्यांची जंत्री (Catalog) तयार करून ठेवतो. याच्यावरून तारे आपल्या जागा थोड्या तरी बदलत असले तर ते भविष्यातील शास्त्रज्ञांच्या हजारदोन हजार वर्षांनी का होईना पण लक्षात येईल,” असं त्यानं लिहून ठेवलं. १७१८ साली एडमंड हॅलीनं (ज्याच्या नावानं एक प्रसिद्ध धूमकेतू आहे) सूर्यमालिकेच्या जवळचे सिरियससारखे तारे हलले आहेत हे दाखवलं. सौरवर्षाबद्दल हिपार्कसनं लिहिले, “सौरवर्ष हे ३६५ अधिक  १/४ वजा १/३०० दिवस आहे.” (त्याच्या काळात दशांश पद्धती नव्हती!) खऱ्या सौरवर्षापेक्षा हा आकडा फक्त सहा मिनिटांनी जास्त आहे!

सौरवर्ष आणि चांद्रमास यांची त्यानं सांगड घातली- १९ सौरवर्षे (२२८ सौरमास) म्हणजे २३५ चांद्रमास. म्हणजे दर १९ वर्षांनी तिथी आणि तारखा ‘मॅच’ होतात. आपली जन्माची तिथी आणि आपल्या १९ व्या, ३८ व्या, वगैरे वाढदिवसाची तिथी एकच आहे, हे जिज्ञासूंना तपासून पाहता येईल. याचा दुसरा अर्थ म्हणजे दर १९ वर्षांत (२३५ वजा २२८) ७ अधिक महिने येतात. श्रद्धाळूंना अभिमानास्पद बाब म्हणजे या गोष्टीचा उल्लेख बायबलमध्ये केला आहे. हा त्यांना दैवी हस्तक्षेप वाटतो.

आता राहिला नक्षत्रांचा अभ्यास. नक्षत्रं तर दिवसा दिसत नाहीत. मग सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे हे कसं काढायचं? बॅबिलोनियन लोकांचा मार्ग म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाची वाट पाहायची. पण खग्रास सूर्यग्रहणं फार क्वचितच घडतात, आणि ती फार क्षणभंगुर असतात. याउलट चंद्रग्रहणं वर्षात दोन ते पाच असतात. हिपार्कसनं नामी युक्ती काढली. चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असतात. ग्रहण घडले असेल तेव्हा चंद्रावर पडलेल्या पृथ्वीच्या वर्तुळाकार सावलीवरून त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू काढायचा. तो केंद्रबिंदू ज्या नक्षत्रात आहे त्याच्या विरुद्ध बाजूच्या नक्षत्रात सूर्य!

हिपार्कसनं ताऱ्यांचा अभ्यास केला तेव्हा (ख्रिस्तपूर्व १३०) त्याच्या लक्षात एक गोष्ट आली की बॅबिलोनियन लोकांनी केलेल्या नोंदीच्या तुलनेत सूर्य तारांगणातील आपल्या कक्षेत जवळजवळ एक राशी मागे पडला आहे. बॅबिलोनियन लोकांच्या काळात पहिली म्हणजे वसंतसंपातदिनी सूर्याचे संक्रमण होत असलेली राशी वृषभ होती! (त्या काळातील अनेक संस्कृतींमध्ये बैल आणि त्याची पूजा या गोष्टींचं माहात्म्य असल्याने वृषभ राशीला स्वर्गस्थ बैल असं संबोधलं गेलं!) या स्वर्गस्थ बैलाचं पहिल्या मानाचं स्थान डळमळीत झाल्याचं हिपार्कसच्या लक्षात आलं.

तेव्हा हिपार्कसनं अनुमान मांडलं की सूर्य तारांगणातील आपल्या कक्षेत दर वर्षी थोडा थोडा मागे पडतो! टिमोआर्कस या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने १६० वर्षं आधी केलेल्या निरीक्षणावरून हिपार्कसनं गणित मांडलं. सूर्य दर ७२ वर्षांनी १ अंश-म्हणजे साधारण १ दिवस-मागे पडतो. (एक महिना, किंवा एक राशी, मागे पडायला २१५० वर्षं लागतील.) याचं कारणही त्यानं काढलं. ज्या आसाभोवती पृथ्वी फिरते तो पृथ्वीचा आसच हलकेच गोल फिरत आहे. म्हणजे ध्रुव तारा (Polaris) अढळ नाही. कालांतरानं त्याची जागा दुसरा तारा घेईल. बॅबिलोनियन लोकांच्या काळात थूबन (Thuban) हा तारा ‘अढळपदी’ होता. सध्याचा ध्रुव परत अढळपदी यायला आसाला वर्तुळाचे अंश ३६० फिरावे लागेल. म्हणजे २५,८०० वर्षांनी परिस्थिती जैसे थे होईल.

याचा अर्थ Tropical year हे पूर्ण वर्ष नाही. कारण या वर्षाच्या शेवटी पृथ्वीची सूर्याभोवतीची फेरी पूर्ण होत नाही. संपूर्ण फेरी झालेल्या वर्षाला-जेव्हा सूर्य तंतोतंत त्याच नक्षत्रात परत येतो- Sidereal year म्हणतात. या दोन वर्षांमध्ये साधारण १८ मिनिटांचा फरक आहे. आपण Sidereal year वापरत नाही. तसं करायचं म्हटलं तर ऋतुचक्र दर वर्षी १८ मिनिटं मागे पडेल, आणि ते आपल्या सोयीचं नाही. कारण ऋतुंशी आपलं जीवन बांधलं गेलेलं आहे. पाऊस, पूर, शेती वगैरे सर्व गोष्टी Tropical yearशी निगडित आहेत.

आपल्यापेक्षा उत्तर युरोपीयनांना ऋतुचक्र फार अधिक महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, उत्तरायण. ते येईपर्यंत रात्री वीस-बावीस तासांच्या मोठ्या असतात. उत्तरायणात सूर्याचा, आणि त्याच्याबरोबर सर्व जीवसृष्टीचा, जणू पुनर्जन्म होतो. त्यामुळे पाचशे वर्षं युरोपमध्ये मित्रदेवाचं फार मोठं प्रस्थ होतं. त्यामुळे उत्तरायण हा दिवस मोठ्या धामधुमीनं साजरा होई. त्या दिवशी ख्रिस्ताचा जन्म होतो असं बायबलमध्ये जरी कुठेही म्हटलं नाही, तरी युरोपीय लोकांनी ख्रिस्ताचा संबंध मित्रदेवाशी लावला आणि त्याची जन्मतारीख २५ डिसेंबर ठरवली.

नक्षत्र आणि ज्योतिष यांचा संबंध बॅबिलोनियन लोकांनी सुरुवातीपासूनच-म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी-लावला. बॅबिलोनियन संस्कृती नष्ट झाली. पण त्यांचं ज्योतिष आजतायत शिल्लक आहे. राशीचक्राचं ग्रीकांनी zodiac असं नामांतर केलं. (zoo म्हणजे प्राणी आणि बरीचशी नक्षत्रं प्राण्यांसारखी दिसतात.) हिपार्कसनं त्याला आधुनिक रूप दिलं. मेष राशी तोपर्यंत पहिल्या जागी आली होती. मीन शेवटच्या. उत्तरायण चालू होईल त्या दिवशी (२१ डिसेंबर) सूर्य मकर राशीत जाई, दक्षिणायन (२१ जून) चालू झालं की कर्क राशीत जाई.

आता तर ग्रीकांच्या आणि २०२१ सालच्या राशीचक्रात जवळजवळ आणखी एका राशीचा फरक पडला आहे. उत्तरायण चालू होतं तेव्हा (२१ डिसेंबर) सूर्य धनू राशीत असतो, आणि महिन्याच्या अगदी शेवटी शेवटीच, साधारण १९ जानेवारीस, मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या सर्वाचा मथितार्थ म्हणजे उत्तरायण आणि मकरसंक्रातीचा संबंध केव्हाच संपलेला आहे. काही वर्षांनी उत्तरायण हे धनुसंक्रातीला येईल. सूर्याच्या राशीसंक्रमणाच्या हिपार्कसनं दिलेल्या ख्रिस्तपूर्व १३० मधल्या तारखा आणि नासानं दिलेल्या २०२१ मधल्या तारखा पुढे दिल्या आहेत.

                                          ख्रिस्तपूर्व १३० (हिपार्कस)                 इसवी सन २०२१ (नासा)

धनुसंक्रांती                            नोव्हेंबर  २३                                 डिसेंबर  १८

मकरसंक्रांती                         डिसेंबर  २२ (उत्तरायण)              जानेवारी  १९

कुंभसंक्रांती                           जानेवारी  २०                               फेब्रुवारी  १६

मीनसंक्रांती                           फेब्रुवारी  २०                                मार्च  १६

मेषसंक्रांती                            मार्च  २१ (संपातदिन)                   एप्रिल  १९

नक्षत्रंच जर अशी आपली जागा सोडून वागायला लागली तर बिचाऱ्या ज्योतिष्यांनी काय करायचं? त्यांनीही सोयीस्कर मार्ग काढला आहे. हिपार्कसच्या ख्रिस्तपूर्व १३०च्या राशी त्यांनी तशाच कायम ठेवल्या आहेत! इंग्लंड-अमेरिका किंवा आपली इंग्रजी वृत्तपत्रं आणि मासिकं यांच्यात ही काल्पनिक सौरराशींची पद्धत वापरतात. तुमचा जन्म २२ डिसेंबर ते १९ जानेवारीपर्यंत असेल तर तुमची सौररास मकर. त्या काळात सूर्य धनू राशीत असला म्हणून काय झालं? २१ मार्चला आकाशात काय असेल ते असो, ज्योतिषात सूर्य मेष राशीतच!

दुसरं म्हणजे राशींच्या सीमाही नक्की नाहीत. १९३० साली International Astronomical Union ने ठरवलेल्या सीमा अशा आहेत की त्यात काही राशींना जास्त जागा तर काहींना कमी असा प्रकार आहे. यासर्वांचा मतितार्थ असा की आता आकाशातील राशींचा आणि ज्योतिषातल्या राशींचा काडीमात्र संबंध राहिलेला नाही. ज्योतिषशास्त्र कल्पनाविलास आहे हे सिद्ध करायला आणखी वेगळा पुरावा तो काय पाहिजे? ते काही असलं तरी ज्योतिष्यांच्या धंद्यावर त्याचा काडीचा परिणाम नाही. गेल्या एका वर्षी नुसत्या अमेरिकेत त्यांचा ३ अब्ज डॉलरचा धंदा झाला.

बायबलमधल्या घटनांचा राशीचक्राद्वारा अर्थ लावणं हाही एक न थकणारा उद्योग आहे. ख्रिस्तपूर्व ६८ पासून वसंतसंपातदिनी तो मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करायला लागला. ज्योतिष शास्त्रज्ञांच्या मते तेव्हा मीन-युग सुरू झालं. हे युग म्हणजे शांतीचं, एकेश्वरी धर्माचं. (मीनच्या बरोबर विरुद्ध बाजूला आहे Virgo, म्हणजे Virgin Mary. मग तर आनंदी आनंद!) मीनला, म्हणजे माशाला, ग्रीकमध्ये शब्द आहे ‘यीख्थस’, आणि तो शब्द माशाच्या पोटात घातलेलं चिन्ह सुरुवातीचे ख्रिश्चन स्वत:जवळ बाळगायचे. ग्रीकमधील ‘येशू ख्रिस्त देव-पुत्र तारक’ या ग्रीकमधल्या Iesous Ҳristos Ɵeou Yios Ʃoter शब्दांतील आद्याक्षरं एकत्र लिहिली तर हाच शब्द तयार होतो! दैवी संकेत म्हणतात तो हाच!!

परंतु हे काही कायम टिकणार नाही. सूर्य हळूहळू मागे सरकतोय आणि आता काही वर्षांत मीन राशीची जागा कुंभ घेईल. वसंतसंपातात सूर्य कुंभ राशीत जाईल. आपले श्रद्धावान त्याकरताही तयार आहेत! बायबलमध्ये परत केव्हा येणार या येशूच्या शिष्याच्या प्रश्नाला त्याचं उत्तर आहे, “जेव्हा माणूस हातात पाण्याची घागर घेऊन येईल, तेव्हा.” And he said unto them, Behold, when ye are entered into the city, there shall a man meet you, bearing a pitcher of water; follow him into the house where he entereth in. शास्त्रकारांच्या मते याचा अर्थ, कुंभ-युग (The Age of Aquarius) सुरू होईल तेव्हा! अमेरिकेत १९६० सालापासूनच कुंभ-युग चालू झाल्याची बोंबाबोंब चालू झाली आहे.

ॲटलस आणि खगोल: शिल्प

शेवटी ज्या महात्म्यानं हे विद्येचं भांडार आपल्याला उघडून दिलं त्याच्यासाठी दोन शेवटचे शब्द. अॅटलस या ग्रीक देवतेनं पाठीवर उचलून घेतलेला पृथ्वीचा गोल नसून खगोल आहे. त्यावर तारे आणि नक्षत्रं आहेत. इ.स. १६५ साली बनवलेल्या आणि इटलीतील नेपल्स या शहरात जतन करून ठेवलेल्या या शिल्पातील नक्षत्रं हिपार्कसच्या नकाशावरून घेतली आहेत, हे आता सिद्ध झालं आहे. अवकाशात मानवानं केलेल्या प्रगतीस ज्यांनी योगदान केलं आहे त्यांचा गौरव करण्याकरता अमेरिकेतील न्यू मेक्सिको या राज्यात १९७६ साली International Space Hall of Fame उभारला. त्यात युरी गागारिन, नील आर्मस्ट्राँग यांसारख्या आधुनिक वीरांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये खगोलशास्त्राचा पाया घालणाऱ्या या हिपार्कसलाही मोठं मानाचं स्थान दिलं आहे.

डॉ. मोहन द्रविड

मोबाईल – ९८२०५-६३०३१

इमेल –  mohan.drawid@gmail.com

Dr. Drawid received his B.E. (Mech. Eng.) from VJTI in 1967, M.S. (Mech. Eng.) and Ph. D. in physics in the US.