मेधा आलकरी
दूरदर्शनवरील सुरुवातीच्या कार्यक्रमांपैकी लक्षात राहील असा कार्यक्रम होता तबस्सुमचा फूल खिले हैं गुलशन गुलशन! पूर्ण उमललेल्या फुलासारखा तिचा प्रसन्न चेहरा, मधाळ बोलणं आणि गोड हसणं अजून त्या दिवसांच्या आठवणी ताज्या करतं. बऱ्याच वर्षांचा काळ सरल्यानंतर हॉलंडमधील क्यूकेनहॉफ या ट्युलिप गार्डनला भेट दिली; नजर वळवावी तिथे वाऱ्यावर डोलणारी फुलं पाहिली; तेव्हा तबस्सुमचा चेहरा आठवला आणि मनात जिगर मुरादाबादी यांच्या त्या ओळी गुंजायला लागल्या- फूल खिले हैं गुलशन गुलशन !
३२ हेक्टरांचा प्रचंड मोठा परिसर, २७०० झाडं, स्वर्गीय रंगाची ४५ लाख ट्युलिपची रोपटी, त्याच्या सोबतीला वसंतात फुलणारी, वेगवेगळ्या आकारांची, रंग आणि गंध यांची उधळण करणारी असंख्य फुलं! खरंखुरं नंदनवन! गर्दी टाळून मनासारखे फोटो घेता यावेत म्हणून बाग उघडायच्या सुमारास आम्ही तिथे जाऊन पोहोचलो. प्रखर नसलेलं स्वच्छ कोवळं ऊन म्हणजे फोटोसाठी पर्वणी! त्यातही एखाद्या फुलाच्या मखमली पाकळीवर अलगद विसावलेला टपोरा दवबिंदू टिपता आला तर बहारच. एका उंचवट्यावर जाऊन बागेचा लेआऊट बघितला आणि हरखून गेले. कुठे चौकोनात, कुठे आयताकृतीत, कुठे वर्तुळात तर कुठे अर्धचंद्राकृतीत फुलांची रंगसंगती साधून छानसं डिझाईन केलं होतं. कधी एकरंगी फुलांचा गालिचा; तर कधी बहुतांचा लाडका लाल किंवा पिवळा ट्युलिप मध्यभागी ठेवून, त्याच्या भोवती गडद हिरव्या पानांच्या, शुभ्र पाकळ्यांच्या बारमाही फुलांची रेखलेली किनार आणि या फुलांना खेटून-बिलगून बसलेल्या जांभळ्या हायसिंथचा नक्षीदार परीघ! सरोवराकाठी लावलेली सोनेरी डॅफोडिल्सची फुलं आपल्या माना उंचावून सूर्यस्नान करत होती. त्यांचं सरोवरातील प्रतिबिंबही मोहक दिसत होतं. ओळीत लावलेल्या जुन्या वृक्षांच्या वाकलेल्या फांद्यांच्या कमानीचं प्रतिबिंब त्याच्याशी जणू खेळत होतं. फुलवेड्या व्यक्ती या निसर्गचित्राचा आस्वाद घेताच ‘फुल्ल’ वेड्या होऊन जातात! बागेतील नागमोडी रस्त्यांवरून रमतगमत चालताना डावी उजवीकडे सतत फुलांची सोबत असते.
या बागेतील फुलांचा बहर फक्त दोन महिन्यांचा, एप्रिल आणि मे. या दोन महिन्यांत जवळजवळ आठ लाख पर्यटक या बागेत आपली हजेरी लावून जातात. त्यांना आकर्षित करणारी ही बाग मनोहारी बनवण्यासाठी सत्तर लाख फुलांचे कंद हातानं रोवले जातात. बागेत खुल्या पुष्पप्रदर्शनाव्यतिरिक्त काही काचबंद खोल्या उत्तम प्रतीच्या नाजूक फुलांसाठी राखीव आहेत. या ‘स्टाईल गार्डन’ मधील रंगसंगतीही फारच मोहक होती. हस्तिदंती फुलांच्या पाकळ्यांत उंच देठाचा काळा ट्युलिप दिमाखानं उभा होता. गडद जांभळ्या रंगाचा हा ट्युलिप दुरून काळाच दिसतो. या ब्लॅक ट्युलिपचं हॉलंडवासियांना अतोनात कौतुक! पुढे एका खोलीत फिक्कट व गडद गुलाबी, जांभळ्या रंगांची हातमिळवणी आणि त्याच्या भोवती राखाडी पानांच्या नाहीतर गहिर्या लाल पानांच्या झुडपांचं कडं. विविध आकार आणि एकमेकांत मिसळणाऱ्या नैसर्गिक रंगछटा असलेल्या ऑर्किडच्या जड पाकळ्या तो नाजूक देठ तोलून कसा धरतो याचं आश्चर्य वाटत राहिलं. त्या खोलीत राजघराण्यातील स्त्रियांच्या हॅट्स प्रदर्शनार्थ ठेवल्या होत्या. एप्रिल महिना म्हणताना त्यावर ट्युलिपचा साज चढला होता.
एका जागी प्रथितयशांच्या नावाचं बिरुद लावून काही ट्युलिप्स दिमाखानं उभे होते. हॉलिवूडमधील ‘Walk of Fame’ च्या धर्तीवरील ही सेलेब्रिटीजची छोटेखानी बाग! ऐश्वर्या रायच्या नावाचा सुंदर ट्युलिप तिथे हसत आपल्या स्वागतासाठी उभा आहे. या बागेत काही श्रेष्ठ शिल्पकारांनी बनवलेले पुतळे आहेत आणि जमिनीवर रेखाटलेला एक महाकाय बुद्धिबळपट. इथे फुलांनी सजवलेला एक खास रस्ता आहे. त्याला म्हणतात ‘Bride’s lane.’ दरवर्षी, दरदिवशी या रोमँटिक रस्त्यावर कुणी ना कुणी प्रेमी आपल्या प्रियेला गुडघे टेकून लग्नाची रीतसर मागणी घालतो. नवरा-नवरी, करवला-करवली आणि फोटोग्राफर यांची फोटोसाठीची तारांबळ चालू असते. ‘जगातील सर्वाधिक फोटो घेतले जाणारं स्थळ’ असा बहुमान या क्यूकेनहॉफ बागेला मिळाला आहे.
हॉलंडची आन-बान-शान असलेला ट्युलिप, हे हॉलंडचं राष्ट्रीय पुष्प ! सतराव्या शतकात मात्र ते राष्ट्रीय फूल चक्क राष्ट्रीय खूळ झालं होतं. मध्यमवर्गासाठी तर ते झटपट संपत्ती मिळवून देणारं जादूचं भांडं ठरलं होतं. महिन्याला चांगले पंचवीस तीस हजार युरो कमावता येत होते. या वेडापायी काही महाभागांनी आपली घरंदारं, दागदागिने विकले. वडिलोपार्जित संपत्ती, खानदानी व्यवसाय पणाला लावले आणि या ट्युलिपकंदाच्या खरेदी विक्रीचं सत्र सुरू झालं. या वेडाच्या भिरभिऱ्याला ‘ट्युलिप मॅनिया’ किंवा ‘विंदांडेल’ (वाऱ्याचा व्यापार) असं संबोधलं जातं. कारण शेवटी १६३७ मध्ये मार्केट पडलं आणि अशी परिस्थिती आली, की डोक्यावर ना छप्पर ना घर, पण बागेत लावण्यासाठी अप्रतिम नमुन्याच्या हजारो ट्युलिप कंदांची रास पडली आहे. आजही हॉलंडमध्ये हास्यास्पद वाटावी अशी आर्थिक देवाणघेवाण झाली की त्याला ट्युलिप मॅनिया म्हटलं जातं.
अशा या प्राणप्रिय ट्युलिपची जन्मभूमी हॉलंड नाही बरं का! तो आलाय तुर्कीच्या उस्मान सुलतानाच्या बगिच्यातून. १५९४ साली लेडन विश्वविद्यालयाच्या प्रांगणात ट्युलिप फुलला आणि हॉलंडवासियांच्या हृदयात ध्रुवपद मिळवून त्यानं स्वतःचं राष्ट्रीयत्वच बदलून घेतलं. तो कायमचा हॉलंडचा झाला. राजाला तर त्यानं वेडच लावलं. मग काय? राजाच्या खुशामतीसाठी उत्तमोत्तम जातीचे ट्युलिप लावण्याची चढाओढ जनतेत सुरू झाली. ट्युलिपच्या किमती आसमंतास भिडल्या. एखादा ‘या सम हाच’ ट्युलिप चक्क घराच्या किमतीपेक्षा महागला. उच्चभ्रू लोकांचं हे वेड हळूहळू जनसामान्यांमध्ये उतरून त्याचं राष्ट्रीय खूळ झालं. ट्युलिपचा शब्दशः अर्थ आहे फेटा. आवळलेल्या फेट्यासारखा दिसतो खरा तो!
या अतिशय प्रसन्न अशा बागेत फिरताना मनात रुंजी घालत होती ती सिलसिला चित्रपटात पाहिलेली ट्युलिपची शेतं. ‘दूर तक निगाहमे हैं गुल खिले हुए’. विमानातून दिसलेलं, जणू क्रेयॉनच्या रंगात रंगवलेलं चित्र या बागेत कुठे दिसेना. कारण इथे तर फुलांचे छोटे छोटे वाफे होते. डोळ्याचं पारणं फेडण्याकरता मग आम्ही जवळच असलेल्या सासेनहाइम या गावी जायचं ठरवलं. खूप तंगडतोड केल्यानंतर पहिलं ट्युलिपचं शेत नजरेस पडलं तेव्हा अवाक् झालो. वर निळं, निरभ्र आकाश आणि खाली लाल ट्युलिप कुसुमांचा सळसळता गालिचा. त्या ओळींमध्ये फिरायला परवानगी मिळण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. तरीही धीटपणे पुढे जाऊन त्या सुरकुतल्या, गुलाबी चेहऱ्याच्या मालकाला आर्जवानं विचारलं. एक मिनिटभर थांबून त्यानं हसून आम्हाला ‘आत या’ अशी खूण केली आणि मग ‘थोडीशी काळजी घ्या’ असं ओरडून सांगितलं. होकारार्थी मान थोडी जास्तच वेगानं वरखाली करत, त्याचं मन बदलायच्या आत आम्ही त्या शेतात शिरलो. मनसोक्त फिरून ट्युलिपचं अगदी जवळून दर्शन घेतलं, त्याला हळुवार स्पर्श केला, हितगुज केलं, फोटो काढले. मालकानं बहुधा आमच्या भारतीयत्वाकडे बघून आमच्यावर मेहेरनजर केली असावी. नंतरच्या गप्पातून असं कळलं की, माणसांच्या गर्दीमुळे फुलांची नासधूस होण्यापेक्षा जास्त धोका त्यांच्या बुटांच्या मातीबरोबर येणाऱ्या काही जंतूंचा असतो. हा जंतुसंसर्ग ट्युलिपचा पूर्ण बहर बरबाद करू शकतो. पुढील एका शेतात प्रत्येक रंगाच्या ट्युलिपची एक पट्टी होती. लाडका लाल आणि पिवळा तर होताच, शिवाय संगमरवरी, केशरी, गुलाबी, जांभळा आणि शुभ्र पांढराही होता. या शेतकऱ्यानं आम्हाला ट्युलिप बागायतीची अधिक माहिती पुरवली.
यामध्ये दोन प्रकार असतात. एकात फुलांचा बहर लिलावात विकला जातो तर दुसऱ्या प्रकारात फक्त ट्युलिपच्या कंदांचा व्यवहार होतो. कंदांचा व्यापार करणारे बागायतदार फुलं पूर्ण उमलली की त्याचं त्वरित शिरकाण करतात. त्यायोगे फुलाची प्रजननाची पूर्ण शक्ती त्याच्या कंदात सामावते. वंशवृद्धीसाठी अशा रीतीनं तयार केलेल्या कंदांचं मोल अधिक. एप्रिलमध्ये कापलेल्या या रोपट्यांचे कंद साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खणून जगभर निर्यात केले जातात. ॲमस्टरडॅम एअरपोर्टवर उतरल्यावर एका प्रवासी पुस्तकात पाहिलेला फोटो आठवला. फुलांच्या राशीवर गुलाबी, गोबऱ्या गालांची मुलं अक्षरशः लोळत होती. इथे फुलाला किंमत नाही; तर कंद महत्त्वाचा! ही सुंदर फुलं फुलवण्यासाठी पृथ्वीमातेला आपली सारी पौष्टिक तत्त्वं खर्च करावी लागतात. त्यामुळे दर चारपाच वर्षांनी जमिनीचा कस वाढवणारं एखादं पीक शेतकऱ्यांना घ्यावं लागतं. हॉलंडमधील माती आणि हवामान दोन्ही गोष्टी ट्युलिपसाठी खूपच पोषक आहेत. थोडीशी रेताड जमीन पाणी साठू देत नाही आणि हलका थंड वसंतऋतू फुलांना उमलायला मदत करतो. मात्र ही निसर्गदेवता भारीच लहरी. हिवाळा लांबला तर कळ्या फुलणार नाहीत. एप्रिलच्या शेवटच्या पंधरा दिवसांत मात्र रंगांचा हा पुष्पसागर कधीच आटलेला दिसणार नाही.
आपल्या भारतातील काश्मीरमध्ये सुद्धा ट्युलिप्सची जादू पाहायला मिळते आणि उत्तराखंडातील मुन्सीयारी या जागी तर जगातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन उभारत आहेत.
पुस्तके मिळविण्यासाठी संपर्क
इमेल – granthali01@gmail.com
फोन – 022 – 24306050
मेधा आलकरी
इमेल – travelkarimedha@gmail.com
मोबाईल – ९८२००९५७९५
युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/channel/UCBt-dofKUO26YwRGAfMyePw