साहित्यरंग

साहित्य ‘व्यवहार’

किरण भिडे

मी शाळेत असतानाची गोष्ट. अभ्यासात मला चांगली गती होती आणि आपण कायम यत्तेत पहिलेच आले पाहिजे हा हट्ट होता. गणित, विज्ञान, समाजशास्त्र हे विषय तेव्हाच्या भाषेत स्कोअरिंग होते. गोंधळ व्हायचा तीन भाषांमध्ये. त्यातही इंग्रजी अधिक अभ्यास केला तर मार्क देऊन जायची. हिंदी आणि मराठी हे विषय मात्र एकदम हात आखडता घ्यायचे. हिंदीऐवजी संस्कृतचा पर्याय मिळताच माझ्यासारख्यांनी राष्ट्रभाषेचा हात सोडून पुराणभाषेचा धरला. परंतु मातृभाषा काही प्रसन्न होत नव्हती. तिच्यामुळे पहिला नंबर हुकायचा. मग जरा संशोधन केल्यावर असं लक्षात आलं की मराठी भाषेचा पेपर लिहायचा एक पॅटर्न होता. नुसती उत्तरं महत्त्वाची नाहीत. त्यांचे प्रेझेन्टेशन महत्त्वाचे. म्हणजे दोन्ही बाजूंना समास सोडायचा (की उत्तराची लांबी अधिक भासते!) , प्रत्येक उत्तरानंतर एक ओळ आखायची. उत्तरात वापरलेल्या म्हणी, वाक्प्रचारांच्या खाली ओळ मारून ते ठळक दिसेल याची योजना करायची. झालं! युक्त्या अमलात आणल्या आणि दहावीत शाळेत पहिला आलो, मराठी विषयातपण शाळेत सर्वाधिक गुण मिळाले. व्यवहारातील महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला की तुमचा विषय कितीही चांगला असू दे, त्याचे प्रेझेंटेशनसुद्धा चांगलेच हवे. तेच अधिक गुण मिळवून देते. भाषा आणि व्यवहाराची अशी सांगड घालता आली ती पहिल्यांदा शाळेत.

दहावीची परीक्षा झाल्यावर निकाल लागेपर्यंतच्या काळात मी टाइमपास म्हणून एका वाचनालयात जाऊन बसायचो. सकाळी १०-१ आणि संध्याकाळी ५-८ अशी नोकरीच होती म्हणा ना… पण बालकामगार कायद्यात अडकायला नको म्हणून म्हणायचं टाइमपास. सभासदांनी आणलेली पुस्तके जमा करायची, नेलेल्या पुस्तकांची नोंद करायची आणि अधेमध्ये मिळालेल्या वेळात वाटेल ते पुस्तक/अंक घेऊन वाचायचे. पंधराव्या वर्षी illustrated weekly, debonair यांसारख्या अंकांची ओळख तिथे झाली. अनेक सभासदांशी छान ओळखी झाल्या आणि शिवाय महिनाभरानंतर मालकिणीने १०० रुपयेपण दिले! काय भारी वाटलं होतं सांगू ते पैसे हातात आले तेव्हा… माझा हा साहित्य’व्यवहार’ चांगलाच फायदेशीर ठरला होता.

मग मी इंजिनीयरिंग आणि व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेऊन उद्योगधंद्यात स्थिरावलो. आरोग्य, हॉटेलिंग अशा क्षेत्रातून फिरत आता बहुविध डॉट कॉमच्या माध्यमातून सध्या साहित्यक्षेत्र आजमावतो आहे. पुनःश्च डिजिटल नियतकालिकासाठी लेख जमवताना दीडशे वर्षे जुने साहित्य चाळतो आहे. व्यवसायाची पार्श्वभूमी असल्याने काही करताना त्यात ‘व्यवहार’ बघण्याची सवय लागली आहे. व्यवहार या शब्दावरून आठवले, आपल्याकडे बाजार आणि धंदा या शब्दांना एक नकारात्मक छटा आहे. कशाचाही ‘बाजार’ म्हटले की आपण साशंक होतो. परंतु तेच ‘व्यवहार’ म्हटले तर कसे मध्यममार्गी वाटते. दोन्हीकडे खरे तर ‘जग हे दिल्या-घेतल्याचे’च आहे, पण ‘बाजार’ला पैशांचा वास येतो तर ‘व्यवहार’ला एकमेकांच्या समजुतीची साथ मिळते. कशाचाही ‘बाजार मांडलाय’ ही कोणाची व्यथा तर कोणाच्या रागाचा मुद्दा असू शकतो, पण ‘व्यवहाराशिवाय गत्यंतर नाही’ ही तडजोड सगळ्यांनाच मान्य असते. व्यवहार दोन्ही बाजूंचा ‘विन-विन’ विचार करतो. दोन्ही बाजू समृद्ध करतो.

मी बहुविध डॉट कॉमच्या निमित्ताने मराठी साहित्यव्यवहारात आलो आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने मला आकलन झालेल्या काही गोष्टींचा शोध घेण्याचा आणि त्या वाचकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मराठी छापील पुस्तके, नियतकालिके यांना दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. लाखो पुस्तके, हजारोंनी नियतकालिके आणि तेवढेच लेखक/लेखिका यांनी हा साहित्यव्यवहार व्यापलेला आहे. देशकालाची बदलती स्थिती, तंत्रज्ञान आणि समाज, व्यक्ती यांचा खूप मोठा प्रभाव या साहित्यव्यवहारांवर राहिलेला आहे. त्यात येणाऱ्या काळाची आव्हाने तर फार मोठी आहेत. पण भविष्यातील साहित्यव्यवहारसंबंधी समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी या व्यवहारांचा वर्तमान असा का आहे, आणि भूत असा का होता, हे समजून घेणे आवश्यक असणार आहे. तसेच, जगभरात, भारतात आणि महाराष्ट्रात या समस्यांची उत्तरे शोधण्याचा सद्यकालात होत असणारा प्रयत्नसुद्धा समजून घेणे आवश्यक असणार आहे. येणाऱ्या काही लेखांमध्ये आपण तेच करणार आहोत.

साहित्यव्यवहार म्हटले की त्यात काय काय येईल? लेखक, प्रकाशक, मुद्रक, ग्रंथविक्रेते, ग्रंथालये, समीक्षक, आर्टिस्ट, प्रूफ रीडर, भाषाशिक्षक आणि सगळ्यात महत्त्वाचा – ज्याच्याविना हे सगळे अधुरे आहे, तो म्हणजे वाचक, एवढे सगळे घटक यात सामील आहेत. बाहेरच्या मोठ्या जगात हे एक छोटे जग सामावलेलेआहे. या छोट्या जगातील लोकांचे आपापसात जसे व्यवहार चालतात तसेच व्यवहार बाहेरच्या जगाशीही सुरू असतात. बाहेरच्या जगात काही झाले तर त्याचे पडसाद या छोट्या जगात उमटणे स्वाभाविक आहे. किंबहुना काही वेळा तर हे बाहेरचे जगच या छोट्या जगाला नियंत्रित करत असते. उदाहरण घ्यायचे झाले तर बाहेरच्या जगात युद्ध झाले, काही मोठा उत्पात झाला (जसा सध्या कोरोनाकहर सुरू आहे) तर त्याच्या साहित्यव्यवहारावर मर्यादित काळाकरता का होईना परिणाम होणारच. बाहेरच्या जगातील लोकांचे व्यवहार बदलले, आवडीनिवडी बदलल्या तर होणारे परिणाम मोठ्या स्वरूपात असतात. उदाहरणार्थ, मराठी समाजाचे इंग्रजी भाषेच्या प्रती वाढते प्रेम. मात्र काही गोष्टी बाहेरच्या जगात अशा घडतात की त्याने हे साहित्यजग पुरते हादरून जाते. जसे तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान आता साहित्यजगाला बऱ्याच गोष्टींचा मुळातून विचार करायला लावत आहे आणि तो केला नाही तर लवकरच आपण ‘out of context’ होऊन जाऊ अशी साधार भीती घालत आहे.

आपण पुढील काही लेखांमधून या आणि अशा आणखी काही बाबींचा साहित्यव्यवहारांवर होणारा परिणाम अभ्यासणार आहोत. आधी उल्लेख केलेल्या सर्व घटकांचा विचार यात केला जाईल. आपल्यापुरता आपण हा विषय मराठी भाषा आणि महाराष्ट्र या संदर्भात बघणार असलो, तरीदेखील तुलनेने इतर भारतीय भाषा आणि जागतिक भाषा यांचे संदर्भ तपासून बघणे क्रमप्राप्त आहे. आपण तो प्रयत्न नक्कीच करू. या सगळ्यात जाणते वाचक म्हणून तुम्हा सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे. मी काही या विषयातील तज्ज्ञ नाही, माझा तसा अजिबात दावा नाही. या विषयाचा मी एक उत्सुक अभ्यासक आहे. काही मुद्दे माझ्या विवेचनात सुटू शकतात. आपण सगळे मिळून या विषयाचा सर्व बाजूंनी धांडोळा घेऊया.

इमेल – contact@bahuvidh.com