साहित्यरंग

अगम्य नाझका रेषा

मेधा आलकरी

दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाची राजधानी लिमापासून दक्षिणपूर्व दिशेला, साधारण २०० मैलावर असलेल्या वाळवंटीय प्रदेशात प्राचीन नाझका संस्कृती वसत असे. नाझका ही एक संस्कृती असली तरी आज ‘नाझका’ ह्या संज्ञेला आपसूकच ‘रेषा’ हे शेपूट जोडलं जातं. काय आहेत ह्या रेषा? वाळवंटात मैलोनमैल पसरलेल्या, एकमेकांना छेदणाऱ्या,पार क्षितिजाला भिडणाऱ्या या रेषा.  त्यातून तयार झालेले त्रिकोण, आयात, समभुज चौकोन या भौमितिक आकृत्या, आणि सर्वात अचंबित करणारी पक्षी, प्राणी आणि वनस्पती यांची महाकाय चित्रं. ह्या रेषा गेली ८०-८५ वर्ष पेरूमध्ये येणाऱ्या पर्यटकांना व पुरातत्वतज्ज्ञांना सारखीच भूल पाडत आहेत. ह्या रेषांभोवतीचं अनाकलनीयतेचं वलय मात्र अजून ही गडदचं राहिलं आहे. कितीही समाधानकारक उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्यावरील प्रश्नचिन्हाचं सावट काही हटायला तयार नाही.

त्रिकोण

लिमाहून भल्या पहाटे म्हणजे ४ वाजता निघण्यासाठी अलेक्स, आमचा नाझका लाईन्स टूर गाईड हजर झाला. ४ तासांचा प्रवास करून आम्हाला उन्ह चढायच्या आधी नाझकाला पोहोचायचं होतं. शक्य होईल तेवढ्या लवकरच्या  विमानात जागा मिळवायची होती. सकाळच्या वेळी विमानाला धक्के कमी बसतात आणि वातावरण स्वच्छ असल्यामुळे खालच्या आकृत्या स्पष्ट दिसतात

आमच्या ज्ञानाची पाटी तशी कोरीच होती. अलेक्सने मग त्या रेषांइतकीच सुंदर अक्षरं त्यावर कोरायला सुरवात केली. “तुम्हाला नक्की काय बघायचंय ह्याची आधी कल्पना देतो” असं म्हणत त्याने रेषांचा इतिहास उलगडायला सुरवात केली.  ८०० रेषा, काही ३० मैलांपर्यंत पसरलेल्या, ३०० भूमितीतल्या आकृत्या, ७० प्राणी -पक्षी आणि वनस्पतींच्या महाकाय आकृत्या. त्यातील काहींची जमिनीवरची लांबी ५० ते १२०० फूट ह्या घरात मोडणारी. जमिनीवर त्या आकृतीशेजारी उभं राहिलं तर असं काही भन्नाट आपल्या समोर आहे ह्याची सुतराम कल्पनाही येणार नाही. जेव्हा विमानांचा शोध लागला आणि पेरूमध्ये प्रवासी विमानसेवा सुरु झाली तेव्हा एका वैमानिकाला वाळवंटाच्या कॅनव्हासवर रेखाटलेलं हे भूमिचित्र दिसलं. ते साल होतं १९३०. “कोणी आखल्या ह्या रेषा? आणि प्रयोजन काय त्याचं ? बरं इतक्या प्रचंड मोठ्या आकृत्या आकाशातून कशा दिसतील ह्याचा अचूक अंदाज आला कसा त्यांना?” माझी प्रश्नांची सरबत्ती बहुदा FAQ ह्या सदरात मोडत असावी. अलेक्सकडे त्याची उत्तरं तयार होती. तसा त्याचा अभ्यास ही होता भरपूर. त्याने आमच्या समोर त्याच्याजवळचे नकाशे पसरले, आकाशातून काढलेले प्राण्याच्या आकृत्यांचे फोटो ठेवले.  त्या विस्तृत आकृत्यांमध्ये होता ५९० फूट लांबीचा सरडा. माकड व त्याची गोल गोल गुंडाळी असलेली शेपटी ही आकृती होती १८० फूट लांब. त्यांचा पवित्र कोंडोर पक्षी ४४६ फूट लांबीचा; तर १५० फूट लांबीचा कोळी दिसत होता. १६४ फुटांचा हमिंग बर्ड, १६४ फुटाचा कुत्रा आणि एका टेकडीच्या उतारावर कोरलेला, १०५ फूट उंचीचा, वाटोळ्या डोळ्यांचा आणि गोल डोक्याचा अंतराळवीर होता. माणसाचे हात किंवा पक्ष्याचे पाय दिसावेत  अशी एक आकृती होती. एकाला चार तर एकाला पाच बोटे.  ते फोटो आवरत अलेक्स म्हणाला, “ह्या जैविक आकृत्यांइतक्याच महत्वाच्या आहेत रेषा, त्यांनी तयार झालेले भूमितीतले त्रिकोण,आयात, समभुज चौकोन. तेही निरखून पहा. हे सारं एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं की मी काय सांगतोय याचा तुम्हाला उलगडा होईल. विमानप्रवास आटोपला की मी तुम्हाला सुरक्षित अंतरावरून रेषा पाहण्यासाठी सरकारने बनवलेल्या मचाणावर आणि एका नैसर्गिक टेकडीवर घेऊन जाईन. ह्या रेषा खोदल्या कशा ह्याचं उत्तर तिथे गेल्यावर स्पष्ट होईल.”

अंतराळवीर

या अगम्य नाझका रेषांबद्दल बरेच तर्क वितर्क आहेत. काहींच्या मते ते जमिनीवर उघडून ठेवलेलं एक खगोलशास्त्रीय पुस्तक आहे; शेतीविषयक वेळापत्रक आहे; तर रेषांचं खगोलशास्त्रीय महत्व न पटणारे म्हणत पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या या वाळवंटात ( वर्षाला फक्त एक इंच, म्हणजे वीस मिनिटं. आम्ही मुंबईकर चाट) जीवनावश्यक पाणी सर्वात महत्वाचं असल्यामुळे या रेषा देवाची करूणा भाकण्यासाठी निश्चित जागेकडे निर्देश करणाऱ्या असाव्यात.  पण मग त्या आकृत्या कशाकरता? पुरातन काळी कोळी हे पावसाचं चिन्ह असे. हमिंग बर्डचा संबंध सुपीकतेशी होता आणि माकडं असतात मुबलक पाणी असलेल्या ऍमेझॉन जंगलात. म्हणजे ही पाण्याशी संबंध असलेली दैवतच असावीत. अलेक्स जे जे निष्कर्ष सांगे ते सारेच आम्हाला सुसंगत वाटत. तरीही प्रश्न असा पडतो की आकाशातूनच दृष्टीस पडणाऱ्या या  भल्या मोठ्या आकृत्या कोणी का काढेल?  याचा अर्थ त्याचा संकेत  जमिनीवर राहणाऱ्या माणसांकरता नाहीच मुळी. त्या आहेत स्वर्गात वसणाऱ्या देवांकरता. त्यांना प्रसन्न करण्यासाठी. लाव्हाचा उद्रेक,भूकंपाचे हादरे, वडवानलाचं तांडव, नाही तर अनावर्षणामुळे वर्षोनुवर्षे पडणारा भीषण दुष्काळ, ह्या साऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी आकाशातल्या  देवाची करुणा भाकणारे धार्मिक वृत्तीचे नाझकावासी पर्वत देवाची पूजाही करत असत. आजही पेरूमध्ये  गिरिराजांचं पूजन करण्याची प्रथा चालू आहे. त्यांचा “इंद्रदेव” पाऊस पाडत नसेल तर ह्या गिरिराजाच्या कृपेनं, त्याच्या पोटातल्या पाण्याने आपली तहान भागावी म्हणून ही आराधना. 

“इतक्या लांबलचक रेषा कोरल्या म्हणजे नक्की केलं काय ? कुदळ फावडी घेऊन खोदल्या? आणि हजारो वर्षं टिकल्या कशा काय त्या?” अस्मादिकांच्या प्रश्नाने अलेक्स सरसावला. नकाशे खाली ठेऊन, गाडीच्या सीटवरच त्याने रेषा ‘खोदायला’ सुरवात केली. वाळवंटातील पिंगट रेताड रंगाचे गोटे प्राणवायूशी संयोग होऊन आणि उन्हात रापून लालसर होतात. पृष्ठभागावरील त्या दगडांना बाजूस सारून मातीच्या खापराने वीसएक सेंटिमीटर  खोदलं जातं. क्षितिजाला टेकणाऱ्या या रेषांची रुंदी १३५ फुटापर्यंत असते. रेषांच्या दोन्ही बाजूस, खोदलेल्या रेतीचा ढिगारा लावून ठेवतात. आतली फिक्कट रंगाची कर्पूरशिलाजीत धातूची (gypsum) मात्रा असलेली रेती अनाच्छादित झाल्यामुळे उघडी पडते. परस्परविरोधी रंगामुळे ती छान उठून दिसते. नाझका प्रदेशातील अगदी अत्यल्प पाऊस आणि क्षीण वारा यामुळे नगण्य झीज होऊन ५००-२००० वर्षांपूर्वी खापराने खणलेल्या या रेषा पुसल्या न जाता अबाधित राहिल्या. टेकडीवर गेल्यावर ते अधिक स्पष्ट होईल.”

हमिंग बर्ड

आता कधी एकदा विमानात बसून ते भूमिचित्र न्याहाळतोय असं होऊन गेलं आम्हाला. अलेक्सच्या चोख व्यवस्थेमुळे विमानतळावर पोहोचताच ९-९.३० च्या दरम्यानचं विमानफेरीचं तिकीट आम्हाला मिळालं. ८ जण बसू शकतील असं ते सेसना विमान. प्रत्येकाला खिडकीची जागा..आमचा ३० मिनिटांचा विमानप्रवास सुरु झाला. खाली रेताड रंगाचं वाळवंट दिसत होतं. वैमानिकाचं समालोचन सुरु झालं . त्याने सांगितल्याप्रमाणे साधारण दहा मिनिटात आकृत्या असलेल्या पृष्ठभागाच्या वरून आमचं विमान उडू लागलं. आता वाळवंटाने आपलं रूप पालटायला सुरवात केली. किरमिजी रंगांच्या त्या दगडगोट्यांमधून पांढऱ्या लांबलचक रेषा स्पष्ट दिसू लागल्या. लांबच लांब, नजरेच्या सीमेपलीकडे जाणाऱ्या. वैमानिकाने दाखवल्यावर त्रिकोण, आयात आणि समभुज चौकोन ही ओळखता यायला लागले. जसजसं विमान गिरकी घेऊन दिशा बदले तसतसं कॅलिडोस्कोप सारखं नवीन चित्र दिसू लागे. वैमानिकाने सांगितलं, “आता मी प्रमुख अशा १२  जैविक आकृत्यांच्या वरून विमान नेणार आहे. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे असं फिरवून आकृत्या विमानाच्या पंख्याखाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येकाला आकृती पाहण्याचा आनंद मिळणार आहे.” आम्ही सरसावून बसलो. पहिली आकृती दिसली. अगदी स्पष्ट. तोंड उघडलेला देवमासा. विमान पुढे सरकू लागलं. निरभ्र आकाश, स्वछ सूर्यप्रकाश आणि धुकं विरहित हवा,  यामुळे आम्हाला प्रत्येक आकृती स्पष्टपणे दिसत होती. हमिंग बर्ड ची लांब चोच, माकडाची गुंडाळलेली शेपटी, कोंडोरचा प्रचंड पंखाविस्तार, मुंगीसारख्या दिसणाऱ्या कोळ्याचे आठ पाय, झाड, एका हाताला असलेली पाच आणि दुसऱ्या हाताला असलेली ४ बोटं आणि पुसट असूनही आम्हाला स्पष्ट दिसलेला घुबडाच्या डोळ्यांचा अंतराळवीर. वैमानिकाने बरोबर तिसाव्या मिनिटाला आम्हाला परत आणून सोडलं. 

कोळी

आमचे प्रसन्न आनंदित चेहेरे पाहून अलेक्सही खुश झाला. आम्ही लगबगीने गाडीत बसलो. पॅन अमेरीका नावाच्या हमरस्त्यावरून गाडी पळायला लागली. सरड्याच्या लांब शेपटीला दुभंगून गेलेला हा रस्ता आम्हाला वैमानिकाने दाखवला होता. मचाणावर जाऊन परत एकदा तिथून दिसणाऱ्या तीन आकृत्या पहिल्या आणि अलेक्सबरोबर ती नैसर्गिक टेकडी चढू लागलो. रेषा अगदी डोळ्यासमोर होत्या. हजारो वर्षं जुन्या असूनही काल  खोदल्या असाव्यात इतक्या ताज्या. रेषांच्या जवळपास जाण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. पण ह्या छोट्या टेकडीवरून त्या खूप जवळ दिसत होत्या. लहानपणी चौपाटीवरच्या वाळूत हाताने किंवा प्लॅस्टिकच्या फावड्याने किल्ल्याच्या वाटा खोदायचो तशा खापरानं वाळवंटात खोदलेल्या ह्या रेषा. 

१५००-२००० वर्षांपूर्वीची ही संस्कृती काळाच्या ओघात कधीच नाहीशी झाली असती. पण हे रेषांचं कोडं आजही आपला गूढार्थ लपवून, वैज्ञानिकांना, पुरातत्ववेत्त्यांना अचंबित करतंय, नवनवीन अटकळी बांधण्यास, वेगवेगळे अनुमान काढण्यास प्रवृत्त करतंय.

मेधा आलकरी

ई-मेल – travelkarimedha@gmail.com 

भ्रमणध्वनी -९८२००९५७९५

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/channel/UCBt-dofKUO26YwRGAfMyePw

( रेषांची आणि आकृत्यांची कल्पना यावी म्हणून आम्ही विमानातून काढलेला व्हिडिओ पोस्ट करत आहे. )

( लेखिकेचे travelkari medha नावाचे युट्युब चॅनल आहे आणि आत्तापर्यंत प्रवासाचे भन्नाट अनुभव सांगणारे ५२ भाग प्रसारित झाले आहेत. त्याच नावाचं फेसबुक पेजही आहे. दोन्ही संकेतस्थळांना जरूर भेट द्या. )