साहित्यरंग

समुद्रज्वाला

मेधा आलकरी

समुद्रकिनाऱ्याची माझ्या मनात ठसलेली अनेक दृश्य आहेत. भरतीला उचंबळून येणाऱ्या आणि खडकांना धडक देणाऱ्या फेसाळत्या लाटांचं रूप मनाला भावणारं! लाट ओसरून गेल्यावर पाण्याने निथळत उभा असलेला तो खडक म्हणजे मला स्थितप्रज्ञाचा अवतार वाटतो. वाऱ्याचा अविरत मारा सहन करत, लाटांचे जोरदार थपडा  अंगावर झेलत तो शांत उभा असतो. समजा एखाद्या दिवशी मनाचं संतुलन ढळून, बेभान होऊन त्याने पलटवार करायचा ठरवलं तर? रागाने लालेलाल होऊन त्याने समुद्रावर आग ओकायला सुरवात केली तर? हवाई बेटसमूहातील बिग आयलंड या बेटावर गेलो असता हे दृश्य मी याची देही याची डोळा पाहिलं. त्या खडकाळ टेकडीची सहनशक्ती संपली होती. तिचे खडक त्या अक्राळविक्राळ लाटांशी लढायला सिद्ध झाले होते. आपल्या अनेक मुखांतून ते लाव्हारूपी आग ओकू लागले होते. 

बिग आयलंडवरील किलुआ ज्वालामुखी १९८३ पासून जागृत आहे. २०१३ मध्ये त्याचा मोठा उद्रेक झाला. जवळजवळ पाचशे एकर नवी जमीन त्याने जन्माला घातली. त्यानंतर तीन वर्षं काहीच हालचाल नाही. निद्रिस्त! बहुधा पृथ्वीच्या पोटातून वर येऊन हा लाव्हा दबा धरून बसला होता. समुद्रावर चाल करण्यासाठी नवी वाट शोधत होता. जुन्या लाव्हा खडकांच्या उदरात तयार झालेल्या भुयारी नळ्यांमधून दबक्या पावलांनी वाटचाल करत होता. या कानाची त्या कानाला खबर नव्हती. अचानक त्या डोंगराचा एक कडा दुभंगून समुद्रात कोसळला आणि प्रचंड वेगाने तो लाव्हारस जवळ जवळ सत्तर फूट उंचीवरून समुद्रात पडायला लागला. जणू आगीच्या बंबातील रबरी नळीतून येणारा पाण्याचा फवारा! 

तो दिवसही खास होता. ३१ डिसेंबर २०१६. सगळं जग नववर्षाच्या स्वागताला सज्ज होत होतं. जल्लोष चालू होता; परंतु निसर्गाने वेगळीच आतषबाजी करायचं ठरवलं होतं. दोन महिने हा लाव्हाचा ओघ अविरत चालू होता. ही संततधार कमी होण्याची काहीच लक्षणं दिसेनात. या किलुआ ज्वालामुखीला खरं तर मेडल द्यायला हवं, त्याच्या दुर्दम्य उर्जेला दाद द्यायला हवी. वयाची तिशी उलटून गेली तरी खदखदतोय पठ्ठया ! त्याचं रक्त अधूनमधून खवळतं आणि डोंगरांच्या भेगांमधून स्त्रवत राहतं. सहसा आपल्याला ठाऊक असतं ते ज्वालामुखीचं रौद्र रूप, जिभल्या चाटत मार्गात येईल त्याला गिळंकृत करणारं राक्षसी रूप ! परंतु तो गडद केशरी रंगाचा लाव्हा, कभिन्न काळ्या सच्छिद्र खडकांमधून पाझरत समुद्रात सामावतो ते दृश्य अतिशय विलोभनीय असतं. एका स्पीड बोटीत बसून अवघ्या पन्नास फुटांवरून हा नेत्रदीपक अनुपम निसर्ग सोहोळा आम्ही पाहिला. अगदी निर्निमिष नेत्रांनी पाहिला.

उगवत्या सूर्याच्या लालीशी स्पर्धा करणाऱ्या लाव्हाचं दर्शन सूर्यनारायणाच्या साक्षीने घ्यावं म्हणून भल्या पहाटे, खवळलेल्या समुद्राचे तडाखे खात, वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या बोटीत आम्ही बसलो. रेलिंगला घट्ट धरून बसावं लागत होतं नाहीतर घरंगळलो असतो एखाद्या गोटीसारखे, बोटीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. बोट हाकण्यात निष्णात आणि लाव्हाच्या ओघाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या कॅप्टनच्या बोटीत आपण सुरक्षित असतो. अर्धा तास ही रोमहर्षक सफर अनुभवली. झुंजुमुंजूची वेळ होती. सूर्योदय अजून व्हायचाच होता. बोटीत असताना दुरूनच गंतव्यस्थळापाशी पांढऱ्या वाफेचा लोट दिसू लागला. बोट अजून जवळ आली आणि खडकावरची ती गडद केशरी रेघ उठून दिसली. त्या वाफेच्या फुलोऱ्यात वीज चमकल्याचा भास झाला. छे ! वीज कसली ? हे तर आगीचे लोळ! नव्हे, हाच तो लाव्हारस ! आता वाफेचा पडदा बाजूला सरला. पाहतो तर काय? समुद्रकाठच्या खडकाळ टेकडीने समुद्राशी झटापट करताना आपल्या बुरुजाच्या सगळ्या खिडक्या उघडल्या होत्या. सगळीकडून लाव्हारस गळत होता. पाण्याशी संयोग घडताच त्याचा चुर्र असा आवाज होई. पुन्हा पांढऱ्या शुभ्र वाफेचा पिसारा फुलून येई. त्या पडद्याआड दडलेला लाव्हा आपली समशेर बाहेर काढे. पुन्हा जीवानिशी समुद्रावर तुटून पडे. पाण्यात पडल्यावर एखादवेळी त्याचा सापाच्या फुत्कारासारखा आवाज होई. कधी लाह्या फुटल्यासारखा फटफट आवाज करत तो वर उसळे. त्यातल्या खडकांचे छोटे छोटे तुकडे आणि लाव्हाच्या ज्वाळा याचा पाऊस समुद्रात पडे. दिवाळीत अनारच्या किंवा आकाशात वर फुटलेल्या बॉम्बच्या ठिणग्या खाली पडतात त्याची आठवण झाली. समुद्राचं खारं थंड पाणी आणि अतिउष्ण लाव्हा एकमेकाला भिडले की रासायनिक प्रक्रिया होऊन हलकासा स्फोट होतो. पाण्याने थंड होत असलेल्या लाव्हाखडकांचे तुकडे आणि ऍसिडयुक्त वाफेचे लोट आकाशाकडे झेपावतात; तर काहींचा समुद्रात सडा पडतो. 

अंधारावर मात करत रविराज उगवले. लाव्हाच्या प्रतिबिंबाच्या नागमोडी लाटा आमच्या बोटीपर्यंत येत होत्या. कप्तानाच्या मदतनीसाने विहिरीतून पाणी उपसावं तसं, बादलीने समुद्रातून पाणी उपसलं. हात बुडवून पाहिलं तर चांगलच गरम होतं. लाव्हाचं तापमान सातशे ते बाराशे डिग्री असतं. समुद्राच्या पाण्यात पडलं की ते तापमान उतरतं; पण पाणी गरम असतंच. बोटीची निघायची वेळ होत आली. एकमुखानं आम्ही त्या ज्वालामुखी देवी ‘पेले’ हिचे ‘महालो’ म्हणत आभार व्यक्त केले. आणि काय आश्चर्य! तिने प्रसन्न होऊन आम्हाला एक क्लायमॅक्स सीन दाखवला. खडकाच्या नव्या खिडक्या उघडल्या गेल्या आणि त्या भेगांमधून किरमिजी रंगाचा लाव्हारस गळू लागला. अधिक चिकट आणि घट्ट. रबराच्या झाडातून गळणारा चीक जणू! स्लो मोशनमध्ये टपकणारा तो लाव्हारस आणि बोटीमुळे हिंदकळणाऱ्या पाण्यात पडणारं त्याचं प्रतिबिंब अप्रतिम दिसत होतं. निघावसं वाटत नव्हतं. कितीही वेळ बघत बसलो असतो तरी आमचं समाधान झालं नसतं. मराठीतील अतिशयोक्ती अलंकार शिकताना  उदाहरणादाखल ‘समुद्राला आग लागली’ अशी वाक्य वाचलेली आठवतात.  इथे मात्र ती अतिशयोक्ती नव्हती. तो वडवानल आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो. 

हवाईतील लोककथांमध्ये ज्वालामुखी देवी पेलेचा उल्लेख येतो. तिच्याबद्दल अतोनात प्रेम, भक्ती आणि आदरयुक्त भीती आढळून येते. आपल्या ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रयीशी तिचं खूप साम्य. पेले ही हवाई बेटांची निर्माती, जनतेची पालनकर्ती व संहारकर्तीही आहे. जुन्याला पोटात घेऊन नव्याला वाट करून देणारी ही अग्निदेवी म्हणजे मूर्तिमंत आत्मविश्वास, धैर्य आणि ताकद! जितकी तापट तितकीच उत्कट !

पेलेची कहाणी सुरु होते ताहिती बेटावरून. पृथ्वीदेवता हाउमेची ही कन्या ! हिला जन्मतःच अग्नीचं आकर्षण;  तर विरुद्ध स्वभावाच्या हिच्या बहिणीला, जलदेवता नमाकाला त्याचं वावडं. पेले अग्नी चेतवून ज्वालामुखीचा उद्रेक करते तेव्हा नमाका तिच्या भरतीच्या लाटांनी त्याला विझविण्याचा प्रयत्न करते. त्यांचं हे हाडवैर त्यांच्या जन्माला पुरलेलं. त्याला कंटाळून त्यांची आई, पेलेला एका तराफ्यात बसवून देते आणि दूरदेशी निघून जायला सांगते. तराफा वल्हवत पेले खूप दूर पोहोचते. एका विशिष्ठ जागी पोहोचल्यावर ती आपली वस्ती त्याजागी करण्याचा विचार पक्का करते. समुद्रतळावर आपली जादूची कांडी आपटताच तिथे ज्वालामुखी प्रकट होतो. बहीण नमाका तिच्या मागावर असतेच. लागलीच वाऱ्यासोबत आलेल्या उंच समुद्रलाटांनी ती पेलेचं घर उलथवून टाकते. पळता भुई थोडी झालेली पेले मग, आज बिग आयलंड ज्या जागी आहे तिथे पोहोचते. समुद्रात लुप्त झालेला किलुआ ज्वालामुखी पेलेच्या आज्ञेने उंच उसळी मारतो आणि बिग आयलँडची जमीन तयार होते. प्रचंड उंची असलेल्या किलुआचं मग नमाका काही वाकडं करू शकत नाही. पेलेच्या तापट स्वभावाची साक्ष मात्र आजही पटते. तिच्या मालकीच्या या बेटावरील एक इवलासा दगडही कुणी उचलून बेटाबाहेर आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न केला तर तिचा थयथयाट सुरु होतो. भूकंपाने जमीन हलू लागते, आणि लाव्हाच्या उसळ्या वाढतात. इतकंच नव्हे तर दूरदेशी असलेल्या त्या व्यक्तीवर तिची वक्रदृष्टी पडते आणि त्याला अनेक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. अशा पश्चात्तापदग्ध पर्यटकांनी पोस्टाने क्षमापत्रासोबत ते दगड पेलेला साभार परत केले आहेत. या प्रकारच्या बऱ्याच आख्यायिका आम्हाला स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळाल्या. हवाईजनांसाठी पेले ही त्यांची काळजी घेणारी, संकटांची आगाऊ सूचना देणारी माउली आहे. मोठ्या भक्तिभावाने तिला नैवेद्य अर्पण केला जातो. मनापासून केलेल्या प्रार्थनेने लाव्हाचा ओघ बंद होतो अशी त्यांची श्रद्धा आहे.   

या साऱ्या जरी दंतकथा असल्या तरी आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड घालता येते. ज्वालामुखीचं मूळ हे पृथ्वीच्या पोटात कवचापासून साधारण १२० मैल आत असतं. तेथील तापमान असतं चार हजार डिग्री फॅरानाईट.  प्रचंड उष्णतेमुळे तेथील खडक वितळू लागतात व त्याचा चिकट ओघवता द्रव तयार होतो. त्याला म्हणतात मॅगमा. बाहेर पडला की त्यालाच लाव्हा म्हणतात. काही ज्वालामुखी उसळ्या मारणारे तर काही शांत स्वभावाचे. त्यांचा लाव्हा पृथीच्या भेगांमधून धीम्या गतीने ओघळतो. विरुद्ध स्वभावाच्या ज्वालामुखींना कारणीभूत आहेत त्यात असणारे बुडबुडे. बुडबुड्यांमुळे दाब वाढतो आणि कॅन मधील शीतपेयासारखा वर उसळी मारणाऱ्या मॅगमाचा तीव्र उद्रेक होतो. कमी बुडबुडे असतील तर कमी दाबामुळे हा नुसताच वाहतो. हा लाव्हा वाहत असताना त्याचा बाहेरील भाग थंड होऊन टणक होतो. आतला गरम आणि तरल लाव्हा मात्र पुढे पुढे वाहत जातो. त्यामुळे तयार होतात लाव्हा खडकांच्या पोकळ भुयारी नळ्या. अशीच एक नळी डिसेम्बर २०१६ मध्ये फुटून त्याचा अविरत ओघ फेब्रुवारी पर्यंत सुरु होता. आम्ही हा अनुभव घेतला तो त्यानंतर तीन महिन्यांनी. त्यामुळे त्याचं सौम्य रूपच पहायला मिळालं. 

पेलेची पुराणकथा हवाई बेटांच्या जन्मकहाणीशी कशी जुळते पहा. समुद्रतळाशी असलेल्या पृथ्वीच्या कवचाला भेदून बाहेर पडणाऱ्या मॅगमामुळे या बेटांचा जन्म झाला. पृथ्वीच्या टेक्टॉनिक तबकड्यांपैकी पॅसिफिक तबकडीच्या मध्यभागी असलेल्या अतिउष्ण बिंदूतून हा लाव्हा बाहेर आला. टेक्टॉनिक तबकड्या स्थिर नसतात. ही पॅसिफिक तबकडी जेव्हा सरकली तेव्हा अतिउष्ण बिंदूही तिच्याबरोबर पुढे सरकला. तो पुढे सरकला त्यामुळे जुन्या बेटावरील ज्वालामुखी विझला. बिंदूच्या नवीन स्थळावरून नवा ज्वालामुखी फुटला. हवाई बेटसमूहातील सर्वात जुनं बेट आहे ५० लाख वर्षांपूर्वीचं आणि सर्वात तरुण बेटाचं वय आहे अवघं पाच लाख वर्ष. लोईही नावाच्या बेटाने ४ लाख वर्षांपूर्वी समुद्राखाली जन्म घेतलाय. पण त्याला डोकं वर काढायला अजून दहा हजार वर्षं तरी लागणार आहेत. पेले देवीच्या गोष्टीत हाच क्रम आहे. काऊई पासून नवनवीन बेटं तयार करत आज ती बिग आयलंड बेटावरील किलुआ या जागृत ज्वालामुखीत स्थित आहे. म्हणजे ही पुराणातील वांगी काही पुराणातच राहिली नाहीत, त्याला भरभक्कम असा शास्त्रीय आधार आहे. 

या लेखासोबत फोटो आणि काही व्हिडिओ सुद्धा पोस्ट केले आहेत. पैकी hosepipe मधून पडणारा लाव्हा कसा दिसत होता याची कल्पना यावी म्हणून फक्त तो व्हिडिओ आंतरजालावरून घेतला आहे.

बोट निघता निघता बघितलेला क्लायमॅक्स सीन

मेधा आलकरी

ई-मेल – travelkarimedha@gmail.com 

भ्रमणध्वनी -९८२००९५७९५

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/channel/UCBt-dofKUO26YwRGAfMyePw

(लेखिकेचे travelkari medha नावाचे युट्युब चॅनल आहे आणि आत्तापर्यंत प्रवासाचे भन्नाट अनुभव सांगणारे ५२ भाग प्रसारित झाले आहेत. त्याच नावाचं फेसबुक पेजही आहे. दोन्ही संकेतस्थळांना जरूर भेट द्या. )

Back to list