पुस्तक प्रकाशन 2022

सुधास्मृती – प्रकाशन सोहळा

सुधास्मृती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दादर सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल, दादर येथे १५ सप्टेंबर २०२२ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ कलाकार विलास गुर्जर होते तर प्रमुख अतिथी जयंत सावरकर व विजय केंकरे होते. पुस्तकाचे संकलक अजित आचार्य यांनी मराठी नाट्य रंगभूमीचा आढावा घेत १९६० ते १९८० या दशकात बालरंगभूमीचा पगडा सुधाताईंमुळे कसा होता हे विश्लेषित केले तर पुस्तकाच्या संकलक लीला विनोद हडप यांनी बालरंभूमीच्या कालावधीतील माहिती सुधाताईंनी कशी त्यांच्याकडे सुपूर्द केली व अन्य माहिती कशी मिळवली याची माहिती दिली.

ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी २ वर्षांनी ग्रंथालीला ५० वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने पुढील योजना व ४८ वर्षांची वाटचाल विशद केली आणि ग्रंथाली तर्फे मान्यवरांचा पुस्तक देऊन सन्मान केला.

ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. विजय केंकरे यांनी मावशी म्हणजे सुधा करमरकर यांच्यामुळे मी कसा घडलो तसेच दामू केंकरे व सुधा मावशी यांच्यामुळे दिग्दर्शन क्षेत्र का निवडले हे विशद केले व बालरंगभूमीचे किस्से सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

“माझ्यावर सुधाताईंनी शब्दांचे उच्चार व त्यावर जोर किती द्यावा, वाक्यांची फेक कशी असावी याचे संस्कार केल्यामुळे मी आज ८७ वर्षांचा असलो तरी ते विसरू शकत नाही आणि रंगभूमी, मालिका व चित्रपटात त्याचा मला खूप चांगला उपयोग झाला” असे उद्गार प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते श्री. जयंत सावरकर यांनी प्रकाशनाच्या वेळी काढले.

अध्यक्ष विलास गुर्जर यांनी ‘लाडक्या राक्षसाचा’ अभिनय करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. दत्ता सावंत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार सूत्रसंचालन केले.

या प्रकाशन सोहळ्यात बालरंगभूमीवर गाजलेलं ‘अल्लादिन व जादूचा दिवा’ यातील एक प्रसंग अमित सोलंकी, अमित जाधव, मयुर जाधव या कलाकारांनी सादर केला तर लीला हडप यांनी ‘मधुमंजिरी’ या बालनाट्यातील चेटकिणीचा वाचिक अभिनय सादर केला. कार्यक्रमाला रंगभूमीवरील अनेक कलाकारांची उपस्थिती होती. आर्टिक स्टुडिओ प्रमुख इव्हेंट्स एन्ड प्रोडक्शन यामधून अमित सोलंकी व सर्व कलाकारांनी या सोहळ्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे सांभाळले त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

पुस्तक प्रकाशन सोहळा

बालरंगभूमीच्या प्रवर्तक, जेष्ठ कलाकार कै. सुधाताई करमरकर यांच्या आठवणीचे संकलन

 

सुधास्मृती

संकलन – लीला विनोद हडप / अजित आचार्य

 

प्रमुख पाहुणे

जयंत सावकार

अध्यक्ष – विलास गुर्जर

सूत्रसंचालन – दत्ता सावंत

 

लिटल थिएटर

बालरंगभूमी

(Artique Studio Pramukh Event’s & Production)

Back to list