तीन महत्त्वपूर्ण खंडांचे प्रकाशन
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीची नोंद घेतली जावी या उद्देशाने ग्रंथालीने तीन खंडांचे प्रकाशन करण्याचे ठरवले. यामध्ये ‘मराठी राज्यातले मराठी वर्तमान’ या मराठी भाषाविषयक
(संपादन : डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व डॉ. अजय देशपांडे), ‘मोहरा महाराष्ट्राचा’
या साहित्यिक-सांस्कृतिक वाटचालीविषयी (संपादन : रमेश अंधारे) आणि
‘विज्ञान-तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र’ या विज्ञानविषयक (संपादन : विवेक पाटकर आणि हेमचंद्र प्रधान) या तीन खंडांचे प्रकाशन 27 जून 2022 रोजी मंत्रालयाच्या परिषद सभागृहामध्ये दुपारी 1 वाजता महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक व ऋतुरंग मासिकाचे संपादक अरुण शेवते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
भाषामंत्री सुभाष देसाई यावेळी बोलताना म्हणाले, या तीन खंडांमुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. मराठीच्या प्रगतीमध्ये अडथळे आणणारे जसे आहेत तसे त्यासाठी मदत करणारेही आहेत, त्यामुळे ज्ञानाधिष्ठित कृती करत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
आरंभी सुदेश हिंगलासपूरकर यांनी या 3 खंडांच्या निर्मितीमागची भूमिका मांडली आणि ग्रंथालीच्या वाटचालीविषयी माहिती सांगितली. डॉ. पी.डी. पाटील यांनी
उत्स्फूर्तपणे ‘मोहरा महाराष्ट्राचा’ या खंडाच्या पाचशे प्रती घेण्याचे मान्य केल्याने अन्य दोन खंड करण्याचा हुरूप आला, असे सुदेश हिंगलासपूरकर म्हणाले. या संदर्भात बोलताना डॉ. पी.डी. पाटील यांनी या खंडांचे कौतुक करत, यापुढेही अशा उत्तम
कामाला नक्की सहकार्य राहील असे, आश्वासन दिले. यावेळी त्यांचा सुभाष देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. राजीव खांडेकर यांनी मराठीतील नव्या उत्तम लेखकांचे कौतुक करत, समाज व माध्यमांकडून त्याची आवश्यक तशी दखल घेतली जात नाही ही खंत व्यक्त केली. सध्या महाराष्ट्रातील लोकांमध्ये मराठीविषयी अभिमान जास्त आणि प्रेम कमी अशी स्थिती असल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत विविध क्षेत्रांमध्ये देशपातळीवर ठसा उमटवणारी मोजकीच मंडळी दिसतात, असे मत त्यांनी मांडले. ग्रंथालीद्वारा प्रकाशित हे तीन खंड वाचल्यावर कुणीही महाराष्ट्राविषयी पंडित म्हणून जगात वावरू शकेल असे उद्गार त्यांनी काढले.
अरुण शेवते यांनी आपल्या मनोगतामध्ये या पुस्तकांचे आणि त्यासाठी ग्रंथालीने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.
या कार्यक्रमात उपस्थित संपादकांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांनी कार्यक्रमाचे समयोचित सूत्रसंचालन केले.
– प्रतिनिधी
तीन महत्त्वपूर्ण खंडांचे प्रकाशन
27
जून