ग्रंथाली प्रतीभांगण गप्पा – कॅप्टन सचिन गोगटे आणि मीना गोगटे यांच्याशी…
संवाद साधतील
प्रल्हाद जाधव
मर्चंट नेव्ही हे तसे अनोखे तरी कुतूहलाचे क्षेत्र.
एक मध्यमवर्गीय मराठी तरुण हे क्षेत्र निवडतो. सर्व संघर्ष
करत कॅडेट ते कॅप्टन हा खडतर प्रवास करतो हा ४३ वर्षाचा कर्तुत्वसंपन्न कार्यकाळ आणि या कालखंडात
जहाजावर व जहाज नांगरल्यावर विविध देशांत आलेल्या थरारक अनुभवांची रोमहर्षक कहाणी
‘कॅडेट नंबर ३४५०’ या पुस्तकात वाचता येते.
ग्रंथालीद्वारा नुकत्याच झालेल्या या पुस्तकाच्या
प्रकाशनानिमित्त लेखक कॅप्टन गोगटे व त्यांच्या पत्नी मीना यांच्याशीगप्पांच्या कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे आपल्याला हार्दिक निमंत्रण !
वृतांत
शुक्रवार दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रंथाली प्रतिभांगण गप्पा या उपक्रमामध्ये कॅप्टन सचिन गोगटे व त्यांच्या पत्नी मीना गोगटे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम संपन्न झाला. लेखक, नाटककार प्रल्हाद जाधव यांनी त्यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रभाकर भिडे यांच्या पुस्तकाविषयीच्या प्रास्ताविकानंतर ज्येष्ठ लेखक प्र. ना. परांजपे यांच्या साहित्य, संवाद, समिक्षा या पुस्तकाचे कॅप्टन गोगटे यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. प्र. ना. परांजपे, कॅप्टन गोगटे, मीना गोगटे, प्रल्हाद जाधव यांच्याबरोबर पुस्तकाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पूर्णा धर्माधिकारी यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सिंदबाद, कोलंबस, मार्को पोलो अशा दिग्गज जग फिरणाऱ्यांना न भेटता आल्याचे दु:ख कॅप्टन गोगटे यांना भेटल्यानंतर कमी होईल असे प्रल्हाद जाधव यांनी सुरवातीस सांगितल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. कॅप्टन गोगटे यांच्याबरोबरच्या सहजीवनाबद्दल सांगताना मीना गोगटे म्हणाल्या की त्यांच्यासाठी सहजीवन म्हणजे न मळलेली वाट होती. पुढे चालणाऱ्याला मागून येणाऱ्याने प्रतिसाद देत पाठराखण करत वाटचाल केली. कोविडपूर्व चाळीस वर्षांत जेमतेम चार वर्षे त्यांना एकत्र राहता आले. एकमेकांना समजून घेतले असल्याने हे दूरस्थ सहजीवन त्यांनी सहजतेने व्यतीत केले. लग्न ठरल्याचा प्रसंगही त्यांनी यावेळी खुलवून सांगितला.
प्रोजेक्टरवर दाखवलेल्या चित्रांच्या साहाय्याने कॅप्टन सचिन यांनी व्यापारी/तेलवाहू जहाजाची रचना, कार्यपद्धती आणि काही तांत्रिक गोष्टी समजावून सांगितल्या. कोणताही दृश्य संदर्भ-खूण नसताना केवळ नकाशा आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने अथांग पाण्यातून योग्य मार्गावरून जहाज नेणे हे अतिशय कौशल्याचे, गुंतागुंतीचे आणि डोळ्यात तेल घालून करण्याचे काम असते. या प्रवासात कोणत्याही प्रकारचा अपघात नाहीच पण अपघाताची शक्यताही निर्माण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या.
समुद्रामध्ये चाचेगिरीचा मोठा धोका जहाजांना व त्यावरील कर्मचाऱ्यांना असतो. या चाचेगिरीविषयी व त्याच्या विविध पैलूंविषयी मीना गोगटे यांनी सविस्तर माहिती दिली.
कॅप्टन सचिन गोगटे यांच्या सागरी कारकिर्दीविषयी व मीना गोगटे यांच्याबरोबरच्या त्यांच्या संसाराच्या आठवणींनंतर विषय अपरिहार्यपणे काही वर्षांपूर्वी कॅप्टन गोगटे यांना बॉम्बस्फोटाच्या धक्क्यामुळे झालेल्या एम ॲन्ड डी या दुर्धर आजाराकडे वळला. मीना गोगटे यांनी अतिशय हृद्यपणे या सर्व प्रसंगाचे व त्यानंतर त्यांना आलेल्या अनुभवांचे वर्णन केले. गोगटे दांपत्य व त्यांच्या कुटुंबाने ज्या धीरोदात्तपणे या आजारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना केला आहे ते ऐकून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी तरारले.
सुमारे दोन अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात ऐकायला मिळालेल्या मन:स्पर्शी तसेच प्रेरणादायी अनुभवांमुळे उपस्थित प्रेक्षक खिळून राहिले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खरे यानी केले.