साहित्यरंग

चीन देशीच्या रॅपुन्झेल

मेधा आलकरी

युरोपातील सिंड्रेलाइतकीच लाडकी जर्मनीतील एक परीकथा आहे- रॅपुन्झेल! खरं तर ते एका हिरव्यागार पालेभाजीचं नाव. अशा रॅपुन्झेलची आजारी आई गर्भारपणी या भाजीचं सेवन केल्यानं सशक्त होऊन बाळाला जन्म देऊ शकणार होती. परंतु ही भाजी उगवायची एका चेटकिणीच्या परसात. भाजीच्या बदल्यात नवजात बालक अशी विचित्र अट होती त्या चेटकिणीची. ती मान्य करण्यावाचून काही गत्यंतर नव्हतं. नवजात बालिकेचा, रॅपुन्झेलचा सांभाळ मात्र चेटकिणीनं प्रेमानं केला. तारुण्यात पदार्पण झाल्यावर रॅपुन्झेल नक्षत्रासारखी सुंदर दिसू लागली. गोरीपान, मंजुळ आवाज आणि काळेभोर लांबसडक केस. तिच्या या स्वर्गीय सौंदर्याला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून चेटकिणीनं तिला एका उंच मनोऱ्यात बंदिस्त केलं. त्याला होती एक छोटीशी खिडकी. वर जाण्यासाठी चेटकीण रॅपुन्झेलला हाक देई आणि तिचे लांबसडक केस खाली सोडायला सांगे. त्या केसांना धरून ती वर चढून जात असे. एकदा एका राजकुमारानं रॅपुन्झेलचे लांबसडक केस पाहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. त्यानं चेटकिणीच्या आवाजाची नक्कल केली. रॅपुन्झेलनं सोडलेल्या केसांच्या दोरावरून चढत मनोऱ्यात प्रवेश केला आणि रॅपुन्झेलची सुटका केली. या परीकथेचा शेवट गोड झाला. या जर्मन परीकथेतील लांबसडक केसांच्या रॅपुन्झेल मी प्रत्यक्ष पाहिल्या, चीनमधील व्हांगलो या खेड्यात. नाजूक भरतकाम केलेलं, लाल रंगाचं झंपर घातलेल्या ‘रेड याओ’ जमातीच्या या बायका म्हणजे चीन देशीच्या रॅपुन्झेल. प्रत्येकीचे केस टाचेपर्यंत लांब आणि काळे कुळकुळीत. २.१ मीटर लांब केस हा व्हांगलो गावातील जागतिक विक्रम आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या गावाची नोंद आहे. व्हांगलो- लांब केसांचा गाव!

रेड याओ जमातीतील बायका आयुष्यात फक्त एकदाच केस कापतात. वयाच्या सोळाव्या वर्षी अगदी समारंभपूर्वक कापलेले हे केस आजीच्या हाती सुपूर्द केले जातात. आजी मोठ्या निगुतीनं त्याचं गंगावन करते आणि एक सुबकसा अंबाडा बनवते. मुलीच्या लग्नात तो छान सजवून जावयाला अहेर म्हणून दिला जातो. लग्नानंतर रोजच्या केशरचनेत या गंगावनाचा उपयोग केला जातो. सासर-माहेरचा संगम दर्शवणाऱ्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या जणू. रोज गळणाऱ्या केसांचं गुंतवळ फेकून न देता त्याचंही गंगावन बनवलं जातं. तेही रोज वापरायचं. म्हणजे आधीच स्वतःचे टाचेपर्यंत लांब केस, वर हे दोन गंगवानांचं शेपूट. हा भला मोठा भारा डोक्यावर गुंडाळून त्याची सुबक केशरचना करायची. ही केशरचना करताना ही ललना (की ‘लाल’ ना?) आपले सारे केस डोक्यावरून पुढे घेते. त्याचा घट्ट पिळा करते आणि चुंबळीसारखा तो डोक्याच्या शिरोभागी गुंडाळते. मग अर्ध्यात त्याला ही गंगावनं जोडते. प्रत्येकवेळी केसांचा पिळा गुंडाळताना चुंबळ वर उचलते. त्याच्याखालून घेतलेला शेपटा लाकडाच्या कंगव्यानं छान विंचरते आणि पुन्हा चुंबळीखालून काढते. असं करत करत तिच्या डोक्यावर केसांचा जणू एक ट्रे तयार होतो.

रेड याओ जमातीच्या परंपरेप्रमाणे अविवाहित मुली आपले केस एका काळ्या स्कार्फमध्ये बांधून ठेवतात. कपाळावर कुंकवाच्या जागी येणाऱ्या स्कार्फच्या भागावर लाल रेशमाचं नाजूक भरतकाम केलेलं असतं. लग्न झालं की स्कार्फच्या बंधनातून मुक्ती. मग तिला ती गंगावनं वापरून सुबकशी चुंबळ बनवायची मुभा असते. एकदा का लेकुरवाळी झाली की तिला त्याच चुंबळीतून कपाळावर टेंगूळ यावं असा एक अंबाडा बनवायचा असतो. काळ्याभोर तुकतुकीत केसांची ही केशरचना खूपच आकर्षक दिसते.

चार-पाचशे वर्षं जुन्या व्हांगलो गावात आपण प्रवेश करतो तोच मुळी एका झुलत्या पुलावरून. पुलाच्या दोन्ही बाजूंस उभ्या राहून या ललना सुरेल स्वागतगीत गातात. गावात शिरताच आधी लक्ष वेधून घेतात ती लाल कंदील लटकवलेली त्यांची तिमजली घरं. बांबूवर उभी असलेली, लांबोळक्या खोल्यांची आणि शाकारलेल्या कौलारू छपरांची! घराची ठेवण थोडी वेगळी. तळमजला लहान आणि दुसरा व तिसरा मजला क्रमाक्रमानं मोठा होत जाणारा. पूर्वीच्या काळी तळमजल्याला गोठा असे. आता त्याची जागा तांदूळ साठवणाऱ्या गोदामांनी घेतली आहे. पहिला मजला हे कुटुंबीयांचं राहतं घर. मधलं ऐसपैस माजघर, पुढच्या बाजूस तितकंच मोठं स्वयंपाकघर आणि मागे विश्रांतीच्या खोल्या. कुतूहलापोटी स्वयंपाकघरात डोकावले. डुकराचं मांस धुरी घेत होतं, तर मक्याची कणसं खुंटीवर अंग वाळवत होती आणि चुलीवर भाताचं आधण रटरटत होतं. यांच्या मुख्य जेवणात भाताबरोबर बटाटा, मका, सोयाबीन, लाल भोपळा याचा समावेश असतो; तर सणासुदीच्या दिवशी खमंग भाजून रुचकर बनवलेला एखादा पक्षी!

बायका म्हणाल तर हरहुन्नरी! फावल्या वेळात हात भरतकामात गुंतलेले. त्या सगळ्या जणींचा वेष सारखा. लाल झंपर, काळा स्कर्ट, त्यावर टप्पोऱ्या गुलाबाचं भरतकाम, कंबरेला पट्टा, काळे कापडी बूट आणि गुडघ्यापर्यंत येणारे लाल मोजे. चांदीच्या दागिन्यांचा खूप सोस. कानात मोठ्या रिंगा, गळ्यात माळा, हातात जाड कंगन! कंबरेच्या पट्ट्यात लाकडी कंगवा खोचलेला आणि एका बाजूला लाल रेशीमकाम केलेली काळी कापडी पर्स लटकलेली. या सगळ्या सरंजामाबरोबर असतं एक मधाळ लाघवी हास्य! निसर्गाच्या कुशीत आपलं उभं आयुष्य घालवणारे लोक असे सरळ, निष्कपट आणि हसतमुख निपजत असावेत.

गावातील बायका पर्यटकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम करतात. त्यात त्यांच्या परंपरा, संस्कृती, नाच-गाणी इतकंच नव्हे तर लुटुपुटूचा लग्नसोहळाही सादर करतात. या जमातीतील स्त्रियांना आपला जोडीदार आपणच निवडायची मुभा आहे. पालकांची लुडबूड इथे नसतेच. घरजावई होणं इथे नामुष्कीचं समजलं जात नाही. ‘आपली आवड’ दर्शवण्याची एक विचित्र पद्धत आहे यांच्याकडे. (म्हणजे आपल्यासाठी विचित्र) आवडलेल्या पुरुषाच्या पार्श्वभागाला चिमटा काढून ही ‘अपना बना ले मेरी जान’ इच्छा जाहीर केली जाते. काही पर्यटकांनाही त्याचा प्रतिसाद मिळतो. हे ‘चिमटलेले’ पुरुष मग त्यांच्या वाग्दत्त वधूची निवड करताना प्रामुख्यानं तीन गुणांची पारख करून घेतात. प्रथम म्हणजे तिचा आवाज खणखणीत हवा. डोंगरावरील भातशेतीच्या कामात गढलेल्या नवऱ्याला एका दमदार हाकेत जेवण तयार असल्याची बातमी मिळायला हवी. दुसरी अट म्हणजे तिची पावलं फताडी हवीत. ती कशाला? चिनी बायकांच्या नाजूक छोट्या पावलांच्या अट्टहासाच्या अनेक क्लेशदायक गोष्टी खरं तर आपण ऐकलेल्या आहेत. पुरुषांना आवडतात म्हणून राजघराण्यातील आणि उच्चभ्रू समाजातील कुमारिकांची पावलं कोवळ्या वयात घट्ट लोखंडी बुटात बांधून ठेवत असत. आणि हे रेड याओ पुरुष म्हणताहेत आम्हाला बायकोचे पाय फताडे हवेत. ते अशासाठी, की रोज सकाळ-संध्याकाळ डोंगरमाथा तुडवायला नाजूक पाय कामाचे नाहीत. परंतु हात मात्र हवेत छोटे छोटे. घ्या! म्हणजे पायाची तहान हातावर? नव्हे, छोटे हात नाजूक भरतकाम करतात, टाके घट्ट आणि सुबक घालतात म्हणे. ऐकावं ते नवलच !

सांस्कृतिक कार्यक्रमात झालेल्या लुटुपुटूच्या लग्नात पर्यटकांमधील निवडलेल्या नवऱ्यांना रेड याओ जमातीच्या पद्धतीप्रमाणे बायकोला पाठुंगळी बसवून न्यावं लागतं. याच कार्यक्रमात या स्त्रियांचे पाठीवरून घसरत, पोटऱ्यांना स्पर्शून टाचेखाली लोळणारे नागिणीसारखे रेशमी केस पाहिले. अंबाड्यातून अलगद सुटलेल्या दाट, काळ्या, मोकळ्या केशसंभाराचं सौंदर्य पाहताच कवी ग्रेस यांची कविता आठवली.

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनि रंग गळतात
या वृक्षमाळेतील सावळे!

नदीच्या किनारी केस धूत असलेल्या बायकांचं दर्शन आता जरी सर्रास झालं असलं तरी ऐंशीच्या दशकापर्यंत तिथं परपुरुषानं केस पाहणं आक्षेपार्ह होतं. वाट चुकलेल्या वाटसरूनं जर अशा एखाद्या ‘गाव की छोरी’ला पाहिलं ‘घनदाट कुंतलीं, नजर गुंतली, मोहुनि गे सुंदरी’ असं म्हणून तिथेच थबकला तर तीन वर्षं त्याला घरजावई म्हणून राहावं लागे. कार्यक्रमात सादर केलेल्या चालीरीती पाहत असताना स्टेजवरील खिडकीतून या स्त्रियांनी आपले लांबसडक केस डोक्यावरून पुढे घेऊन खाली सोडले तेव्हाच मी त्यांना ‘रॅपुन्झेल’ हा किताब बहाल केला. त्यानंतर त्यांनी आमच्यासमोर त्या विविध केशरचना सादर केल्या. इथल्या ऐंशी वर्षांच्या म्हातारीचा चेहरा सुरकुतलेला असला तरी केसांमध्ये मात्र रुपेरी झाक नाही. ते तसेच लांब आणि काळेभोर. यामागचं गुपित जाणून घ्यायची आमची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. जडीबुटीवाला महागडा शॅम्पू घ्यायची मानसिक तयारीही झाली होती. परंतु हा जादुई शॅम्पू लपला होता त्यांच्या स्वयंपाकघरातील भातात- तांदळाचं धुवण वा आंबवलेली भाताची पेज! वर्षानुवर्षं हा घरगुती उपाय केस काळे, मऊसूत आणि चमकदार ठेवतो. रेड याओ बायकांसाठी हा लांब केशसंभार म्हणजे परमसौभाग्य, लक्ष्मीचा वरदहस्त आणि उदंड आयुष्य!

काळ्या केसांचं वरदान देणारी ही भातशेती काही वेगळी असावी म्हणून आम्ही जवळच असलेल्या ‘लॉंगजी’ गावाकडे प्रयाण केलं. दक्षिण चीनमधील हे भातशेतीचं गाव. एकापेक्षा एक उंच डोंगर आणि त्यांना पायऱ्यापायऱ्यांनी खणून तयार केलेले भातशेतीचे वाफे. क्षणभर वाटलं या जणू स्वर्गात नेणाऱ्या पायऱ्या! आम्ही गेलो होतो प्रसन्न शारदीय दिवसांमध्ये. वसंतात पाण्यात पाय रोवून उभी असलेली इवली इवली रोपं आता मोठी झाली होती. ग्रीष्मात वाऱ्यावर डोलणारी ती हिरवी बाळं आता परिपक्व होऊन भाताच्या लोंब्यांसह सोनसळी झाली होती. स्थानीय स्त्री-पुरुष डोक्यावर त्रिकोणी पसरट हॅट घालून आणि पाठीवर उभी टोपली लादून भराभर डोंगरावरून चढउतार करत होते. उंच डोंगराचं शिखर गाठण्यासाठी आपल्यासारख्या शहरी पर्यटकांना मात्र केबल कारनं वर जाण्याची सोय आहे. त्यात बसून धीम्या गतीनं वर चढताना आम्ही चारी बाजूंना फुललेलं निसर्गाचं गोमटं रूप न्याहाळत होतो. ऊन-सावलीचा खेळ चालू होता आणि समोरच्या दृश्यांची लपाछपी! मधूनच गुरांच्या घांगरमाळांचा मंजुळ ध्वनी कानी पडे. आता डोंगरमाथ्यावर कौलारू घरांची दाटीवाटी दिसू लागली. खाली उतरलेले विरळ ढग थकून त्यांच्या अंगावर विसावले होते. अगदी टोकाशी जायला थोडं पायी चालावं लागलं. गावातील वळणावळणांचे, पायऱ्यापायऱ्यांचे रस्ते पार करता करता दमछाक होत होती. वर पोहोचलो आणि समोरील अप्रतिम निसर्गचित्र पाहून सगळ्या श्रमाचं चीज झालं. सात डोंगरमाथे जणू सप्ततारका आणि मध्यभागी पौर्णिमेचा चंद्र दिसावा असा डोंगराचा उंचवटा. डोंगराची ती सपाट शिखरं बटूच्या डोक्यावरील घेऱ्याची आठवण करून देत होती.

खाली उतरत जाणाऱ्या भातशेतीच्या त्या सोनसळी पायऱ्या उन्हात चमकत होत्या. जिकडे पाहावं तिकडे नुसते सज्जे. ‘लॉंगजी’ या नावाचा अर्थ आहे ड्रॅगनचा कणा. लांबवर पसरलेले डोंगरांचे सज्जे हुबेहूब ड्रॅगनच्या खडबडीत पाठीसारखे दिसत होते. केवढी प्रचंड ही भातशेती! डोंगरामागून डोंगर सर करत गेलेली! पावसाळ्यात पाणी जमा होऊन ही छोटी छोटी तळी त्यात पडणाऱ्या असंख्य किरणांमुळे एखाद्या शीशमहालासारखी चमकत असावीत आणि हिमवर्षावानंतर तर ही ड्रॅगनची पाठ अधिकच उठून दिसत असेल! लाल पानाफुलांनी बहरलेली झाडं, लाल ललना आणि पांढराशुभ्र हिम. हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं कडाक्याच्या थंडीतही इथे वळत असावीत.

मेधा आलकरी

ई-मेल – travelkarimedha@gmail.com 

भ्रमणध्वनी -९८२००९५७९५

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/channel/UCBt-dofKUO26YwRGAfMyePw