साहित्यरंग

सिडनी सेतू आरोहण

मेधा आलकरी

नवीन वर्षाचा सोनेरी दिवस उगवण्याआधीची संध्याकाळ! फटाक्यांची आतषबाजी आणि रंगीबेरंगी लुकलुकत्या दिव्यांची रोशणाई! विविध देशांत या रोशणाईचा आपला स्वतंत्र असा ठसा असतो. ऑस्ट्रेलियात सिडनी येथील प्रसिद्ध पूल आणि त्याच्या शेजारी वसणारं ऑपेरा हाऊस केंद्रस्थानी ठेवून, नितांत सुंदर असं दारुकाम केलं जातं. दोन हजार साली आपण शतक ओलांडलं तेव्हा ‘इटर्निटी’ या शब्दांवरील रोशणाई तर माझ्या आठवणीत अजून ताजी आहे.

सिडनीतला आमचा पहिला दिवस! सिडनी बंदर, पूल व ऑपेरा हाऊस ही त्रिवेणी पाहण्यासाठी सकाळीच आम्ही तिथे पोहोचलो. वातावरण ढगाळ, आता बरसेल असं वाटायचं. राखाडी आकाशाच्या पार्श्वभूमीवर, उमलत्या कमळाच्या पाकळ्यांसारखं ते पांढरंशुभ्र ऑपेरा हाऊस डोळ्यांना काही केल्या रुचेना. आमचा कॅमेरा तर फोकस व्हायलाही राजी नव्हता. ऑपेरा हाऊस आतून पाहावं म्हटलं तर गाईडेड टूरला अजून बराच अवधी होता. चहा-कॉफीचा घुटका घ्यावा तर आतील उपाहारगृहात तरुणाई फुललेली. प्रचंड गलका, सिगारेटच्या धुराची वलयं! या घुसमटीपेक्षा बाहेरील रिमझिम परवडली म्हणून जिने चढून वर आलो आणि तेथील कट्ट्यावर विसावलो. समोर सिडनी ब्रिज होता. त्यावर एका रेषेत कावळे बसले होते. जरा वेळानं लक्षात आलं ते एका विशिष्ट गतीनं पुढे सरकताहेत. खूप निरखून पाहिल्यावर कळलं की ती तर माणसं आहेत. उंचीची खूप भीती असणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीनं शहारत, खांदे उडवत ब्रिज क्लाइंम्बिंगचा केलेला उल्लेख आठवला आणि पुलावर चढणं म्हणजे त्याखालून जाणाऱ्या रस्त्यावरून चालणं नव्हे; तर पुलाच्या कमानीवर चढणं हा अर्थ ध्यानात आला. आता शहारायची पाळी माझी होती.

सकाळी हॉटेलमधून उचललेली पत्रकं चाळायला लागले आणि त्यात या सेतूआरोहणाच्या टूरची माहिती मिळाली. ‘Climb of your life’ या घोषवाक्यानं आमच्या अंतःकरणातील धाडसी पर्यटकाला हलवून उभं केलं. हवेतील आणि मनातील मरगळ झटकून दोन दिवसांनी येणाऱ्या खास दिवशी ही  टूर करायचीच असं मनाशी पक्कं ठरवून उठलो. ब्रिजच्या पायथ्याशी असलेलं या टूरचं ऑफिस अगदी नीटनेटकं होतं. आतील सारी व्यवस्था चोख. नेमून दिलेली कामं पटपट आणि हसऱ्या चेहऱ्यानं करणारे कर्मचारी, ब्रिजवर चढताना घालण्याच्या गणवेशाचा ढीग व्यवस्थित रचून ठेवलेला, भरून द्यायचे फॉर्म क्लिपपॅडला लावलेले, त्यालाच पेनही लटकवलेलं. आमच्या सहप्रवाशांची ओळखपरेड झाली. एक जपानी मुलगी आणि तिची म्हातारी आई, एक एकला इंग्रज गडी आणि आम्ही नवरा-बायको असा छोटासा ग्रुप होता. अतिशय आरामदायी असे कपडे चढवून आम्ही तयार झालो. आमच्याकडून एक लुटुपुटूचा ब्रिज क्लाइंब  करवून घेतला. त्याआधी आम्हाला रेडिओ सेट, हँडसेट, एक रेनकोटची आणि एक स्वेटरची पिशवी आणि टोपी देण्यात आली आणि सर्वात शेवटी एक बक्कल आणि बेल्ट हातात ठेवला. या अनोळखी उपकरणांचा उपयोग समजावून सांगण्यात आला. त्यांच्या जागाही पक्क्या होत्या. सगळं एकदम शिस्तीत. रेडिओ सेट पॅन्टच्या मागच्या बाजूस डावीकडच्या बेल्टमध्ये खोचायचा; तर रेनकोटची आणि स्वेटरची पिशवी उजवीकडे. टोपी उडून जाऊ नये म्हणून ती  स्प्रिंगसारख्या प्लास्टिकच्या केबलनं शर्टाच्या कॉलरला क्लिप करायची. हेडफोन डोक्याला लावायचे. मात्र त्याची तोंडं कानावर न ठेवता कपाळाच्या दोन्ही बाजूस टेम्पल पॉइंटवर ठेवायची. त्यायोगे ब्रिज चढताना एकामागोमाग एक असलो तरी सर्वात शेवटी असणाऱ्या गाईडनं दिलेली माहिती आपल्याला स्पष्टपणे ऐकू येते. शेवटी आमची अल्कोहोल ब्रेथ टेस्ट झाली. रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण ०.०५ % पेक्षा जास्त असलं तर तुम्ही ब्रिज चढण्यास अपात्र! हातातल्या त्या बक्कल आणि बेल्टचं काय काम याची मला उत्सुकता होती. चढायला सुरुवात केल्यापासून उतरून येईपर्यंत हे बक्कल ब्रिजच्या स्टील केबल रेलिंगला अडकवून लॉक केलं जातं. बक्कल असलेला बेल्ट आपल्या कंबरेला बांधलेला असतो. आपण चालू तसं हे बक्कल रेलिंगमधून आपल्याबरोबर पुढे पुढे सरकत असतं. मध्येच येणाऱ्या वाऱ्याच्या झोतानं अथवा अचानक आलेल्या पावसाच्या तडाख्यानं आपला तोल जाण्याची भीती नाही. आपल्या सुरक्षिततेचा पुरता बंदोबस्त!

गाईडनं आमचा ताबा घेतला. तरणाबांड, साहसी, हसतमुख, हजरजबाबी आणि माहितीची खाण असणारा, काळजी घेणारा, जबाबदारी आणि खबरदारी घेणारा आमचा हा गाईड मला खूपच आवडून गेला. परिचयसोहळ्यात सांगितलेली आमची नावं एकदा ऐकूनच त्याला पाठ झाली होती. मेधामधील ध आणि सुकोई कोमिकामधला क तो सारख्याच सफाईनं आणि स्पष्टपणे उच्चारत होता. ‘ऑल सेट’ म्हणत आमचा  सेतूआरोहणाचा थरार सुरू झाला.

सिडनी हार्बर ब्रिजच्या कमानी जिथे किनाऱ्याला टेकतात तिथे चारी बाजूस मनोरे आहेत. त्यातील एका मनोऱ्यावर चढूनही आजूबाजूचा देखावा बघता येतो, परंतु कमानीवर स्वार  होऊन सर्वोच्च बिंदूवर चढण्याचा कैफ काही औरच! या कमानीला ब्रिजवरून जाणाऱ्या आठ पदरी रस्त्याइतकी रुंदी आहे. ऑपेरा हाऊसकडून दिसणारी ब्रिजची पूर्व बाजू आणि पलीकडली पश्चिम बाजू. सिडनी सेतूआरोहण हे संपूर्ण कमान ओलांडून (दक्षिणोत्तर ) जाणे नसून, पूर्वेकडील कमानीवर चढून, सर्वोच्च बिंदूपाशी रस्त्याची रुंदी पार करून पश्चिमेकडील कमानीवरून परतणं असा प्रवास आहे. मनोऱ्याच्या अलीकडे सेतू आरोहणाचा मार्ग सुरू होतो. कमानीच्या पायऱ्या सरळसोट उभ्या. बोटीत चढतो त्याप्रमाणे एकावेळी एकानंच चढायचं असतं. त्या पायऱ्या चढताच एकदम उंची गाठल्याचं जाणवलं. मला हलकीशी धाप लागली असं वाटलं. माझ्यामागून येणाऱ्या जपानी आजीकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून चोरून पाहिलं. तिच्या जलद श्वासोच्छ्वासाला बहुतेक सायलेन्सर लावला होता. वर येताच मिचमिच्या डोळ्यांनी ३६० अंशांत देखावा पाहण्यात ती मश्गुल झाली. आता कमानीचा पुढचा चढ एकदम सोपा, हळूहळू वर जाणारा होता. दर दहा मिनिटांनी थांबायचं. सृष्टीसौंदर्य न्याहाळायचं, गाईडनं दिलेली माहिती ऐकून अचंबित व्हायचं, भलत्याच चौकस सहप्रवाशाची प्रश्नांची फैर ऐकायची असं चालू होतं.  प्रत्येक थांब्याला समोरचं ऑपेरा हाऊस छोटं छोटं होत गेलं. मजल-दरमजल करत सर्वोच्च बिंदूवर कधी पोहोचलो कळलंच नाही. आता सिडनी बंदराचा पूर्ण देखावा स्पष्ट दिसू शकत होता.

ब्रिजवर कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी आहे. कॅमेरा काय कुठलीच सुटी वस्तू तुम्ही नेऊ नये. शरीरापासून वेगळी झाली की सरळ जलार्पण! गाईड वाकडातिकडा होत छानशी छायाचित्रं काढतो. हात उंचावून ‘फत्ते’ असं ओरडत असताना, ऑपेरा हाऊस आणि सिडनी बंदराच्या पार्श्वभूमीवर घेतलेला फोटो तुम्हाला भेटीदाखल आणि बाकीचे अव्वाच्या सव्वा भावानं माथी मारले जातात. समुद्रसपाटीपासून १३४ मीटर उंचीवर आपण आलेलो असतो. नुकताच प्राणवायूचा ताजा पुरवठा केल्यासारखी शुद्ध मोकळी हवा, पावसाची सर पडून गेल्यामुळे अधिकच स्वच्छ वाटत होती. वारा सुसाट नव्हता, पण घोंगावता होता. ऑपेरा हाऊससमोरील कट्ट्यावर बसलेल्या माणसांकडे पाहत त्यांना साद घातली. मोठ्यानं ओरडून सांगितलं की ‘आम्ही कावळे नाही, माणसं आहोत माणसं!’ आतापर्यंतच्या प्रवासात आम्ही कितीतरी मनोरे चढून गेलो आहोत; पण हा अनुभव काही विरळाच.

आता पश्चिमेकडील कमानीवरून परतायचं होतं. नाकासमोर बघत  रस्त्याची रुंदी पार केली. तरीही खालून भरधाव जाणाऱ्या गाड्यांचा आठ पदरी रस्ता आणि धडधडत जाणाऱ्या रेल्वेचे दोन ट्रॅक त्यांच्या कंपनामुळे जाणवत होते. उतरत असताना गाईडशी  वाढलेल्या घसटीचा फायदा घेत त्याला सांगितलं की आज आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस आहे आणि आजच हा सेतूआरोहणाचा सुयोग घडत आहे. आम्हाला वाटलं तो कौतुकानं आमचे दोन्ही हात हातात घेऊन हस्तांदोलन करत आम्हाला शुभेच्छा देईल. परंतु तशी काहीच प्रतिक्रिया न देता तो म्हणाला, ‘हा खास दिवस साजरा करण्यासाठी बरीच जोडपी येतात इथे!’ म्हणजे आम्ही खास नाही, हजारातले एक! कसनुसं हसून आम्ही उतरण  सुरू केली. या ब्रिजच्या रीतसर उदघाटनापूर्वी त्याची एक चाचणी घेण्यात आली. किती कमाल वजन तो पेलू शकतो याचा आढावा घेण्यासाठी ब्रिजवर रेल्वे वॅगन, ट्राम्स, बसेस यांचा ‘ट्रॅफिक जॅम’ करवला. ब्रिजच्या पन्नासाव्या वाढदिवशी पाच लाख लोकांनी चालत हा ब्रिज ओलांडला. मजबूत स्टीलचे स्नायू व मज्जातंतू असणाऱ्या ब्रिजरावांनी हा सारा भार यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलला. ही माहिती गाईडकडून ऐकताना माझ्यासमोर मानवी रूपातील ब्रिज साकारला. बॉडीबिल्डर स्पर्धेत दंडावरचे तट्ट फुगवलेले स्नायू आणि बाहुबल दाखवत दिमाखानं उभा असलेला, रापलेल्या काळसर रंगाचा द ब्रिज!

हा ब्रिज क्लाइंब दिवसाच्या चारी प्रहरी चालतो. तांबडं फुटलेल्या पहाटे, दिवसाच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात, सायंकाळच्या पिवळ्या संधिप्रकाशात आणि रात्रीच्या बंदरावरील दिव्यांच्या झगझगाटातही. ऊन-पाऊस, थंडी-वारा सगळ्यांशी सख्य असणाऱ्या या टूरचं वावडं फक्त कडाडणाऱ्या विजेशी. खाली परतल्यावर आम्हाला फोटोच्या प्रतीबरोबर एक प्रशस्तिपत्रकही मिळालं. निघताना आठवण म्हणून तिथल्या दुकानातून एक टोपी विकत घेतली. त्यावर पुढच्या बाजूस ब्रिजचं चित्र होतं आणि मागे लिहिलं होतं. ‘I climbed it !’   ऑस्ट्रेलियात असेपर्यंत आम्ही ती अभिमानानं शिरावर मिरवली.

मेधा आलकरी

ई-मेल – travelkarimedha@gmail.com 

भ्रमणध्वनी -९८२००९५७९५

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/channel/UCBt-dofKUO26YwRGAfMyePw