पुस्तक प्रकाशन 2022

बालदिनाचे औचित्य साधून ग्रंथाली प्रतिभांगणच्या विज्ञानधारा या नव्या उपक्रमाचा शुभारंभ

मुलांमध्ये असणारी कुतूहल भावना जोपासली जावी व त्यातून त्यांच्यामध्ये विज्ञानवृत्ती वाढावी या उद्देशाने ‘ग्रंथाली’द्वारा भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक व सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ शरद काळे यांच्या सहकार्याने ‘विज्ञानधारा’ हा नवा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. या उपक्रमातील शुभारंभाचा कार्यक्रम सोमवार, १४ नोव्हेंबर २०२२ रोजी बालदिनाचे औचित्य साधून ग्रंथाली प्रतिभांगण, बॅण्ड स्टॅन्ड, वांद्रे पश्चिम येथे सकाळी १०.३० ते ११.३० या वेळात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात मुंबईतील परळ येथील आर. एम. भट हायस्कूल आणि के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल या शाळांतील निवडक विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या वेळी शरद काळे यांच्या सांगण्यानुसार, दर आठवड्याला एक नवीन पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि एक तरी झाड लावून त्याची जोपासना करणे या तीन शपथा मुलांनी घेतल्या.

यावेळी शरद काळे यांनी वैश्विक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग), कचरा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिणामकारकपणे काय कृती करता येईल याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला.

स्वयंपाक करताना कुकरच्या शिट्टी होण्यामुळे व चुकीच्या वापरामुळे आर्टिक व अंटार्टिका खंडातील हिमनद्या वितळण्याची क्रिया कशी वाढत आहे हे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना कमीत कमी ऊर्जा वापरून अन्न कसे शिजवता येईल हे शिकवले. तसेच अन्नाच्या नासाडीमुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या कशी वाढत आहे व त्यामुळे काय प्रश्न निर्माण होत आहेत व होणार आहेत हे सांगितले. या शिवाय झाडामुळे निसर्गात ऑक्सिजन निर्मिती कशी व किती होते हे सांगताना त्यांनी आपल्याला एका दिवसात सुमारे साडेतीन हजार लिटर ऑक्सिजन लागतो ही माहिती सांगितली. याची किंमत साधारण तेहतीस हजार रुपये होते. एका मोठ्या झाडातून साधारण इतका ऑक्सिजन हवेत सोडला जातो व त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून वाढवले पाहिजे हे शरद काळे यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंका विचारल्या व त्याविषयीही शरद काळे यांनी तपशीलवार माहिती दिली. शिरोडकर विद्यालयाच्या समृद्धी कुरणे या विद्यार्थिनीने मोबाईलच्या वापराविषयी विचारलेल्या प्रश्नाबद्दल तिला ‘कुतुहलरत्न’ हे विशेष प्रमाणपत्र व भेटवस्तू ग्रंथालीद्वारा देण्यात आले. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनाही विज्ञानविषयक पुस्तके व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खरे यांनी केले असून तो सोमवार १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सर्वांना बघण्यासाठी ग्रंथाली प्रतिभांगण या युट्युब चॅनलवर प्रकाशित करण्यात येणार आहे.